बुधवार, फ़रवरी 07, 2007

मंगलवार, जनवरी 16, 2007

माझ्या कविता!

या माझ्या कविता यापूर्वी "मनोगत" या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या आहेत.
तिथल्याच इथे उचलून छापत आहे. यातल्या काही कवितांत "साती/ साती काळे" असं नाव आलंय ना ते माझं मनोगतावरचं नाव!" राजा" अर्थातच "योगेश!"

१.पहिले ब्लुकर

साती (राग-वैताग)--

आम्ही मरावे उगा नेहमी; या ब्लॉगावर त्या ब्लॉगावर
कोण ती कुठली ज्युली पॉवेल;घेउन गेली पहिले ब्लुकर!

राजा(स्थितप्रज्ञ)-

पाककलेशी लढली ती गे ; पहा एकटी पूर्ण वर्षभर
लिहीले अनुभव मग 'नेटाने' ; मार्ग प्रिये तो नाही सुकर !!

साती (राग-आवेश)-

मी ही मग रे लिहीन रेसिप्या ; पेज पेज खरडुनिया भरभर
काम एकचि करिन वर्षभर ; बाकी कामा ठेऊ नोकर !!

राजा (अजूनही स्थितप्रज्ञच)-

लाखो कॉप्या तिने खपविल्या ; तुला तिथे गे बसेल ठोकर
कुणी पढावे तुझे रकाने ; आणि द्यायचे पैसेही वर !!

साती (राग-धुसफुस)-

पूरे तुझी ही कुजट बोलणी ; आणि त्यावरी तिखटी फुंकर
कसे मिळावे सांग मला मग ; ब्लुकर किंवा किमान म्लुकर!!

राजा ( सारवासारवी)-

सोड प्रिये गं हट्ट असा तो ; काय खायचे आहे म्लुकर
वेळ होई बघ ही डिनराची ; भाजी टाकतो लाव तू कुकर !!

*************************************

रेसिप्या- माझे मनोगतावरिल सुलेखन
म्लुकर-ब्लुकर सारखे मराठी जालावरिल पारितोषिक



२.फॅशन शो

कोण म्हणते बासने ढळलीच नाही
कोण म्हणते वासना चळलीच नाही !!

रँपवर बेभान त्या हो चालताना
पाउले का वाकडी वळलीच नाही? !१!

"पाप नाही चूक शिंप्याची असे" जर
लाज का वेडी तिथे गळलीच नाही? !२!

ऊर बडवोनि म्हणे "अपघात" तो रे
आमुची 'काळी' मने मळलीच नाही" !३!

"दूर" होती योजने लाखो जरी
रातिची ती "दर्शने" खळलीच नाही !४!

जाउदे दे सोडुनी 'साती' तुला
वाहिन्यांची नाटके कळलीच नाही !५!



३.मराठीने केला कानडी भ्रतार

आज नाही राहिली रंगत मराठी
साथीला कोणी नसे संगत मराठी !!

भोवती खडखाडती कित्येक डब्बे
आठवे मऊशार ती ढंगत मराठी !!

ताट भरुनी खावया इडल्या नि डोसे
आवडे चवदार ती पंगत मराठी !!

गाव जरी रे साजरा अन गोड घरटे
जीव हा नाही इथे दंगत मराठी !!

आणले तू कानडया देशात 'राजा'
चालली 'साती' तुझी खंगत "मराठी" !!



४.जादू

आता कोठे अडले घोडे ! त्यांना पडले मोठे कोडे !!
भली थोरली ही रथयात्रा ! ब्याण्णवापरि जादू ना घडे !!

तेव्हा केला देश पालथा ! रामाला घालून साकडे !
काय फायदा कोणा झाला ! करुनि एवढे वाद-बखेडे !!

नाही मिळाले रामाला घर ! जळले हरेक शहर नि खेडे !
तुम्हा मिळाले मोठे पद अन ! त्याचे वाढले सुरक्षाकडे !!

जाणुनिया तुमचे हे वर्तन ! आम्ही आमचे घेतले धडे !
जादू आज हो सरली तुमची ! आम्ही ना ऊरलो पहिले वेडे !!


५.झुकझुक!

सध्या सरदार सरोवरानिमित्त जोरदार हाणामारी चालु आहे. भूमिपुत्रांना अमिषे दाखवून, धाकटधपशा दाखवून प्रकल्पामुळे विस्थापित करायचे आणि नंतर प्रकल्पाचा फायदा दुसऱ्यांनीच घेऊन भूमिपुत्राच्या तोंडाला पाने पुसायची हे नेहमिचेच.असाच एक प्रकल्प कोंकणरेल्वे!

(चाल - रेलगाडी रेलग़ाडी !)

कोंकणरेल्वे कोंकणरेल्वे
झुकझुक झुकझुक
येता जाता करी कोंकणा
टुकटुक टुकटुक !!

रेल्वेला जागा , कवडीचा भाव
फुकुन टाकला, गावच्या गाव
तरी कोंकणी मिटली नाही
भूकभूक भूकभूक !!

गाडीला स्टेशन, स्टेशनात स्टॉल
विकायला भैया, चायनाचा माल
युपी बिहारी भैयाना हो
सुखसुख सुखसुख !!

गोव्याची ट्रीप, साऊथची ग्रीप
उगा कोंकणी करतो क्रीप
थोडेसे तरी माझ्या गावा
रुकरुक रुकरुक !!
---- पक्की कोंकणी साती

६. केळकर!

सध्या एक नवं मराठी गाणं आवडतं- "थेंबभर"
थेंबभर तुझे मन ओघळले माझ्यापुढे
माझ्यापाशी मागतसे एक पावसाची सर-- थेंबभर.
त्या कवितेचं हे विडंबन.


केळकर आळीतला थांबुनिया माझ्यापाशी
माझ्यापुढे बसतसे, जोडुनिया दोन्ही कर -- केळकर !!

म्हणे साती वेड लावी तुझे नाक ,तुझे केस
सखे तुझे डोळे कसे ,छान पाणीदार अन -- खेळकर !!

कशी येशी ,कशी जाशी , जीवाला पिसे लावशी
आणि कशी हसशी तू, दिसताच माझं घर -- खोडकर !!

आता किती दिस गडे, काळ्यांच्या घरी रहाशी
होऊनिया जा तू कशी, एकदाची भरकन -- केळकर !!

दिसताच माझे बाबा धूम ठोकून पळाला
पुन्हा कधी दिसला ना नाक्यावर, रस्त्यावर -- केळकर!!

( स्वानुभवाचे बोल असल्याने एका विशिष्ट ऊपनामाला दुखवायचा हेतू नाही हे कृपया लक्षात घ्या.)
--साती काळे



७.एखादी आळशी संध्याकाळ !

एखादी आळशी संध्याकाळ मिळू दे
मग अगदी महिनाभर कामाखाली जळू दे!!

क्लिनिकला अर्धा वेळ मारूया बुट्टी
ऍडमिट पेशंटाना देऊया सुट्टी
एकतरी सांजवेळ घरामध्ये ढळू दे !!१!!

सासूबाई-सासऱ्यांनी गावाला जावं
जाताना सोबत बाळाला न्यावं
लाल-लाल मातीत पाय त्याचे मळू दे !!२!!

रात्रीच्या स्वयंपाका देऊया चाट
तुझ्या हातच्या खिचडीचा मस्तपैकी घाट
ओट्याच्या पुढे-मागे तुला मग पळू दे !!३!!

बंद ठेवू टीव्ही आणि बंद ठेवू फोन
घराबाहेर पाटी लावू "रेस्ट्रिक्टेड झोन"
बोलायचं मला जे तुला सारं कळू दे !!३!!


बोलाची कढी आणि बोलाचा भात
मनातले मांडे खाते मनात
कामाची वेळ झाली मला आता पळू दे!!
(पण एकदातरी) एखादी आळशी संध्याकाळ मिळू दे


८.वाट

काव्यकण येथे तिथे जे ढापले
आणुनी नेटावरी ते थापले !१!

काढली खोडी कुणाची मी जरा
जाणत्यांनी का मला हो झापले !२!

मागची केली जरा उचलेगिरी
चालकांनी का बरे ते कापले !३!

फासले कोणी म्हणे 'काळे' मुखा
सांग त्याना ते श्रमाने रापले ! ४!

जाउदे 'साती' तुझी ही वाट नाही
जा लिही जा गद्य तू ते आपले !५!


९.सारे तुझेच होते
संदर्भ--
सारे तुझेच होते

एका मॉलमधून बाहेर पडताना ऐकलेले --

माझे म्हणू कशाला सारे तुझेच होते
आभूषणे तुझी अन कपडे तुझेच होते !!१!!

जे वाहतो तयाला ओझे कसे म्हणू मी
ट्रॉलीवरी नकोसे भारे तुझेच होते !!२!!

तू सांगतेस आता होतो असे उकाडा
जाऊ खरेदीला हे म्हणणे तुझेच होते !!३!!

भूक लागता तुला ती ,मी घाबरून जाई
खाण्यास मॉलमध्ये कट्टे बरेच होते !!४!!

का धापतो मी आता का श्वासही फुले हा
पैसे बिलाचे देण्या खोरे हवेच होते !!५!!


१०. फरक

माझे ते बोलगाणे , तयाची ती कविता
मी ओळी रचते , तो काव्य प्रसविता !!

वाटते मला जे , तया गमते भासते
भेटते मला जे , तया ते गवसते
हरवून टाकते मी , तयाने गमविता
मी ओळी रचते , तो काव्य प्रसविता !!१!!

पाहते हळूच मी , त्याचा तिरपा कटाक्ष
लाख दिवे लावते , तो दीप लक्ष लक्ष
मी आनंदून जाते , तो हर्षाने हरखता
मी ओळी रचते , तो काव्य प्रसविता !!२!!

काळोख इथे पडला , तेथे तम दाटले
पाऊस इथे पडला , तेथे नभ उतरले
मी होऊन गेले वेडी , तयाचे भान हरपता
मी ओळी रचते , तो काव्य प्रसविता !!३!!



११. आला पाऊस मुंबापुरी

आला पाऊस पाऊस जीव होई वरखाली
आठवते सारे काहीझाले जे जे गतसाली !!१!!

आला पाऊस पाऊस खड्डे अजूनी उघडे
पालिका नी खोदकामे असे कसे हे त्रांगडे !!२!!

आला पाऊस पाऊस भरे उरात धडकी
जरी हासला 'विलास''मिठी' तशीच रडकी !!३!!

आला पाऊस पाऊस आठवल्या बंद गाड्या
घेऊ का मी एकदोन छान लाकडाच्या होड्या !!४!!

आला पाऊस पाऊस आले ढग ते आभाळी
केला देवाला नवस मुंबापूरी रे सांभाळी !!५!!


१२.गाफील

येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने एका लातूरकरांचे चिंतन!!

राहू नयेच गाफील तो रिंगणात आहे
गोऱ्या महासूनेच्या तो वर्तुळात आहे !!१!!

का ज्ञात ना कुणाला याची तऱ्हा निराळी
दांडा कुऱ्हाडिचा हा गोतास काळ आहे !!२!!

मी खूश हो तिनाला हा चार सांगतो रे
नारायणामुळे या जीवास घोर आहे !!३!!

जिंकून चार सीटा खुर्चीस बळकवावे
हा अश्वमेध याच्या पुन्हा मनात आहे !!४!!

हासू नयेच कोणी या ठेंगण्या ठगाला
उंची अलीकडे त्या दिल्लीत फार आहे !!५!!

ठेवून प्रश्न मागे जावे 'विलास' कोठे
एका नव्या लढ्याची काळी प्रभात आहे !!६!!

लातूरकर खूपच चिंतेत असल्याने त्यांनी ऱ्हस्वदीर्घाचा आणि वृत्ताचा फारसा विचार केला नाही. मी पण त्यांच्या भावना मनोगतींपुढे पोहोचवणे महत्त्वाचे मानल्याने त्यांनी दिलेल्या खर्ड्यात बदल केला नाही. :) :)


१३.डाव

आज हा न्याराच यांचा डाव आहे
चोरताना दान देतो भाव आहे !!

तू कशा यांच्यापुढे लाचार होशी
जाण रे यांचे लुटारू नाव आहे !!

धावताना का तुला ठावे नसे हे
रे तुला स्पर्धेत कोठे वाव आहे !!

पाय घाला पाडण्या जाई पुढे जो
ज्यास त्याला जिंकण्याची हाव आहे !!

भांडलाशी जोडण्याला नाळ जेथे
ती मुळाशी तोडणारा घाव आहे !!


१४.भारनियमन

प्रेरणा--
मेघ नसता आणि टग्या.

रात्र असता वीज नसता दीप उजळू लागले
जाहले इतुकेच होते भारनियमन जाहले!!

वायरींवर टाकलेले चोरटे ते आकडे
वीजचोरांना तुम्ही रे आधी का नच पाहिले !!

एवढा भलताच आहे नियमनाचा काळही
रोजचा स्वयंपाक करणे भार वाटू लागले!!

लाख उपकरणे घराशी मन तरीही हळहळे
काल जे जे घेतले ते आज पडूनी राहिले!!

गोजिऱ्या सासूसुनांच्या साजिऱ्या त्या मालिका
पाहणे मी थांबले अन "हे" हसाया लागले!!

भर पहाटे फॅनची मी दृष्ट काढून टाकली
थांबला जागीच तो मी गरगराया लागले!!


१५. माझी देवप्रिया

"चांदणे शिंपीत जाशी" या चर्चेवरून आठवण झाली देवप्रियेची!
अशीच एक प्रिया!


वाकडे बोलीत जाशी भांडताना सुंदरी
का तुला माहीत नाही प्रेम माझे नंबरी !!१!!

कापतो हा जीव माझा ऐकुनि मुक्ताफळे
भासली वाणी कडाडे दामिनी या अंबरी !!२!!

एकदा केल्या चुकीला का छळावे लाखदा
गोड तू बोलून दावी पुष्प जैसे उंबरी !!३!!

गे प्रिये आता अशी का पाहशी माझ्याकडे
भासती डोळे तुझे ते तप्त रस्ते डांबरी !!४!!

नाचतो तालावरी बोलावरी मी डोलतो
सांग तू ही का करावी आज शिक्षा झोंबरी !!५!!



१६. बाई माझी लिपस्टीक बिघडली

आजकाल सगळे प्रसिद्ध(!) लोक त्यांचे गाऱ्हाणे मनोगतावर घालण्यासाठी माझ्याच का मागे लागतात कोण जाणे? आता लातूरकरांना मी ओळखते तरी पण ही कोण कुठली राखी सावंत,हिचा एकही नाच मी पाहिलेला नाही. मागे राखी सावंतवर कोल्हापूरात खटला वाचलं होतं , तेवढीच ओळख! तर ही बाई तिच्या तथाकथित विनयभंगाबद्दल मराठी जनांकडून दाद मागायला चक्क माझ्याकडे आली. म्हणते कशी--

बाई माझी लिपस्टीक बिघडली
(चाल- बाई माझी करंगळी मोडली)

ऐन रातीला पार्टीमध्ये खोडी कशी काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!धृ!!
वाढदिवशी मी विश करताना
काय चावले कुठे मिकीला
गुपचूप येऊन पाठीमागून
माझी कळ का काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!१!!

पाठमोकळा ड्रेस घातला
मुका मिकीचा गाली घेतला (लिपलॉक करायचं काही कारण होतं का?)
मी ही चिडले , ठाण्यात पोचले
तक्रार ठोकली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!२!!

जरी स्वतःचा ड्रेस फेडला
मी ही शेवटी भारती बाला
ओठ द्यायचे का कोणाला
जरी लाज सोडली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!३!!

--- राखी सावंत
(भारवाही - साती काळे)



१७.उलटसुलट
उलटसुलट केले काळजाला जरासे
परत उचकले मी ड्रॉवराला ज़रासे

हसत बचत पेटी काढते आज खोडी
सतत गमवते ती साठलेले ज़रासे

चलबिचल कशाला होतसे मागण्याची
पसरि करहि मित्रांसमोरी मी ज़रासे

"सहज़ बघ विसरलो, पाकिटाला कसा मी"
(हळुच फ़सवती ते मित्र माझे जरासे)

विसर पडत नाही संपणाऱ्या खिशाचा
फ़िरुन छळत जातो सासऱ्याला ज़रासे

(चक्रपाणिच्या ओळखीने मालिनीशी पहिल्यांदाच हात मिळवलाय.त्यामुळे शब्दांच्या मोडतोडीबद्दल "जाणते" क्षमा करतील ही अपेक्षा!)



१८. फकीर

नुकतीच वैभव जोशी यांची गझल वाचून वांद्र्यात फिरत होते. ठिकठिकाणच्या नगरपालिकांचे 'निकाल' लागत असतानाच हे कुठूनसे कानी आले.

मतांत होता निकाल लागावयास थोडा उशीर झाला
जसा जसा लागला तसा प्रांत प्रांत माझा फकीर झाला

जरी नेसली कषाय वस्त्रे उणा कुठे मोहपाश आहे
मुलास गादी हवी म्हणोनी कधीच राजा अधीर झाला

असे कसे जाणले न शक्ती सुखासुखीही गळून जाते
कशा तुझे नाव घेतले वाघ वाघ हा बेफिकीर झाला

पदोपदी भास होत आहे , अजून माझाच राज
असे तया त्यागले म्हणोनिच कार्यकारी बधीर झाला

मला न पर्याय राहिला ! सैनिकास केले मुला हवाली
तया न पर्याय राहिला ! राष्ट्रवादी वा मानसेन झाला

मानसेन- म. न. से. वाला



१९. प्रयत्नपूर्वक शिकले होते !

प्रयत्नपूर्वक शिवले होते वर आधारित
(जित्याची विडंबनाची खोड.... जाता जात नाही)


कठिण पेपर सोडवताना--

प्रयत्नपूर्वक शिकले होते
पुन्हा विसरले.
डोके फुटले तरी उत्तरा
नाही स्मरले.

जाणिवपूर्वक जपली होती
कॉपी आतली.
परीक्षकाने मागुन पण ती
हाक मारली.

मी ना तसली किती सांगण्या
प्रयत्न केला.
ओली हळवी नजर पाहुनि
तोही फसला.



२०. नवीन साडी!

तसे म्हणाया नवीन , अगदी नवीन होत्या बऱ्याच साड्या
परंतू काही न बोलतो मी तू आणिली जर नवीन साडी

उगाच शोधायला तिला तू किती दुकाने फिरून आली
महाग होत्या जुन्या जश्या त्या, महाग होती नवीन साडी

हजारदा त्या बिलोरी मॉलापुढे बसूनी रडून घेतो
तुझ्या कशाला मनात भरली ती टांगलेली नवीन साडी

अजूनही हे कपाट बघूनी पुन्हा पुन्हा बुचकळ्यांत पडतो
पहा कधीही, तुडुंब गर्दी तरी कशाला नवीन साडी

टिव्हीवरी तुलसी नी पार्वती नटूनी अश्रू कशा ढाळती
हरेक भागासवे दिसावी तुला तयांची नवीन साडी

अता न हातांमधील पैशांवरी राहिला मुळी भरोसा
जुनाच सदरा मी घालतो मग तू घेतली जर नवीन साडी



२१.कवळी कवेत

एका आजोबांचं मनोगत ऐकताना मला मनोगतावरील एका कवितेतील कवळी कवेत या ओळी आठवल्या. सत्तरीतही जीवन समरसून जगणारे हे आजोबा आपल्या काही प्रॉब्लेम्सविषयी, नव्या दूरदर्शनविषयी , नव्या गायकांविषयी काय म्हणतात बघा--

हा गोड लाडवांचा सुटला सुवास सारा
कवळी कवेत आहे मी शोधतो बिचारा ॥

दाही दिशा प्रसन्न घर गोड गोड झाले
तोंडास सोडूनिया पण दात हाय गेले ॥

नाकात आपुल्याच घेतो हिमेश तान
माझे नशीब माझे बहिरे आधीच कान ॥

स्वर्गीय दृश्य सारे दूरदर्शनी नजारे
मी मात्र हळहळावे मज मोतीबिंदू का रे ॥

गात्रे शिणून गेली मन हिरवंगार आहे
मी एक सत्तरीचा तगडा जवान आहे ॥



२२. जरासे

ढगांआडल्या लाघवी चंद्रमाने
लपावे जरासे जरासे दिसावे ॥

मनीमानसी या तुझे रूप राणी
रुतावे जरासे जरासे ठसावे ॥

थरारून जावे असा स्पर्श होता
रुसावे जरासे जरासे हसावे ॥

चढे रात जैशी तसे भान दोघां
असावे जरासे जरासे नसावे ॥

सखे लाजुनी आठवावे पहाटे
उसासे जरासे जरासे विसावे॥

सोनुचे अजब जग

नदिच्या काठावर तायडिच्या बाजुला नुसतं बसुन बसुन सोनु अगदी कन्टाळुन गेली होती.तायडी तर मस्त पुस्तक वाचनात मग्न होवुन गेली होती .तसा एकदोनदा सोनुने तायडिच्या पुस्तकात डोकावायचा प्रयत्न केला पण चित्रे नसलेलि पुस्तके वाचण्यात काय मजा? बसल्या बसल्या फ़ुले गोळा करुन हार गुम्फ़ुया असे तिने ठरविले. भर दुपारी एवढे कष्ट घ्यावेत का असा विचार करतानाच लाललाल डोळ्यांचे एक गोरेपान ससोबा तिला दिसले. आता ससा दिसणे ही काही तिच्या द्रुष्टिने नवलाईची गोष्ट नव्हती; अगदी ते ससोबा पळता पळता 'अरे बापरे मला उशिर झाला वाटत ' असे म्हणत होते तरी तिला काही वेगळे वाटले नाही (नंतर मात्र ससा कसा बोलला हे आठवुन तिला फारच गम्मत वाटली. पण तेव्हा मात्र सगळे बरोबर वाटत होते.)जेव्हा ससोबांनी पळायचे सोडुन ,थांबुन, कोटाच्या खिशातुन घड्याळ काढुन बघितले तेव्हा मात्र ही काही वेगळीच भानगड दिसते हे तिच्या लक्षात आले.तो पर्यन्त घड्याळ ,घड्याळच कशाला कोट घालणारा ससा तरी तिने कुठे पाहिला होता ? हा प्रकार काही वेगळाच दिसतोय असे म्हणून ती ससोबांच्या मागे धाऊ लागली .आणि ससोबा एका बिळात गुडुप होताच सोनुही मागचा पुढचा विचार न करता त्या बिळात शिरली.




ससोबांच बिळ म्हणजे एक भूमिगत आडवा रस्ताच होता,लांबच्या लांब.पण ससोबांच्या मागे पळता पळता सोनु धप्पकन एका खोल-खोल खड्ड्यात पडु लागली. बिळ खूपच खोल होतं की सोनु स्लो मोशन मध्ये पडत होती नकळे पण किती तरी वेळ ती नुसती पडतच होती.
मध्येच एकदा खाली पाहुन आपण नक्की कुठे पडतोय याचा अंदाज घेण्याचा तिने प्रयत्न केला पण खाली मिट्ट काळोख होता.मग तिने आजुबाजुला बघायला सुरुवात केली.पूर्ण भिंत भरुन नुसती कपाटेच कपाटे होती.खाऊच्या बरण्या,चित्रांची पुस्तके असं काय काय भरलं होतं त्यांत.खुंट्यांवर काही विचित्र नकाशेही टांगले होते. नकाशांवरुन सोनुला भूगोल आठवला. "बापरे,मी इतकी खोल चाललेय की पृथ्वीच्या मध्यबिंदुपाशी असेन. कुठला अक्षांश आणि कुठ्ला रेखांश कुणास ठाऊक?" वास्तविक अक्षांश -रेखांश म्हणजे काय याचा सोनुला काही पत्ता नव्हता.पण हुशारी दाखवणं तिला फार आवडायचं , आता ऐकायला कोणी नसलं म्हणून काय झालं.
"बहुदा पृथ्वी पार करुन,पलीकडुन बाहेर येईन मी.तिथली माणसं उलटी चालत असतील नै.खाली डोकं वर पाय. विरोधाभास."
आता मात्र ऐकायला कोणी नव्हतं त्याचं सोनुला बरं वाटलं कारण 'विरोधाभास' हा शब्द नक्कीच चुकला होता. आणि अनोळखी ठिकाणीसुद्धा कोणी आपल्याला हसु नये असं तिला वाटत होतं. "कुठला देश असेल बरं तो , इंग्लंड की अमेरिका?"
मला वाटतं , मला कुणालातरी विचारायला लागेल,ते पण इंग्रजीतून.तसं मला इंग्रजी येतं म्हणा(सोनुच्या शाळेत पहिलीपासुन इंग्रजीही शिकवायचे. "एक्सक्यूज मी मॅडम. व्हॉट नेम कंट्री? बरोबर ना?" सोनु फाड्फाड इंग्रजी फाडत होती.
काय बाई म्हणेल ती मॅडम,"कुठली ही अडाणी मुलगी ,जिथे राहते तिथलं नाव पण माहिती नाही "
"छे,छे मला कुणी अडाणी म्हटलेलं नाही चालणार. मी गुपचुप कुठल्यातरी दुकानाच्या पाटीवर नांव वाचेन.पण दुकानाच्या पाटीवर देशाचं नाव लिहितात का?"
पडता पडता मध्येच "गुलाबजाम" असं लिहिलेली बरणी तिला दिसली. मोठ्या उत्सुकतेने तिने ती उचलली.(पडता-पडताच) पण ती बरणी रिकामी होती. वैतागुन ती खालीच फेकुन देणार होती पण खालच्या ससोबाला लागलं तर. तिने पडता पडताच खालच्या एका कप्प्यात ती बरणी ठेवली.
माझी मनी इथे असती तर किती मजा आली असती. सोबतही झाली असती पडायला. "मने,कुठे आहेस गं तू? तुला भूक तर लागली नाही ना? तू इथे असतीस तर तुला एखादा उंदीर नक्कीच मिळाला असता खायला. उंदीर नाही तर वट्वाघुळ तरी.तुला माहित्येय ते अगदी उंदरासारखंच दिसत. इंग्रजीमध्ये तर आर ए टी -रॅट म्हणजे उंदीर आणि बी ए टी -बॅट म्हणजे वट्वाघुळ. आणि तू म्हणजे सी ए टी कॅट." परत एकदा फाड्फाड इंग्रजी सुरु झालं.
"पण काय गं,कॅट इटस रॅट सारखं कॅट इटस बॅट असतं का? डज कॅट इट बॅट? डज कॅट इट बॅट ?"
हळु-हळु पडण्याचा वेग वाढु लागला आणि " डज कॅट इट बॅट ,डज बॅट इट कॅट "असं काहीतरी बोलत एका गुंगीतच सोनु खाली आदळली.

पडण्याचा कार्यक्रम संपला एकदाचा! आवाज जरी "धप्प" असा झाला तरी सोनुला अज्जिबात लागलं नाही.फ्रॉक झटकत ती आजुबाजुला पाहु लागली.वरती मिट्ट काळोख होता आणि समोर एक लांबलचक रस्ता. रस्त्याच्या टोकावर घाईघाईने जाणारे मगाचचे ससेबुवा अजून दिसत होते.
"शेपूट माझं" असे काहीसे पुटपुटत ते लगबगीने चालले होते.आज्जी जशी "कप्पाळ माझं" म्हणते ना तस्सच. त्याना गाठायला सोनु पळु लागली तर ते दिसेनासेच झाले कुठेतरी. सोनुमात्र एका भल्यामोठ्या हॉलमध्ये येऊन पोचली. हॉल कसला तो एक 'दरवाजेमहालच' होता.बघावं तिकडे आपले दरवाजेच दरवाजे! आणि सगळे कुलुपं लावून बंद. "अय्या,मग मी आत कुठुन आले,चिवित्रच आहे सगळं."
रांगेत तिने सगळी कुलुपे खेचून उघडायचा प्रयत्न केला, पण छे, एकही उघडेना.शेवटी ती महालाच्या मध्यभागी आली. एवढ्यात तिथे एक काचेचे टेबल उपटले होते,आणि टेबलावर एक छोटीषी सोनेरी चावी. "ह्या इटुकला चावीने ही मोठाली कुलुपं कशी उघडणार बाई ?"
इतक्यात एका पडद्यामागे लपलेलं एक पिटुकलं दार तिला दिसलं. दार कसलं . पंधरा इंचांची एक छोटीशी झडप होती ती. तिच्या कुलुपाला मात्र आपली सोनेरी चावी एकदम फ़िट्ट बसली. सोनुने झडप उघडुन पहिलं तर समोर एक बिळ, आणि बिळाच्या टोकाला एक सुंदरशी बाग होती. ''या बंद महालापेक्षा त्या बागेत कित्ती मजा येईल ना? पण उपयोग काय? या झडपेतून माझं डोकंपण जात नाहिये पलीकडे. आणि समजा गेलंच डोकं पलीकडे तर माझ्या खांद्यांशिवाय ते काय करिल बिच्चारं एकटं?"
सोनुचे विचार नुसते ऊधळत होते. "मला छत्रीसारखी स्वतःची घडी कशी करायची हे माहीत असतं तर मी नक्की तसं केलं असतं." सकाळपासून इतक्या चिवित्र गोष्टी घडत होत्या की स्वतःला घडी घालणारी माणसे असु शकतात हे सोनुला कळलं होतं.
"या दरवाजासमोर नुस्तं डोकं फोडण्यात काय अर्थ नाही, चला बघुया टेबलावर एखादी नवी चावी प्रकटते का?"एखादी मोठी चावी किंवा 'अशी घाला स्वतःची घडी' असं लिहीलेलं एखादं पुस्तक तरी नक्किच असणार अशी तिची खात्रीच होती. पण यावेळी टेबलावर एक सुंदरशी बाटली प्रकटली होती, तायडिच्या परफ़्युमच्या बाटलीसारखी गोड. बाटलिवर लेबल होतं "पिऊन टाका".
"वा रे वा ! म्हणे पिऊन टाका. आम्हाला माहित्येय बरं काय करायचं ते. पहिल्यांदा बाटलीवर कुठे 'विषारी पदार्थ, लहान मुलांना हात लाऊ देऊ नका ' असं लिहीलं नाही ना ते पहायचं अस्तं म्हटलं!"
आईने दिलेले सल्ले बहुतांशी उपयोगी असतात हे सोनुला अनुभवाअंती (चांगलंच) कळलं होतं. म्हणजे मेणबत्तीवर जास्त वेळ बोट धरलं तर पोळतं, चाकुशी नीट खेळलं नाहीतर हात कापतो वैगेरे,वैगेरे.
पण या बाटलीवर असं काही लिहीलं नव्हतं. हळुच सोनुने एक थेंब चाखुन पाहिला. ओ हो! काय भन्नाट चव होती. कॅडबरी, बासुंदी ,गुलाबजाम बरोबरच कैरी आणि चिंचेचीसुद्धा चव होती त्या थेंबात.तिने ती बाटली अधाशासारखी पिउन टाकली.
---- क्रमशः

प्रायोजित साती

प्रायोजित साती


आजकाल हे मला फार म्हणजे फारच जाणवायला लागलंय. म्हणजे या पूर्वीही असंच होतं, असंच चालतंही सगळीकडे , पण मला मात्र आता हे कुठेतरी खुपायला लागलंय.
म्हणजे त्याचं असं झालं की मी गेल्या आठवड्यात काही महत्त्वाच्या धड्यांच्या छायाप्रती काढायला(शुद्ध मराठीत सांगायचं तर इम्पॉर्टंट टॉपिक्सच्या झेरॉक्स करायला) गेले होते. तिथे नेमका एक एम. आर. (औषध कंपनीचा प्रतिनिधी) आला. "अरे, अरे मॅडम... हे काय करताय? अशी छोटी मोठी कामे आम्हाला सांगत चला की " "अं .., हो, नाही.. थोडी घाई होती ना म्हणून मीच आले स्वतः"'घाई होती ना' म्हणजे? घाई नसती तर मी एखाद्या एम. आर. ला (थोडक्यात आम्ही एमार म्हणतो) फोन केला असता. त्याने माझ्याकडून पुस्तक घेऊन प्रती काढून दिल्या असत्या आणि त्याबद्दल दोन मिनिटे त्याची त्याच्या कंपनीच्या औषधासंबंधीची बडबड मला ऐकून घ्यायला लागली असती.
त्या दिवसापासून हे फारच मनात घोळायला लागलंय की किती काय काय आपण या एमारांकडून घ्यायला लागलोय.आयुष्यातल्या किती गोष्टी हे एमार प्रायोजित करायला लागलेयत..
रोजचा दिनक्रम.
मी गजर झाल्यावर सकाळी उठते --- घड्याळ प्रायोजितदात घासते --- ब्रश, टूथपेस्ट प्रायोजितस्नान करते--- साबण, शांपू, कंडिशनर इतकंच काय टॉवेलसुद्धा प्रायोजितचहा करते--- दूध पावडर, टी बॅग्ज, साखर, मग, चमचे सगळं काही...अभ्यास करते--- बरीचशी पुस्तके ,नोटस् , वह्या, पेन सगळं काही प्रायोजित.तयारी करून कामाला जायला निघते तर महागडी कॉस्मेटिक्स सुद्धा प्रायोजित.ओ.पी.डी. त मी जाण्याअगोदरच एमार येऊन बसलेले असतात. हातात त्यांच्या कंपनीच्या जाहिराती आणि बॅगेत प्रायोजित वस्तू. ''पेशंट बघेपर्यंत एकाही एमारला आत पाठवायचं नाही' असा सज्जड दम मी दारावरच्या शिपायाला दिलेला असतो म्हणून आजकाल हे एमार मध्येमध्ये घुसत तरी नाहीत. पण मग शिपायाला सांगून त्याच्या हातून मध्येच परदेशी कंपनीचा ऑरेंज ज्यूस पाठव, मोठालं चॉकोलेट पाठव असं चालूच असतं. पेशंट संपताच टोळधाडीसारखे घुसतात सगळे आत.
"मॅडम, हे नवं अँटीमलेरियल--- याचे हे फायदे-- हे इतरांपेक्षा चांगलं" सँपलच्या दोन गोळ्यांबरोबरच एखादं उंची पेन, एखाद्या मेडिकल जरनलाचा नवा इश्यू ज्यात या औषधाची भलामण केलेली असेल, आणि एखादी प्रायोजित भेट किंवा गिफ्ट. बरं ही गिफ्ट काय असेल याचा त्या प्रॉडक्टशी काही संबंध नाही.मलेरियाच्या औषधाबरोबर 'येरा' चे ग्लासेस, रक्तदाबाच्या गोळ्यांबरोबर कपडे ठेवायचं बकेट, पेनकिलरबरोबर इमर्जन्सी लाइट काहीही. एक पठ्ठा तर डायबेटीसच्या गोळ्यांबरोबर नेहमी शुगरक्युब्ज(साखरेचे ठोकळे?) देतो. "मॅडम यू विल रिमेंबर मी एवरी मॉर्निंग " ही वर साखरपेरणी.
औषधाच्या किंमतींच्या चढत्या भाजणीप्रमाणे गिफ्टची किंमतही चढत जाते. एखादं नवं अँटिबायोटिक आलं की सगळ्या कंपन्या तो मॉलेक्यूल लाँच करायला धावतात. (रेणू प्रकाशित करायला? बाजारात आणायला?) 'आमचाच मॉलेक्यूल कसा ओरिजिनल, कसा भरवशाचा, कसा इंटरनॅशनल' हे सांगायला सोबत गिफ्टची खैरात असतेच. नव्या मॉलेक्यूलचं लाँच नेहमी एखाद्या पंचतारांकित हॉटेलात . तिथे नावापुरतं एखादं लेक्चर झालं की खाणं आणि पिणंही.
या दिवाळीत या एमार लोकांनी पणत्या, कंदिलांपासून रांगोळीपर्यंत सगळं दिलं. मिठाया आणि ड्रायफ्रुट तर विचारूच नका. माझ्या रूममधलं फर्निचर आणि काँप्युटर सोडला तर जवळजवळ सगळ्या वस्तू स्पॉन्सर्ड आहेत. आता नको असे सांगितलं तरी घराबाहेर वस्तू ठेवून जातात.
आता हे सगळं टाळणं आमच्या आवाक्याबाहेर गेलंय. माझा एक मित्र आहे त्याचं नांव ज्ञानेश्वर. त्याच्या स्वभावामुळे त्याला सगळे संत ज्ञानेश्वरच म्हणतात(त्याच्या खऱ्या नांवात संत नाही हे आता त्यालासुद्धा आठवत नसेल). मी सोडून हे सगळं ज्याला खटकतं असा हा एकमेव प्राणी. तो खायच्या प्यायच्या वस्तू किंवा 'कंझ्युमर प्रॉडक्ट' या सदरात बसणाऱ्या कोणत्याच वस्तू एमारांकडून घेत नाही. पण पुस्तके, नोटस्, जर्नल्स,अभ्यासाच्या सीड्या घेतो. मला मात्र प्रश्न पडतो की असं करणं जास्त योग्य ठरेल की काहीच न घेणं?
एक दिवस माझ्या हुशार मित्राशी चर्चा करत असताना(हा अभ्यासाबरोबरच व्यवहारातही हुशार आहे असे सगळे म्हणतात) हा विषय काढला.
"हे बघ, एखाद्याकडून गिफ्ट घेतल्यावर तू त्याचंच प्रॉडक्ट वापरायचं असं करतेस का?""नाही""समजा, तुझ्या अनुभवावरून एखादं प्रॉडक्ट कमी प्रतीचं आहे असं लक्षात आलं तरीही एमार गिफ्ट देतो म्हणून तू ते प्रॉडक्ट पेशंटला लिहून देतेस का?""नाही""मग झालं तर..तुला एवढं हळहळायचं काही कारण नाही""तसं नव्हे रे हुशार, पण बघ बाजारात इतक्या कंपन्या एकच मॉलेक्यूल विकतात, जे एमार सतत येतात किंवा काही तरी देतात त्यांचंच प्रॉडक्ट आपण कळत नकळत देतो ना? ही सुद्धा एक प्रकारची चूकच नव्हे का?""कसली चूक कर्माची, अगं हे मार्केटिंगचं युग आहे, जो चमकतो तो खपतो""तरीपण.. आता तुलाही माहित्येय ते 'अबक' औषध एक कंपनी दहा रु. ला विकते आणि दुसरी पंचविसाला, दुसरीचा मालक तिच्या प्रमोशनसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतो म्हणून आज तो ब्रँड मार्केटमध्ये चालतोय ना? अन्यथा हेच औषध तयार करायला चार रु सुद्धा खर्च होत नाहीत""त्यात काय मोठंसं, कोका कोला पण हेच करतं""अरे पण कोका कोला सॉफ्ट ड्रिंक आहे रे , हेच तत्त्व औषधांसाठी कसं वापरता येईल?""साती, तू जास्त विचार करू नकोस, नाहीतर तुझं नांवही उद्यापासून 'संत सातीमा' होईल" पुढे काय बोलणार?
पण आता हे वाढतच चाललंय. इतकी प्रलोभनं आहेत, की बळी न पडणारा मूर्ख ठरतोय. हे खपवा आणि सिंगापूरची ट्रीप मिळवा, ते खपवा आणि प्लाज्मा टि. व्ही. मिळवा.. काय वाट्टेल ते प्रायोजित करू पण माल खपवा. आजकाल हृदयरोग्याच्या धमन्यांत स्टेंट कुठला बसवायचा हा निर्णयसुद्धा प्रायोजित व्हायला लागलाय. सरकारने वैद्यकीय व्यवसायाला ग्राहक संरक्षण कायदा लागू केलाच आहे, त्यामुळे आजकाल फारमा कंपन्या दुकानदार झाल्यात, रुग्ण एक ग्राहक आणि डॉक्टर..?
आजचा डॉक्टर एक दलाल होत चाललाय.

साम्राज्य!

सदर कथेतील सर्व जागा, व्यक्ती आणि घटना पूर्णपणे काल्पनिक असून वास्तवातील कुठल्याही जागा, व्यक्ती आणि घटनेशी त्यांचे साम्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


साम्राज्य!
त्या रुग्णालयात फिरताना त्याला अगदी वेगळं वाटत होतं. चकाचक प्रवेशद्वार, दाराजवळ स्वागतिका, प्रत्येक वार्डच्या बाहेर दिसेल असा लिहिलेला वार्ड क्रमांक आणि दाराबाहेर हसतमुख चपरासी. वार्डातसुद्धा अंतर राखून बसवलेल्या खाटा, प्रत्येक खाटेवर जणू कालच नवीन घेतलीय अशी वाटणारी शुभ्र चादर, तितक्याच नव्या शुभ्र इस्पितळी गणवेशातला रुग्ण, तोही एका खाटेवर एकच. हसतमुख परिचारिका आणि तिचाही नवानवासा वाटणारा गणवेश!
त्याला आपलं इस्पितळ , आपलं म्हणजे मुंबई म. न. पा. चं इस्पितळ आठवलं. तो गोंधळ, ती रुग्णांची गर्दी, ते एका खाटेवर आणि खाटेखालीही दोन रुग्ण. घांणेरड्या चादरी, तोंडाला दारुचा वास येणारा वॉर्डबॉय आणि (रुग्ण आणि शिकाऊ डॉक्टरवर सारख्याच प्रेमाने) वसावसा ओरडणारी परिचारिका.
इथे मात्र प्रत्येक खाटेशेजारी रुग्णाचे नाव लिहिलेला फलक, बाजूच्या टेबलावर औषधाच्या बाटल्या, एका स्टँडवर वेगवेगळ्या रंगात आणि आकारात अडकवलेल्या शिरेतून द्यायच्या औषधाच्या बाटल्या, त्याही पूर्ण भरलेल्या. किती तत्पर असतील इथल्या परिचारिका ! त्याच्या मनपी इस्पितळात रुग्णाचे नातेवाईक दहावेळा जाऊन 'बाटली संपली' असं सांगणार तेंव्हा कुठे नर्सबाई जागच्या उठतात. तोपर्यंत लटकताहेत बाटल्या आपल्या रिकाम्याच्या रिकाम्या. इथल्या काही वार्डात कुठे बँडेज केलेले, कुठे प्लास्टर केलेले रूग्णही दिसत होते. पण सगळं कसं छान स्वच्छ. रुग्णही अगदी हसतमुख , वेदनेचा लवलेशही चेहऱ्यावर नसलेले.
''बरोबर आहे, शेवटी आजूबाजूच्या वातावरणाचाही परिणाम होतोच ना रुग्णावर! इतकं छान इस्पितळ असेल तर कुठलाही रोगी आनंदीच दिसणार.''
आता तुम्ही म्हणाल हा मनपात गेल्यावर्षापर्यंत शिकणारा आपला हिरो इकडे या चकाचक इस्पितळात काय करतोय?तर त्याच असं झालं होतं की नुकतीच इंटर्नशिप संपवून आणि पुढच्या अभ्यासाची प्रवेशपरीक्षा देऊन तो घरी जायच्या तयारीत होत तेंव्हा हॉस्टेलमध्ये बांधाबांध करत असताना त्याचा **** या गावात राहणारा मित्र आला. त्याने एक सही ऑफर आणली होती. त्याच्या गावातल्या वैद्यकीय महाविद्यालयात फक्त एक दिवस मुलांचे दोन तासांचे लेक्चर घेण्यासाठी काही नुकतेच पास झालेले डॉक्टर पाहिजे होते. यायचा जायचा खर्च, जेवण आणि २००० रु. मिळणार होते. काही मुलांना घेऊन हा गावी जाणार होता. ऑफर काही वाईट नव्हती आणि पुढच्या एक महिन्यापुरते हातखर्चासाठी पैसे मिळणार असल्याने तो ही जायला तयार झाला.
ते गांव मोठं झोकदार होतं. *** नांवाच्या राजकारण्यामुळे चांगलंच प्रकाशात आलेलं. *** साहेबांच्या फॅक्टऱ्या ,अनेक उद्योग ,राजकारणात मोठं नाव, सध्याचं मंत्रिपद, पुढेमागे मुख्यमंत्री होण्याच्या शक्यता! त्यांच्याच प्रसिद्ध शिक्षणसंस्थेचं हे मेडिकल कॉलेज. तीन चार वर्षांपूर्वीच सुरू झालं होतं. इथेच व्याख्यान देण्यासाठी तो आणि त्याचे काही मित्र निघाले होते. त्याचा ऍनॉटॉमी (शरीररचनाशास्त्र) हा विषय पक्का असल्याने ह्युमेरस म्हणजे हाताचं हाड या विषयावर तो व्याख्यान देणार होता.
व्याख्यानाच्या दिवशी सकाळी त्याला स्टाफरूममध्ये बोलवण्यात आलं. 'डॉक्टर अमुक तमुक, व्याख्याता शरीररचनाशास्त्र ' असं लिहिलेला शुभ्र पांढरा ऍप्रन त्याला देण्यात आला. स्वतःच नाव असं लिहिलेलं पाहून तो सुखावलाच मनात! पहिल्या वर्षाच्या मुलांना शिकवायचं होतं. तो धडधडणारी छाती घेऊनच वर्गात शिरला.
मुलं अगदी शांत, दंगा न करता बसलेली पाहून त्याला आश्चर्यच वाटलं, पणमग त्या शांततेमुळेच हायसं वाटून त्याने बॅगेतून ह्युमेरस काढून शिकवायला सुरुवात केली. मध्येच चार पाच सुटाबुटातील माणसे ,एक दोन उंची साड्यांतल्या बायका येऊन मागच्या बाकावर पाचसहा मिनिटे बसून गेले. आपले शिक्षणमहर्षी मंत्रीही त्याना काहीतरी सांगत होते. ती पाचसहा मिनिटे तो थोडा विचलित झाला, पण नंतर मात्र आपला आवडता विषय शिकविण्यात रंगून गेला. त्या मोठ्या माणसांच्या येऊन जाण्यापर्यंत शांत बसलेली मुलं आता मात्र बोलू लागली ,काही शंका विचारू लागली. व्याख्यान संपल्यावर तो म्हणाला ,
''मित्रांनो, आता रूमवर परत गेल्यावर सर्वांनी आपल्या सेटमधील ह्युमेरस घेऊन शिकवलेल्या भागाची उजळणी करा." "सर, आपल्या सेटमधील म्हणजे--" आचरट वाटणारा प्रश्न निरागस स्वरात आला. "आपल्या म्हणजे -तुम्ही विकत घेतला असेलच ना बोनसेट अभ्यासाला!""नाही, आमच्या कॉलेजात फक्त दोन सेट आहेत तेच आम्ही वापरतो"
तो चकीतच झाला. हे म्हणजे स्वतःकडे पेन्सिल नसताना चित्रकला शिकण्यासारखं होतं. त्याला आठवलं त्याच्या कॉलेजात प्रत्येकाकडे एक किंवा किमान दोघात एकतरी बोनसेट असतो.खऱ्याखुऱ्या माणसाची खरीखुरी हाडे हाताळल्याखेरीज माणसाची पूर्ण रचना शिकणार तरी कशी? तो आणि त्याचे मित्र तर पहिल्या वर्षी वाचता वाचताच पुस्तकांप्रमाणे एकदोन हाडं , कवटी इ. डोक्याजवळ घेऊन झोपत असत, आणि इथे या पूर्ण कॉलेजात चक्क दोन सेट फक्त!
तास संपल्यावर तो स्टाफरूमकडे परतू लागला. परत तेच चकाचक वॉर्ड आणि चकाचक पेशंट. काहीतरी चुकतंय असं त्याच्या आत्ता लक्षात येऊ लागलं होतं. स्टाफरूममध्ये ओळख करून देण्याच्या कार्यक्रमात तर सुटातल्या त्या माणसांशी त्याची ओळख जेव्हा ' हे आमचे विद्यार्थीप्रिय व्याख्याते' अशी करून देण्यात आली तेंव्हा त्याची खात्रीच पटली की काहीतरी गोच आहे. शेवटी सगळे सूटबूट निघून गेले आणि बरोबर सहा वाजता दोन हजाराचं पाकीट त्याच्या हातात पडलं.
मित्राचं घर जवळच असल्याने तो त्याच्याकडेच उतरला होता. मित्राकडे आपल्याला जाणवलेल्या गोष्टी तो जेव्हा बोलला तेंव्हा मित्र काहीच म्हणाला नाही फक्त उद्या तुला मजा दाखवतो म्हणाला. रात्री लांबवर दिसणाऱ्या *** साहेबांच्या रेस्टहाऊसवर बराचवेळ रोषणाई नी लगबग दिसत होती.
दुसऱ्या दिवशी त्याच हॉस्पिटलात मित्र घेऊन गेला. बाहेर निवडणुकांच्या वेळेला पक्षाच्या कार्यालयात लागतात तशा गाड्या लागल्या होत्या. ठेकेदार मोजून माणसे गाडीत भरत होता. कालचे रुग्ण आज आरामात बॅंडेज वैगेरे सोडून तंबाखू चोळत गाडीत बसत होते. सगळ्या वॉर्डातून चादरी , परिचारिका आणि पेशंट गायब झाले होते. दूर कुठे एका कोपऱ्यातल्या वॉर्डात सातआठ खरेखुरे रुग्ण विव्हळत पडले होते तेवढेच!
"हा काय प्रकार?'' तो म्हणाला.
"काही नाही , मेडिकल कौन्सिलचं इंस्पेक्शन होतं, काल संपलं."
"काय?"
त्याच्या लक्षात सगळा प्रकार आला."त्या नव्या चादरी ते स्वच्छ रुग्ण, सगळंच खोटं होतं म्हणजे!"
"अरे तू पण तर खोटांखोटांचं परमनंट लेक्चरर होतास ना? आता 'रुग्ण आणि शिक्षकांची संख्या आवश्यकतेप्रमाणे आहे' या अटीच्या पूर्ततेमुळे या कॉलेजला मेडिकल कौन्सिलचे रेकग्निशन मिळेल आणि पैसे भरून या नव्या कॉलेजात डॉक्टर व्हायला आलेल्या पोरांचे पैसे सार्थकी लागतील"
'शीः! इतक्या हलक्या कृत्यात, अशा फसवणुकीत सहभागी झालो आपण! आता उद्या या कॉलेजला रेकग्निशन मिळेल, संपूर्ण साडेचार वर्षांच्या शिक्षणात हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण बघितलेल्या पोरांना डिग्र्या मिळतील. आईबापाने सीट मिळवण्यासाठी ओतलेला पैसा ते चुकीचे उपचार करून आपल्या रुग्णांकडून वसूल करतील . आणि या सगळ्या पापात आपण पण सहभागी असू.'
शिक्षणसम्राटांचे साम्राज्य सोडून येताना मिळालेले २०००रु. आता त्याच्या खिशात टोचू लागले होते.

HOT PLATE 3

वरिष्ठांचा सल्ला
आपल्या वसतिगृहांत तेल,वायू,वीज यांपैकी कशावरही चालणारी शेगडी वापरण्यास मनाई आहे.आपल्याकडे शेगडी आहे ही बातमी शक्यतो दडवून ठेवावी.
महिन्यातून एकदा तरी अधिक्षिकाबाई झडती घ्यायला येतात त्यामुळे गेट्वरच्या मावशींना पटवून ठेवुन बाई आल्याची आगाऊ सूचना देण्यास सांगावे.(या धरती बाईंच्या नशिबात अजूनही दररोज आईच्या हातचे खाण्याचे भाग्य असल्याने शेगडीविषयीच्या आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसत.)
धरतीदेवींचे शेग़डीच्या सूर्यासाठी परिभ्रमण सुरु झाले की आपापल्या शेगड्या कचराकुंडीत किंवा बादलीत वर कपडे ठेऊन न्हाणीघरांत लपवून ठेवाव्यात(बाई खोलीतील एक जागाही बघायची शिल्लक ठेवत नाहीत.
आपल्या रुमबाहेर किंवा कचराकुंडीत मॅगीच्या रिकाम्या पिशव्या, भाज्यांची साले इत्यादि टाकू नये.बाई 'ता' वरुन 'ताकभात' ओळखतात.
सारे पाककौशल्य बाई शक्यतो येणार नाही अशावेळी म्हणजे रात्री दाखवावे.
खोलीत गुप्तपणे काही शिजत असताना दारावर टकटक झाल्यास दाराबाहेर शत्रू नाही याची खात्री करुन मगच दार उघडावे.
काही इशारे
शेगडी जपून वापरावी,वसतीगृहाचे तारतंत्र सुटलेले आहे.
शक्यतो झटपट होणारे आणि चट्पट चव असणारे पदार्थच करावे.
एकही भांडे जादा वापरु नये, शक्यतो पातेल्यातूनच चमच्याने किंवा हाताने खाता येईल हे पहावे.(भांडी तुम्हालाच घासावी लागणार आहेत.
शक्यतो लाकडी दांडा असलेली भांडी(पातेली,चमचे,पक्कड इ. वापरावे.)

अर्थात आम्हांला इतका अभ्यास असायचा, की क्लिष्ट असे काही आम्ही बनवले नाही. काही मुली अशा पाकनिपूण होत्या की काय म्हणाल ते त्या बनवू शकायच्या.पण त्या गावांस आम्हां जाणे नसल्याने त्या वाटेचे नाव आम्ही पुसले नाही.
पण जे काही केले त्यामुळे आमचे काही क्षण सुखकर झाले. डब्बेवाल्या मामांचे अत्याचार सहन करण्याची ताकद आमच्या पोटांस मिळाली.कधी पापड भाज,कधी मिरची तळुन खा असे करुन आम्ही ती साडेपाच वर्षे ढकलली. त्यातील काही इटुकल्या-पिटुकल्या पाककृती पुढच्यावेळी सांगेन.

HOT PLATE 2

शेगडीमुळे जणु क्रांतीच झाली.मी आणि माझी मैत्रीण चहाच्या शौकीन असल्याने दुसऱ्या दिवशी चहा करायचा असे ठरवले.जे‍. जे.मध्ये प्रत्येकीला सेपरेट रुम असल्याने रुपा नावाचा प्रकार नव्हता.पण स‌शे(सख्खी शेजारीण असायची). तशी माझी धनु.धनुला जरा स्वैपाकाचे ज्ञान होते.त्यामुळे चहापुड, साखर,दुध आम्ही कॉलेजमधुन येताना घेउन आलो.एक पातेली आणि दोन कप सुद्धा आणले. पहिलाच प्रयत्न असल्याने दार घट्ट बन्द करुन आणि दारावर 'डोंट डिस्टर्ब 'अशी साईन करुन (ही आमच्य कॉलेजातील कोड साईन होती.दाराची कडी वर म्हणजे 'स्लीपिंग,डोंट डिस्टर्ब !') आम्हाला कुणाला सल्ला विचारायचा म्हणजे खुप कमीपणा वाटे.त्यामुळे आमचा आम्ही चहा करु लागलो.
सगळ्या अर्धा लिटर दुधाचा चहा कसा पिणार म्हणुन अर्ध दुध एका पेल्यात काढलं.उरलेल दुध शेगडीवर ठेवल.
"दुध गरम झालं की साखर घालायचि आणि थोडिशी उकळी आली की चहापत्ति ." धनुने उपयुक्त माहिती पुरवली.
आम्ही मग दुध गरम व्हायची वाट बघत रहिलो. पाच मिनिटे झाली,दहा मिनिटे झाली दुध काही गरम होइना. थोड्या थोड्या वेळाने चमचा घालुन धनु दुध हातावर घेउन बघत होती. मी मग म्हटलं , नशिब त्या घिश्यापिट्या जोकसारखं आपण शेगडी ऑन करायला विसरलो नाही. कारण अगदी आठवणीने शेगडी ऑन करुन कॉइल गरम झाल्यावरच आम्हि भान्डे ठेवलं होते.
'अग, आज प्रॅक्टिकलच्यावेळी काय झालं महित्येय ' असे म्हणून मी काहितरी गंमत सांगायला सुरुवात केली आणि चहा- बिहा विसरुन आम्ही मस्त गप्पा मारु लागलो.थोड्यावेळाने कसला तरी वास येऊ लागला बघतो तर काय, सगळं दुध भावनेच्या भरात भान्ड्याबाहेर उड्या टाकुन कॉइलकडे चाललेलं. "अगं भान्डं उतर लवकर,"
" कसे उतरु. "
आम्ही पक्कड किंवा धनुच्या भाषेत गावी आणलीच नव्हती. "रुमालाने पकड आणि उतर."
रुमाल शोधेपर्यंत दारावर जोराने धडधड होऊ लागली. दार उघडताच पाहतो तर काय समोर मैत्रिणींचा हा घोळका उभा होता‌. सगळ्या पळतपळत आत आल्या.
"अय्या शेगडी,ती पण चक्क तुझ्याकडे!" एक किंचाळली. 'स्वयंपाक वैगेरे बायकी (ही , ही ) कामे मी कधीच करणार नाही ' हा माझा बाणा सगळ्यांना ठाउक होता.
" बापरे, आम्हाला वाटलं काय जळतय?"
"हो ना.एक तर रुमची कडी वर होती आणि परवापासुन तू सारखी घरची आठवण काढुन रडतेयस ना !" दुष्ट निशा म्हणाली. 'वा,म्हणजे ह्या बयाला काय वाटलं मी सुसाईड करतेय?'
जेव्हा खरा प्रकार सगळ्याना कळला तेव्हा सगळ्या हसु लागल्या. मग मझ्या सिनीयर्सनी शेगडीविषयी खूप सल्ले दिले. आज चहा करणे शक्यच नव्हते कारण सगळं दुध जळुन कॉइलच्या रोमारोमात जाऊन बसलं होतं.ते कसबस काढुन कच्चं दुध पिऊन आमचा 'ओळख हॉट्प्लेटची' हा हॉटप्लेट रेसिपीजचा पहिला धडा सम्पला.
अथ प्रथमोध्यायः!

HOT PLATE!

स्वयंपाक करणॆ या गोष्टिशी माझे जन्मापासुन वाकडे! लहानपणी गरजच नव्हती पण मोठं झाल्यावर सुद्धा आजी,आई आणि साक्षात बल्लवाचार्य बाबा घरात असल्याने अगदी चुकुनसुद्धा स्वयंपाक घराशी तोंडओळखही झाली नाही.पण एक होतं, गावात रहात असल्याने घराबाहेर खायची वेळ जास्त कधी आली नव्हती.चुकुन कुठल्या हॉटेलात खायची वेळ आली तर 'यात काय , यापेक्षा चांगलं मी घरी बनवेन' असं बाबा म्हणायचे आणि खरच खूप चांगलं बनवायचेही.पण सगळे पदार्थ बनवण्यामद्ये आम्हा भावंडांची मदत फक्त कांदा चिरणॆ,लिम्बु कापणे अशी लिंबुटिंबु होती. नंतर एक भयाण दिवस उजाडला,आणि मेडिकलला ऍडमिशन मिळुन माझी रवानगी जे.जे. हॊस्पिटल नामक छावणीत झाली.तिथे म्हणजे 'वॉटर वॉटर एवरिव्हेअर नॉट अ सिंगल ड्रॉप टु ड्रिन्क' अशी अवस्था होती.पूर्ण कॅम्पसमध्ये पाच-सहा कॅन्टीन्स आणि दहा-बारा डब्बेवाले असुनही त्यांच्यापैकी एकाच्याही हाताला चव नव्हती.
घरी फोन केला की न राहावुन आज काय केलं होतं जेवायला हे विचारायचे."आज ना आईने पातुरडी (माश्यांचा एक प्रकार) केली होती" हे ऐकुन जिवाची घालमेल सुरु व्हायची. नंतर जेवताना डब्ब्यातील कालवलेला भात पातुरडिच्या आठवणीने जायचा नाही.यालाच कालवाकालव होणे म्हणत असावेत! माझ्यासारख्या खात्यापित्या घरच्या मुलीचे अगदी कुपोषण होत होतं.वजन चार किलोंनी कमी झालं.असेच एकदा फोनवरुन रडुन गोंधळ घातल्यावर आईबाबा मला भेटायला आले."ताई,निदान दूध तरी तापवून पी बेटा " असे म्हणुन त्यांनी एक कॉईलची हॉटप्लेट मला घेवुन दिली.या शेगडीनेच माझ्यासमोर स्वयंपाकाची अलीबाबाची गुहा बटन दाबताच उघडली.स्वयंपाक म्हणजे स्वयं केलेला पाक हे मला प्रथम उमगले.त्याचीच ही कथा.हॉटप्लेट पाककृतीचे असे काही अनुभव आपल्याकडे असतील तर नक्की कळवा.आणि हो , रेसिपीजसुद्धा! बाय!

मेकिंग स्पेशालिस्ट २

मेकिंग स्पेशालिस्ट २
पायरी २ - अश्वावस्था
हा आमच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा काळ म्हणता येईल. दुसरे वर्ष म्हणजे जणु सुखाचा परमावधी. हरकामेपणातून नुकतीच सुटका झालेली असते. कामाचे तासही कमी झालेले असतात,अभ्यासाचे ओझे अजुन तितकेसे जाणवू लागलेले नसते.या वर्षाच्या विद्यार्थ्याची पदवी विषयानुरुप बदलते.म्हणजे काही ठिकाणी याचे काम असते,वरिष्ठ हरकाम्याचे तर काही ठिकाणी कनिष्ठ म्होरक्याचे.
आमच्या ईंटर्नल मेडिसिन या शाखेत तर या अश्वाची चंगळच असते.दिग्विजय करायला निघाल्यासारखा तो चौखुर उधाळत असतो. एका वर्षात जनरल वॉर्डमध्ये काम करायची गरजच पडत नाही, सगळी कामे ए. सी. त बसुन होतात. ( नंतरच्या किंवा अगोदरच्या आयुष्यातही कित्येक डॉक्टरांना ए. सी. चे अप्रुप वाटत नसले तरी शिकताना मात्र सरकारी किंवा पालिकेच्या रुग्णालयात ए. सी. चा अनुभव दुर्लभ आणि त्यामुळेच सुखद असतो. ) तीन टर्म्समध्ये आम्ही वैद्यकीय अतिदक्षता विभाग (एम. आय. सी.यु.), आय. सी. सी. यु. , कृत्रीम मूत्रपिंड विभाग इत्यादी विभागात काम करतो. कामाचे तासही ठराविक म्हणजे आठ ते बारा इतकेच असतात. आता साप्ताहिक सुट्टी वैगेरे गोष्टींची आम्ही अपेक्षाच ठेवत नाही म्हणून ती मिळत नाही याचं आम्हाला वाईट वाटत नाही.
सर्जिकल शाखांमध्ये आता हाताला कटींग मिळू लागलेलं असतं. हाताखाली काम करण्यासाठी कोणी बकरा/री असते. न्यूरोसर्जरी, कार्डिऍक सर्जरी अपघात विभाग अशा ठिकाणी कामे करायची संधी असते.
या सुखांच्या दिवसात त्रास फक्त एकाच गोष्टीचा होतो, आपले पालक. आम्हाला आता दोन प्रकारचे पालक असतात-एक आपले सख्खे आईबाबा आणि एक आपले शैक्षणिक आई किंवा बाबा.( आम्हाला प्रवेश घेतानाच एक-एक शिक्षक नियुक्त केले जातात. प्रत्येकी एका विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असल्याने त्यांचं आपल्याकडे आईबाबांइतकंच लक्ष असतं.) आपण मोठे झालोय हे आपल्या पालकांच्या लक्षात येऊ लागतं.
त्यामुळे आपण खूप अभ्यास करावा, आपल्या विषयाचे अवांतर वाचन करावे , विविध वैद्यकीय चर्चा, स्पर्धा , सादरिकरणे यांमध्ये भाग घ्यावा अशी आपल्या शिक्षकांची अपेक्षा असते. त्यातच आपला शोधनिबंध लिहिण्याचे पुष्कळ्से काम आपल्याला याच वर्षी पूर्ण करायचे असते.
आणि आपले सख्खे आईबाबा! त्यांना अचानक आपला बाळ्या/बाळी मोट्ठे झाल्याचे जाणवु लागते. केव्हा एकदा त्यांचे लग्न लाऊन देतोय असे होऊन जाते. मुलं/ मुली बघण्याचे कार्यक्रम घरी युद्धपातळीवर चालु होतात. कोणी आईवडिलांचे हे काम मोठ्या मनाने स्वतःच अगोदर केले असेल तर लग्नासाठी तगादा सुरु होतो. आणि बरेच घोडे आणि घोड्या हे औट घटकेचं स्वातंत्र्यही हरवून बसतात. (आमचंही एम. डी. च्या दुसऱ्या वर्षीच लग्न लागलं. त्याविषयी पुन्हा केव्हातरी लिहेन)
तर एकंदर बऱ्यापैकी मजेत हे वर्ष संपतं.

पायरी३- वृषभावस्था
हे शेवटचं आणि सर्वात महत्वाचं वर्षं! नाव असतं म्होरका किंवा म्होरकी.पण आपण असतो बैल.त्यात साधासुधा बैल नाही तर डोळ्याला झापड लावलेला कोलुचा बैल असतो. वॉर्ड , वाचनालय आणि पुस्तके यांपलीकडे काही दिसु नये यासाठी झापडे लावलेली असतात.नाही म्हणायला या बैलाच्या शिंगाना हरकामे तेवढे घाबरतात.( स्त्री- म्होरक्यांसाठी गाय हा शब्द न्हणूनच वापरता येत नाही आणि म्हैस हा शब्द मी स्वतःच कसा वापरु?)
पहिले दोन तीन महिने तर एकदमच वेगळे असतात. घोडेपण नुकतेच संपलेलं, त्यात हाताखाली काम करायला एकदम नवा/वी भरती हरकामा/मी! त्याला किंवा तिला बिचारीला काहीच येत किंवा कळत नसतं आणि सगळ्या चुकांचं खापर आपल्यावर आपले वरिष्ठ फोडत असतात. अरे हो, यावर्षी आपण पॅरेंट युनिट म्हणजे आपापल्या शैक्षणिक पालकांच्या युनिट्मध्ये काम करत असतो. अर्थात प्रत्येक गोष्ट जाड भिंग़ाच्या चष्म्यातून पाहिली जाते. एम. डी. होऊन बाहेर पडल्यावर आपण वैद्यकीय वर्तुळात आपापल्या गुरुच्या नावाने (गायन क्षेत्राप्रमाणे) ओळखले जात असल्याने गुरु आपल्यावर खूप लक्ष ठेवून असतात. माझ्या बाईतर ! (मी कानाची पाळी पकडली असं समजुन घ्या) त्यांनी माझ्यावर इतके कष्ट घेतलेत की आजपर्यंत साऱ्या शिक्षकांनी मिळुन घेतले नसतील.
तर बैलाची सकाळ जाते वॉर्डमध्ये. सकाळच्या राउंडला हरकाम्याने सगळे काम नीट केले की नाही हे बघणे हेच सर्वात मोठे काम . दुसरं अर्थातच त्याला ओरडण्याचे. मग नातेवाईकांना रुग्णाची अवस्था समजाऊन सांगणे हे मोठे काम असते. त्यानंतर व्याख्याते राउंडला येतात. आपल्या बाईंना काय काय लागेल आणि कुठे कुठे ओरडुन घ्यावे लागेल ते सांगतात‌.
साधारण दहा वाजायला आले की आपल्या छातीत धडधड सुरु होते. बाअदब बामुलाहिजा .. मॅडम येतात. पहिला रुग्ण. मॅडम रुग्णाचा रोगईतिहास ऐकुन घेतात. "मग तुझं काय निदान आहे?"
"मॅडम, ह्याला ताप आला होता , रक्ततपासणीनंतर मलेरिया सापडला आहे."
बस, कडकड बिजली कडाडते, धरणीकंप होतो. व्याख्याता आपल्याकडे 'गर्रिब-बिच्चाऱी ' अशा दृष्टिने पाहु लागतो.
"मी तुला रक्ताचा रिपोर्ट विचारला की तू केलेलं निदान. रक्ताचा रिपोर्ट बघुन लॅबटेक्निशियनही निदान करेल. तू काय दिवे लावलेस मग! " हे सगळं पेशंटना समजू नये म्हणून इंग्रजीत असतं.
आपल्याला चूक लक्षात येते. आपण मग कोणत्या लक्षणामुळे हा मलेरियाच आहे आणि इतर कोणता ताप नाही वैगेरे स्पष्टीकरण देतो. मग बाई रुग्ण तपासतात,चांचण्या वैगेरे बघतात, आपली औषधयोजना वाचतात, दुरुस्त करतात . आपल्याशी जितक्या रागाने मघाशी बोलल्या त्याच्या दुप्पट प्रेमाने पेशंटशी बोलतात , नातेवाईकांना दिलासा देतात.
दुसरा रुग्ण. आपण पहिल्या अनुभवाने शहाणे होऊन व्यवस्थित केस सादर करतो. पोरगी सुधारली याचा आनंद बाईंच्या चेहऱ्यावर दिसतो. दुसराही मलेरियाच असतो. "सुटले" मी मनात म्हणतेय तोवर " मुंबईत मलेरियाचं प्रमाण काय?" मी सांगते. "मलेरियाचं जीवनचक्र सांग " आता आली का पंचाईत ? चार वर्षांपूर्वी अभ्यासात होतं तेव्हा घडाघडा सांगितलं असतं. आत्ता कुठे. मी आठवेल तसं संगायला सुरुवात करते. माझ्या अभ्यासाचा ऊद्धार होतो.
असा राउंड चालु राहातो, विजा गर्जत रहातात. मध्ये -मध्ये एखाद्या चांगल्या गोष्टिबद्द्ल शाबासकी.हरकाम्याची कामाची यादी आणि माझी "आज वाचलेच पाहिजे " यादी वाढत जाते. राउंड संपतो.
संध्याकाळी परत आपण राउंड घेउन नविन रिपोर्ट बघतो, एखादे औषध बदलतो.हरकाम्यावर रागावतो. इ.इ.
काही दिवसांनी मग आपण सुधारतो. बाई काय विचारतील ते अगोदरच जाणून वाचून येतो. हरकाम्याही आता तरबेज झालेला असल्याने त्याला ओरडायचं एक काम कमी झालेलं असतं.बरीच उत्तरं त्यामुळे येत असतात. अर्थात बाईंच्या पोतडीत आपल्याला पुरुन ऊरतील इतके गुगली असतात.
बाकी इतर स्पेशालिटिच्या रुग्णांना तपासणे रेफरन्स देणे वैगेरे कामं असतातच. आठवड्यातून एका दिवशी २४ तास काम असतं कारण त्यादिवशी येणारे सगळे मेडिसिनचे रुग्ण आपण बघायचे आणि गरज असेल तर ऍडमिट करायचे असतात.
इतर स्पेशालिटीत थोड्या-फार फरकाने हाच क्रम असतो, पण शल्यक्रियेशी संबंधित विषयात राउंड इतकाच प्रत्यक्ष शल्यक्रियेचा अनुभवही महत्वाचा असतो. (सर्जन मेडिसीनच्या लोकांना राउंडवर्म म्हणतात)
इथेही तुम्ही किती नीट काम करता यावर तुम्हाला किती कौशल्याच्या क्रिया मिळणार हे अवलंबुन असतं.
बघता बघता हे दिवस संपतात. शेवटचे तीन महिने पूर्ण अभ्यासासाठी. बैल झापड बांधुन अभ्यास करतो. रात्रिचा दिवस , दिवसाची रात्र काय वाटेल ते करुन अभ्यास करतो.
आणि कयामत का दिन काही दिवसांवर येऊन ठेपतो.
क्रमशः

मेकिंग ऑफ़ स्पेशालीस्ट 1

मेकिंग ऑफ़ स्पेशालीस्ट
माझं थोडंफार लेखन आवडीने वाचल्याबद्दल धन्यवाद.यापुढेही असेच लिहीत राहाण्याचा मानस आहे. आपल्या मनोगतावर अनेक नेटकर हे संगणक क्षेत्राशी संबंधीत आहेत.माझ्या "वैदु" जमातीतील फारच कमी लोक दिसतात.त्यामुळे माझ्या यापुढील लिखाणाचा संदर्भ लागावा याकरिता हा लेख.
आपापला बाळ्या किंवा बाळी शाळेत थोडी जरी हुशार असली तरी आईबाबांना त्याला/तिला डॉक्टर बनवायचे वेध लागतात. दहावीच्या अगोदर पासुनच कानी कपाळी ओरड व्हायला सुरुवात होते, "चांगले मार्कस मिळवायचे बरं, विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला पाहिजे." बाळी खूप अभ्यास करते,विज्ञान शाखेत प्रवेश मिळवते, बारावी पास होते,जेवढ्या असतील नसतील तेवढ्या सी.ई.ट्या. (प्रवेश परीक्षा) देते. शक्यतो‌ सरकारी नाहीतर महानगरपालिकेच्या कॉलेजात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करते.तिला माहित असतं कितीही उद्या मारल्या तरी खाजगी कॉलेजांतील फ़ी आपल्या पालकांना परवडणार नाही.
तर, बारावीचा रिझल्ट लागल्यावर आम्हांला मेडिकलला प्रवेश मिळतो. (आमच्यावेळी ही सतरा प्रवेश-परीक्षा द्यायची भानगड नव्हती.) आता बाळ्या/ बाळी मोठे स्पेशालिस्ट होऊनच बाहेर पडणार,खूप मान आणि खोऱ्याने पैसे मिळवणार अशा भ्रमात आई-बाबा अस्तात.
पण एका-एका यत्तेत दीड वर्षं अशी साडेचार वर्षे आम्हांला डॉक्टर व्हायची तात्पुरती पदवी मिळवायलाच लागतात.(नियमित पास झालो तरच हो!)
मग आम्ही होतो, "आंतर्वासित!" इंग्रजीत यालाच ईंटर्न असे म्हणतातं. नाव जरी आंतर्वासीत असले तरी वैद्यकीय क्षेत्रात आम्ही असतो ना आतले ना बाहेरचे.म्हणजे विद्यार्थी नाही म्हणून आम्हाला अभ्यास नाही,लेक्चर्स नाहीत , इस्पितळाच्या वार्डात काम करायला लागतं. तर पूर्णपणे डॉक्टर झालो नाही म्हणून अगदी लिंबू-टिंबू कामं सांगतात. यातच आजकाल उच्चशिक्षणासाठी प्रवेश-परीक्षेचा अभ्यास करायचा असतो.मग आई-बाबांकडे पैशासाठी हात पसरा, क्लासेस लावा,क्लासची वेळ आणि अभ्यास सांभाळण्यासाठी वॉर्डमधुन खोटं बोलुन पळा अशी यातायात करायला लागते. सरतेशेवटी परीक्षा देऊन आपण कुठेतरी जागा मिळवतो.
आता यातही गंमत अशी की पुढे ज्या विषयातील पदवीचा फायदा पैशांचं खोरं मिळवण्यासाठी होइल(क्लिनीकल साईड म्हणजे मेडिसीन,सर्जरी,गायनॅक इ.) अशा विषयासाठी मोठी स्पर्धा असते. अश्या फावड्याचा दांडा एकदा मिळाला की सुटलो असं मात्र होत नाही. मग सुरु होतो पी. जी. चा खडतर प्रवास.
पी. जी. ची तीन वर्षं असतात,प्रत्येकी एका वर्षाची. यात क्लिनीकल साइडला आपण डार्विनचा ऊत्क्रांतीवाद अक्षरशः अनुभवतो. आणि ऊत्क्रांतीच्या वेदनाही.या प्रवासाची ही एक झलक.
पायरी१ - गर्दभावस्था
पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेजात म्हणतात,जे.आर.(ज्युनि.रेसिडेंट) आणि मुंबै महानगरपालिकेच्या कॉलेजात हाऊसमन.काही ठिकाणी मुलींना वाईट वाटु नये म्हणून एच.ओ. म्हणजे हाउस ऑफिसर म्हणायची पद्ध्त आहे. काही म्हणा आम्ही याला म्हणतो,एच.के. म्हणजे "हरकाम्या/हरकामी."
हरकाम्याने वॉर्डातील हरप्रकारचे काम न कुरकुरता करणे अपेक्षित असते. एका रुममध्ये असे साताठ हरकामे राहात असतात.आता दहा बाय दहाच्या रुममध्ये हे सगळे कसे राहातात हे विचारु नका. कारण सगळे हरकामे अठरा ते वीस तास वॉर्डातच असतात.
चुकुन रात्री ऊशीरा कधी रुमवर येउन अगोदर आलेल्या दुसऱ्या हरकाम्याला पलिकडे सरकवून झोपायला वेळ मिळाला की लगेच वॉर्डमधुन मामा बोलवायला येतातच. याला कॉल येणे असं म्हणतात. "अमुक अमुक नंबरचा पेशंट कॉटवरुन पडलाय लवकर या." मग ऍप्रन घालुन हरकाम्या परत वॉर्डमध्ये. कोणी एक मोहमद सलिम झोपेत बाजुच्या रामभरोसेच्या कॉट्खाली झोपलेल्या बायकोवर पडलेला असतो. दोघांच्या बायकांचे कडाक्याचे भांडण चालु असते.आपण ते सोडवतो,पेशंट पडल्याचे अपघात विभागात कळवतो,पोलिसांना कळवतो, तात्पुरते उपचार करतो. हे होइपर्यंत दुसऱ्या दिवशी उठायची वेळ झालेली असते.
मग भल्या पहाटे सुरु होतं ब्लड कलेक्शन ! प्रत्येक पेशंटचं रक्त घेउन, योग्य त्या बाटल्यंत भरुन फ़ॉर्म भरुन त्यावर ठेवायचं. ब्लड घेताना पेशंट इतकी कट्कट करतात की जणू हे ब्लड आपण आपल्या वैयक्तिक वापऱासाठी घेतोय. मध्ये मध्ये पेशंटच्या बारिक-सारिक तक्रारी सुरुच असतात. सगळ संपल्यावर आपण पेशंट तपासतो. तेवढ्यात आपला म्होरक्या राउंडला येतो.
म्होरक्या म्हणजे तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी. हा बिचारा आपला अभ्यास,प्रबंध आणि शिक्षकांच्या अपेक्षा यांनी इतका रंजला-गांजलेला असतो की हरकाम्याची प्रत्येक चूक त्याला डोंगऱाएवढी वाटत असते. प्रत्येक पेशंटच्या कॉटपाशी जाउन त्याला तपासल्यानंतर हरकाम्याच्या चुका काढुन त्याला ओरडण्यासाठी बहुधा म्होरक्याला जादा वेतन मिळत असणार असं मला हरकामी असताना वाटायचं.(नंतर मी म्होरकी झाल्यावर मीसुद्धा हेच केलं म्हणा.) तर असे होतात म्होरक्याचे राउंड. मग व्याख्याते,कनिष्ठ प्राध्यापक,वरिष्ठ प्राध्यापक यांचे अनुक्रमे राउंड होतात.प्रत्येक राउंडगणिक हरकाम्याची कामाची यादी वाढत जाते. शेवटी सगळे गेल्यावर तो हे काम करत बसतो.
संध्याकाळी परत आपला ,मग म्होरक्याचा राउंड होतो.पुन्हा एकदा ओरडण्याचा कार्यक्रम होतो. पुन्हा कामे संपवून झोपायला जायला दोन-तीन वाजतात.
हा एक साधा दिवस साध्या मेडिसीन वैगेरे स्पेशालिटीतला. अजून नवीन रुग्ण भरतीचा दिवस, स्पेशल ओ.पि. डी. चा दिवस असे काळेकुट्ट दिवस दर आठवड्यात असतात.त्याविषयी पुन्हा केव्हातरी. पण गायनॅक. सर्जरी इत्यादी काटछाटीच्या प्रदेशात याहुन दारुण अवस्था असते. इथे वरील सर्व कामांसोबतच रुग्णाची शल्यक्रियेसाठी पूर्वतयारी करणे हे एक मोठेच काम असते. त्याकरिता भूलतज्ञ सांगतील त्या सर्व तपासण्या करणे,ते मागतील त्यांच्याकडुन ना हरकत (फ़िट्नेस फ़ॉर सर्जरी)मिळवणे ह्या गोष्टी सगळ्यांशी गोड बोलुन करुन घ्याव्या लागतात. या तपःश्चर्येनंतर वरिष्ठ एखादी बारीकशी शस्त्रक्रिया आपल्याला करु देतात किंवा एखाद्या मोठ्या क्रियेत लिंबु-टिंबु म्हणून मदत करु देतात. त्या दिवशी आपण स्वर्ग गवसल्याच्या आनंदात असतो.
अशीच कशीबशी एका वर्षाने ही गर्दभावस्था संपते.

बुधवार, जुलाई 26, 2006

dagadanchi khichadi

आटपाट नगर होते, नगर कसले मोठासा देशच होता तो. प्रत्येक आटपाट नगरवाल्या गोष्टीत एकतरी गरीब ब्राह्मण असतो, इथे जातीपातीचे काही माहीत नाही ; पण बरेच गरीब स्वभावाचे पांढरपेशे मध्यमवर्गीय राहत होते. शक्यतो शासन या बड्या मालकाकडे ते नोकरी करायचे म्हणून इतर त्यांना 'बाबू' असे म्हणायचे. या लोकांना ओळखायची खूण म्हणजे त्यांनी काहीही खाल्लं तरी सर्व पदार्थांची चव 'वरणभात, भेंडीची भाजी' या काँबिनेशनपेक्षा वेगळी लागत नसे.
दर दहा वर्षांनी शासन साहेबांकडे या पांढरपेशांचे प्रतिनिधी जाऊन वेतनवाढ मागायचे, तसे ते या वेळीही गेले. शासन साहेबांचे डोके(दरवेळेप्रमाणे याही वेळेस) चालेनासे झाले. परिस्थितीची पाहणी करून तोडगा काढायला साहेबांनी श्री. सहावे आयोग यांना आटपाट नगरात पाठवले. आयोग यांचे पूर्ण कुटुंबच शासन साहेबांच्या खास मर्जीतले होते, किंवा साहेबांना पडलेले प्रश्न मुळातून न सोडवता अधिक घोळ घालून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे कुटंब शासन दरबारी प्रसिद्ध होतं.
मोठा गाजावाजा करून आयोगजी नगरात आले. आल्या आल्या गांवभर फलक झळकवले,

"आयोग साहेबांचे जादूचे प्रयोग--खडखडाटी तिजोरीतील दगडांपासून वेतनवाढीची खिचडी.
-- उद्या दिनांक **-**-** रोजी अमूकतमूक मैदानात सर्वांदेखत आयोग साहेब वरील प्रयोग सादर करणार आहेत तरी सर्व नागरिकांनी आपापली जेवणाची ताटे घेऊन ठीक सहा वाजता मैदानात उपस्थित राहावे."


या नगरात रोज हातावर पोट घेऊन जगणारे काही अतिगरीब लोक निरक्षर असल्याने त्यांनी हा फलक वाचलाच नाही. कॉर्पोरेट सेक्टर, बडे छोटे व्यापारी यांनी याकडे करमणुकीचा कार्यक्रम समजून दुर्लक्ष केले, त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये असल्या फालतू टाईमपासला वेळ नव्हता.
पण झाडून सारे पांढरपेशे बाबू या कार्यक्रमाला आपापली ताटे घेऊन उपस्थित राहिले. बरोबर सहा वाजता मोठाल्या लॉरीवर "खडखडाटी" नांवाची शासन साहेबांची ती सुप्रसिद्ध तिजोरी घेऊन आयोग साहेबांचे आगमन झाले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
प्रसिद्ध जादूगाराच्या आविर्भावात आयोग साहेबांनी तिजोरीचे दार उघडून आतमध्ये फक्त पाच सहा दगडच कसे आहेत हे जनतेला दाखवले. परत एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला.
मैदानाच्या मधोमध एक मोठे चुलाणे रसरसत होते आणि त्याच्याखाली इंधन म्हणून पाचव्या वेतनआयोगाच्या चोपड्या , परदेशी कर्जाच्या खतावणी इ. जाळले जात होते. या चुलाण्यावर 'गंगाजळी' नामक मोठे पातेले ठेवण्यात आले. हो, आटपाट नगरात तिजोरीप्रमाणे पातेल्यांनाही गंगाजळी, अमुक निधी , तमुक पॅकेज अशी नांवे असत. तिजोरीतले दगड या पातेल्यात टाकून वर जनतेच्या अपेक्षांवरून फिरवलेले मंतरलेले पाणी ओतून आयोग साहेबांनी मोठा जाळ करून दिला. आत्तापर्यंत प्रयोगाची कीर्ती ऐकून आटपाट नगराचे झाडून सारे मंत्रीगण व्ही. आय. पी. कक्षात ही अद्भुत खिचडी पाहायला जमले होते.
आयोगरावांनी खिचडीची महती गायला सुरुवात केली. मग म्हणाले "लोकहो, थोडे तेल असेल तर काय मजा येईल, दगड चांगले परतता येतील."
लगेच अर्थमंत्र्यांनी 'तेल' नांवाचा कर लोकांना लावून तिथल्या तिथे पुरेसे तेल जमा करून आयोगरावांना दिले.
मग आयोगराव म्हणाले,"वा! आता दगड चांगले परततो. अरेच्च्या! पण मोहरी आणि जिरे असेल तर काय मजा!"
लगेच गृहमंत्री पुढे झाले आणि पोलीस दलाकडे आधीच कमी असलेली जिरेमोहरी काढून त्यातली काही आयोगरावांच्या खिचडीला दिली. कोणीतरी वित्तआयोगवाला ''अरे , तुम्ही अंतर्गत सुरक्षेच्या वाट्याची मोहरी यांना दिलीत " असं म्हणत होता, पण कुणाचेच तिकडे लक्ष गेले नाही.आयोगराव मात्र म्हणाले,"अहो, फोडणी वाचून का खिचडी बनलीये कधी?"
"तेही बरोबरच," असे म्हणून मोहरी जिरे, आलं वगैरे सामान गृहमंत्र्यांकडून मिळाले.
मग आयोगराव म्हणाले"छे हे सगळं ठीक. पण मुगाची डाळच नसेल तर कसली आलीये खिचडी!" मग आरोग्यमंत्र्यांनी ''सर्वांसाठी आरोग्य'' योजनेतून चांगली भरपूरशी डाळ दिली आणि ती कमी पडली म्हणून संरक्षणमंत्र्यांनी आपल्याकडची (म्हणजे स्वतःच्या घरातली नव्हे हो,) डाळ सुद्धा दिली. आता डाळ परतल्याचा खमंग वास सुटला आणि समस्त पांढरपेशांच्या तोंडाला पाणी सुटले. मग त्यांनीच खिशात हात घालून 'इनकमटॅक्स' नावाचा थोडा मसाला दिला..
चतुर आयोगराव म्हणाले,"वा वा! आता तर दगड छान परतून झाले. थोडे पाणी घालून शिजवले की मस्त खिचडी तयार. पण.. भरीला मूठभर तांदूळ घातले तर काय बहार येईल!"
प्रधानमंत्र्यांना ते पटले. लागलीच जागतिक बँकेला फोन करून या अभिनव खिचडी योजनेला साहाय्य म्हणून मोठ्या प्रमाणात कर्जाऊ तांदूळ घेऊन पुरवण्यात आला. सुंदरशी चमचमीत खिचडी काही तासांत तयार झाली.
आता ताटे घेऊन आलेल्या पांढरपेशांची चुळबूळ वाढू लागली. सगळेच खिचडी चापायला धावू लागले. पण मग श्रेणीवार खिचडीचे वाटप होणार असे सांगून निम्म्यापेक्षा जास्त लोकांना घरी पाठवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी यायला सांगण्यात आले.
ज्यांना आज खिचडी मिळाली ते खूश, ज्यांना उद्या मिळणार ते ही खूश कारण उशीरा खिचडी दिल्याबद्दल त्यांना खिचडीचे अरीअर्स मिळणार होते.
रात्री गुपचूप पातेल्यातले दगड काढून धुऊन खडखडाटी तिजोरीत बंद करून तिजोरी जागेवर ठेवताना शासन साहेब आणि आयोग साहेब दोघेही गालातल्या गालात हसत होते. पांढरपेशे घरी जाऊन परत एकदा भेंडीची भाजी खाऊन सुखस्वप्ने बघत झोपी गेले होते.
काही असंतुष्ट सो कॉल्ड बुद्धीवादी मात्र उगाच मैदानाबाहेर फसवणुकीच्या बोंबा ठोकत बसले होते.

Birthday!

"राजा, परसों क्या दिन है याद है ना?""हो साती, परवा तुझा वाढदिवस आहे, मी कसा विसरेन?""तो , क्या गिफ्ट दे रहा है मुझे?""वही, हिरों की अंगुठी""शीः, हे कसलं गिफ्ट, मिनुला माहित्येय का तिच्या नवऱ्याने वाढदिवसाला सिंगापूरला नेलं होतं, मला पण तू सिंगापूरला घेऊन चल.""बाये, सिंगापूरला जायचं म्हणजे काही खायचं काम आहे का? दोन एक लाख रुपये लागतील दोघांनी जायचं म्हणजे! कुठून आणणार मी?""हे काय रे राजा , काहीतरी युक्ती कर ना!"
जगातल्या सगळ्या बायकांपेक्षा वेगळं असं माझं माझ्या नवऱ्याबद्दलचं मत आहे. जगात त्याच्यापेक्षा हुशार कुणीच नाही आणी माझ्यापेक्षा तर त्याला खूप जास्त कळतं हे माझं स्पष्ट मत आहे. कुठल्याही गोष्टीतून तो मार्ग काढू शकतो हे माहिती असल्यानेच हे दोन लाख उभे करायचं काम मी बिनधास्तपणे त्याच्यावर सोपवलं.
"एक तरकीब है, " पेपर बाजूला ठेवत राजा म्हणाला. " पण इट विल रिक्वायर युवर को-ऑपरेशन""सिंगापूर आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी" राजाने त्याचा प्लॅन मला ऐकवला. मी तो कोणतीही शंका न घेता (नेहमीप्रमाणे ) मान्यही केला."ओ. के. , सगळ्यात पहिलं आपल्याला तुझं नाव बदलायला लागेल""का, रे?""अगं, अशा धमाक्यासाठी नावही कसं हवं एकदम सूट होणारं, जसं की प्रिन्स, आता तुझं नाव प्रिन्सेस नको, पण 'राणी ' ठेवूया""वा,वा राजा, किती हुशार रे तू, हेडलाईनपण छान होईल 'राणीकी याद में राजा परेशान,' वा!"
झालं, दुसऱ्याच दिवशी मला घेऊन राजा हॉस्पिटलच्या मागे एका बागेत महापालिका एक बोअरवेल खणत होती तिकडे घेऊन आला. चांगला ५६ फुटी खड्डा होता तो. तळाची जमीन बऱ्यापैकी भुसभुशीत दिसत होती. "चलो हो जाओ तय्यार" असं म्हणत राजाने एक हलकासा धक्का देऊन खड्ड्यात ढकलून दिलं आणि मी बसले पडत 'ऍलिस इन वंडरलँड' मधल्या ऍलिससारखी, सिंगापूरची स्वप्नं बघत. धप्पकन खाली आपटले. थोडंसं खरचटलं, एक दातही हलू लागला पण जास्त काही लागलं नाही. "राजाचं प्लॅनिंग असंच व्यवस्थित हो नेहमी" मी मनात म्हणाले.
इकडे राजाने जीवघेणा आकांत करायला सुरुवात केली. मग कुणीतरी फायर ब्रिगेडला बोलावणं पाठवलं, कुणीतरी सबसे तेज वाहिन्यांना कळवलं. एका तासातच त्या ठिकाणी पिकनिक स्पॉटवर जमते तही गर्दी जमली. गर्दी बघून राजा अगदी मोठ्याने आक्रोश करू लागला.
झालं, वाहिन्यांचं लाइव्ह टेलिकास्ट सुरू झालं. राजाला वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात झाली. त्यातून जे बाईट्स मिळाले त्यावर पंधरा- पंधरा मिनिटांचे कार्यक्रम सुरू झाले.
वाहिनीकन्येने विचारले--" मि. राजा, रानीको आप कबसे जानते है?"''बरसों से, जब हम जे. जे. में यु. जी. कर रहे थे तबसे"
की लगेच जे. जे. हॉस्पिटलाबद्दल माहिती देणारी पंधरा मिनिटे.

"तो 'रानीको बचाओ' के इस भाग का सवाल है ' राजाको रानीसे प्यार हो गया गाना कौनसे फ़िल्म का है?' सही जवाब देनेवालेको राजारानी ट्रॅव्हल की ओरसे काश्मीर ट्रीप"

अजून फायर ब्रिगेडचा पत्ता नव्हता. राजाच्या खोट्या काळजीचं रुपांतर खऱ्या काळजीत होऊ लागलं. इतक्यात खूपशा सायरनचे आवाज ऐकू आले आणि आलं एकदाचं फायर ब्रिगेड म्हणणाऱ्या राजाला दिसल्या K. A. ने नंबर सुरू होणाऱ्या कर्नाटकी गाड्या. चक्क कर्नाटकचे मुख्यमंत्री आले होते. मागचे दोन तास टी.व्ही. वर आमचेच गुणगान चालल्याने राजा कर्नाटकचा आहे , मी कोंकणातली आहे, उद्या माझा वाढदिवस आहे हे तमाम भारतीयांना ठाऊक झाले होते. पण म्हणून इतक्या लवकर कर्नाटकचे मुख्यमंत्री इथे येतील असं वाटलं नव्हतं. सिलिकॉन सिटीच्या कृपेने कर्नाटक खूपच फास्ट झालंय याची प्रचिती आली. खड्ड्याजवळ एका खुर्चीत बस्तान ठोकत" कर्नाटकके एक घर की बहू पुरे कर्नाटककी बहू है(टाळ्यांसाठी पॉज) आज इसे बचाने के लिये बँगलोरसे एक खास हायटेक टीम आ रही है" असं म्हणून महाराष्ट्र सरकारच्या अकार्यक्षमतेविषयी चार वाक्य बोलून झाली.
तेवढ्यात परत सायरनचा आवाज झाला. आतातरी नक्कीच फायर ब्रिगेड असं राजाला वाटतंय तोवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मूर्ती गाडीतून उतरली. "कर्नाटकच्या भूलथापांना फसू नका, आमची टीम आमच्या मुलीची काळजी घेण्यास समर्थ आहे, ते ही जमलं नाही तर केंद्राची मदत घेण्यात येईल.मॅडमची या घटनेवर बारीक नजर आहे''
"अस्सं, मग मागचे चार तास झाले अजून तुमची फायर ब्रिगेडचीच गाडी कशी नाही आली?'' क. मु. नी टोला हाणला."ती गोष्ट महापालिकेच्या अखत्यारीतील आहे आणि तिथे अपोजिशनवाले आहेत, या निमित्ताने तरी सेनेची महापालिका किती अकार्यक्षम आहे आणि मुंबैवर येणाऱ्या संकटांचा सामना करण्यास असमर्थ आहे हे साऱ्या देशाला कळले असेल."
एवढ्यात परत सायरन वाजला. आता कोणता राजकारणी आला असा राजा विचार करतोय तोवर चक्क फायर ब्रिगेडची गाडी दिसायला लागली. पण राजकारण्यांच्या गाड्या, वाहिन्यांच्या व्हॅन्स यांच्यामुळे घटनास्थळी येण्यास त्यांच्या गाडीला प्रचंड अडथळा येत होता, त्यात बघ्यांची गर्दी. किमान दोन तास रस्ता क्लिअर करण्यातच जाणार होते. त्यात पहिल्यांदा कुणाच्या गाड्या मागे घ्यायच्या, क. मु. च्या की म. मु. च्या यावरही तिथे तू तू मै मै सुरू झालेली.
एवढ्यात एका वाहिनीला या कार्यक्रमाच्या मुख्य नायिकेची आठवण झाली , एक पातळसा दोर सोडून एक कॅमेरा आत सोडण्यात आला. "रानीजी खडड्डेमें गिरनेके बाद आप कैसा महसूस कर रहे हो" वरून प्रश्न विचारण्यात आला. " मी आधीच आत राहून राहून वैतागले होते , मी रडायलाच सुरुवात केली आणि "मला खूप भिती वाटतेय" एवढेच बोलू शकले.
झालं , मी रडतेय याचा अर्थ राजाने मला त्रास दिला असणार इथपासून राजानेच मला खड्ड्यात ढकलले असणार असा लावून आमच्या ओळखीच्या लोकांचे बाईत घ्यायला सुरुवात झाली. "नाही तसंतर त्यांच्यात काही भांडण नव्हतं, पण नवराबायकोत काय हो छोट्यामोठ्या कुरबुरी होतंच राहतात" आमचे टीव्हीवर दिसायला धडपडणारे एक शेजारी.
"हो, काल काहीतरी हिरे, अंगठी इ. वरून वाद चालला होता खरा" दुसरे सतत भिंतीला कान लावून असणारे शेजारी. झालं हे ऐकताच माझी नोंद सगळ्या वाहिन्यांनी 'हुंडाबळी ' या सदराखाली करून टाकली आणि राजावर प्रश्नांचा भडिमार होऊ लागला. करायला गेलो काय आणि होतंय काय हे बघून राजा बिचारा गांगरूनच गेला.
लगेच एका वाहिनीची प्रादेशिक व्हॅन माझ्या कोंकणातल्या घरी पोचली. आईबाबा अगोदरच मिळेल त्या वाहनाने मुंबईला यायला निघालेले. घरात गावातले खूप लोक आणि आज्जी एकटीच.
" आजीबाई, आपल्याला काय वाटतं , राजाने राणीला खड्ड्यात ढकलले असेल?"
"शिरा पडली तुज्या तोंडावर नी काठी आली तुज्या कॅमेरावर! माज्या नातजावयाबद्दल म्होरं काय बोललंस तर रां*वा तुझ्या झिंज्याच उपटंन"
काही सनसनाटी बाईट न मिळता गाडी निघून गेली.

कार्यक्रमके इस भाग के प्रायोजक थे, महाकेश हेअर ऑइल. बाल बने अंदरसे स्ट्राँग!

इकडे एक गाडी कर्नाटकातल्या घरी. सासूबाई अख्ख्या गावासोबत टीव्हीवर माझ्या सुटकेचं नाट्य बघत होत्या. त्यांचे देव केव्हाचे पाण्यात बुडवलेले होते." राणीला राजानेच खड्ड्यात ढकलले याबद्दल तुमचं काय मत आहे?"
"निमदं हेणा होग ग्वाडीमॅक कुडली (गावठी कानडीत -मुडदा बश्शिवला तुझा भित्ताडाला टेकून) लाज नाही वाटत असं विचारायला. सासूबाईंनी कॅमेराच्या रोखाने उगारलेला दगड बघून वाहिनी -बाला मागच्या मागे कॅमेरासकट पळाली.

कार्यक्रम के इस भाग के प्रायोजक थे गुडबाय अंडरटेकर्स-- अवर केअर स्टार्टस व्हेन युवर लाईफ एन्डस!

इकडे खड्ड्याजवळ रणांगण झालं होतं. क. मु. आणि म. मु. याच्यात एकमत होत नसल्याने क. किंवा म. यांपैकी एकही टीम पुढे येत नव्हती. राजाचा धीर सुटत चालला होता. इकडे खड्ड्यात प्राणवायू आणि पाण्याअभावी मला गुंगी येत होती. तितक्यात लष्कराचं विमान उतरलं. जवान बाहेर पडले. प्रसंगावधान राखून प्रथम मला ऑक्सिजन आणि पाणी मिळण्याची व्यवस्था केली गेली. आणि सुरू झाला "राणी को बचाओ" चा सगळ्यात रोमांचक भाग.
तोपर्यंत सगळ्या मंदिर, मस्जिद, गुरुद्वारात माझ्या सुटकेसाठी प्रार्थना सुरू झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस असल्याने "हॅपी बर्थ डे राणी"चे बोर्ड लागले होते, केक बनत होते. राजा आणि राणी असे शब्द असलेल्या गाण्यांचा गजर होत होता.
शेवटी दहा तासांनी मला बाहेर काढण्यात जवानांना यश आलं. मी बाहेर आल्या आल्या स्वतःच धावत राजाकडे गेल्याने राजाने मला खड्ड्यात ढकलले नसावे यावर पोलिसांसकट सगळ्यांचेच एकमत झाले आणि राजाचा जीव भांड्यात पडला.
लगेच माझ्या सुटकेचं क्रेडिट घेण्याची अहमहिका सगळ्या राजकारण्यांत सुरू झाली. क.मु. नी मदत म्हणून एक लाख रु. दिले. म. मु. नी त्यावर मात म्हणून दोन लाख रु. आणि वर आम्हा दोघांनाही एक महिना भरपगारी रजा देऊन टाकली. "राजा राणी अमर रहे'' या जयघोषात आमची मिरवणूक काढण्यात आली. बिचाऱ्या जवानांची एकावन्न हजार रुपये बक्षीस देऊन बोळवण करण्यात आली.

टकटकटक, दारावर आवाज झाला. "सॉरी साती, आजभी मुझे लेट हो गया! एक बॅड पेशंट आला होता गं, तुला बारा वाजता फोन करायला सुद्धा मिळाला नाही गडबडीत. आणि ती डायमंड रिंग आणायला विसरूनच गेलो, उद्या दोघं जाऊन घेऊ." तोफांचा भडिमार, अश्रूंचा वर्षाव व्हायच्या आत राजाने बोलायला सुरुवात केली.
"अरे पण सिंगापूरचं बुकींग केलंस का?" मी विचारलं. आणि मी काय बोलतेय हे न कळल्याने राजा माझ्याकडे पाहतंच राहिला.

गुरुवार, मई 25, 2006

आंब्या आणि कालवी

सोम, ०१/०५/२००६ - ११:५४.
आंब्या आणि कालवी.
माझा लहान भाऊ आंब्या(अमेय-अमू, अम्या इ.) म्हणजे पक्का कोंकणी. दोन दिवस माशांविना गेले की त्याच्या गळ्याखाली घास उतरत नाही. मागे एकदा तो मुंबईत आम्हांला भेटायला आला होता तेंव्हा त्याला घेऊन दादरच्या एका सुप्रसिद्ध मत्स्याहारी हाटिलात आम्ही जेवायला गेलो. मेन्यूकार्ड बघून मी म्हणाले,"बघ आंब्या , तुझी आवडती कालवी चक्क हॉटेलमध्येही मिळायला लागली." "
"बघू, बघू. अरे बापरे, चक्क कालवी मसाला आणि कालवी फ्राय! पण तायडे, आपण जशी कालवी पूर्वी खायचो आणि मी अजूनही गावी खातो, त्याची सर कशालाच येणार नाही."
त्यानंतर जेवण संपेपर्यंत आम्ही लहानपणीच्या आठवणीत रंगून गेलो.
आमचं कोंकणातलं गाव म्हणजे एकदम चित्रासारखं ! तीन बाजूंनी डोंगर आणि पश्चिमेला खाडी. आमचं घर खाडीपासून थोडं लांब आणि डोंगराच्या कुशीत. आजूबाजूला गर्द आमराई,तिला डाग(बाग) असं म्हणतात. आम्हा तिघा भावंडांना रत्नागिरीच्या शाळेत घातलं असल्याने येण्याजाण्यातच इतका वेळ जायचा की आजूबाजूच्या मुलांशी खेळायला कधी वेळच मिळायचा नाही. पण एकदा का उन्हाळी सुट्टी पडली की सर्व पांढरपेशी आवरणे गळून पडून आम्ही त्या मुलांतीलच एक होऊन खेळत असू. त्यातलीच एक आवडती गोष्ट कालवी खाणे.
तसा कालवीचा मोसम खूप आधीच सुरू व्हायचा. पण त्याला रंगत चढायची मुलांच्या शाळांना सुट्टी पडल्यावर. एका सुमुहुर्तावर( समुद्राची ओहोटीची वेळ बघून)
" काकींनू, कालवीस येताव काय", "रं बावा, कालवीस चल" अशा हाका देत वाडीतल्या पाच सहा बायका, त्यांचे नवरे, त्यांची पोरं छोटे-मोठे हारे (बांबूच्या विणलेल्या टोपल्या) घेऊन खाडीच्या दिशेने निघायचे. मग आम्ही तिघंही घरच्यांची नजर चुकवून त्यांच्याबरोबर. ओहोटीमुळे खाडी सुकून नुसता गाळ दिसत असायचा. आता सुरू व्हायची शोधमोहिम. तशी शोधायची काही गरज नसे म्हणा, पूर्ण किनाऱ्यावर शिंपले, कालवीचे मोठे-मोठे दगड पडलेले असायचे. कुर्ल्या(खेकडे) बिनधास्त इकडेतिकडे पळत असायच्या. बायका शिंपले गोळा करायच्या. कुर्ल्या पडायला मात्र सराईत पुरुषमंडळीच लागायची, नाहीतर कुर्ली पकडणाऱ्याचाच हात डेंग्यात पकडून फोडणार. आम्हा मुलांना मात्र इंटरेस्ट असायचा कालवीत.
कालवी म्हणजे शिंपल्या, शंख यांतीलच एक उपप्रकार(phyllum-mollusca, class-bivalvia) एका दगडाला सगळ्या बाजूंनी अगणित डोळे फुटले तर कसं दिसेल ते साधारण डोळ्यांसमोर आणा. तर असा हा काळपट दगड, साधारण पाव किलोंचा(मोठेच्या मोठे चार-पाच किलोंचे पण असतात.) याचा प्रत्येक डोळा म्हणजे एक शिंपला. प्रत्येक शिंपल्याची खालची कपची दगडाला घट्ट पकडून तर वरची कपची उघड्बंद होऊ शकते. या दोन कपच्यांमध्ये एक नाजूकसा प्राणी.तर असे हे दगड गोळा करून हाऱ्यात ठेवायचे . हे करताना खूप काळजी घ्यावी लागे. जरा जरी बेसावध राहिलं तर आपला पाय त्या खाडीच्या गाळात रुतायचा, नाहीतर कालव्याच्या कपचीवर पडून फाटायचा. तर हा कालवी गोळा करण्याचा कार्यक्रम चालायचा चार वाजेपर्यंत. मग भरलेले हारे डोक्यावर घेऊन यायचं अन्याकाकांच्या मळ्यात. या नारळी पोफळीच्या बागेत गावातला एकमेव पंप होता ज्याला उन्हाळ्यातही पाणी असायचे. पंपाच्या पाण्याच्या झोतात कालवी ठेवली की एकदम 'सोच्छ' होऊन जायची. ही कालवी घेऊन पुढची खरी गंमत-कालवी पार्टी सुरू व्हायची.
आमच्या शेजारच्या सनगरे काकूंची मुलं आमच्याएवढी असल्याने आमची पार्टी त्यांच्याबरोबरच. अंगणाजवळ एखादी सपाट जागा साफसूफ करून आणलेली कालवी एका थरात तिथे गोलगोल पसरायची. डागेतला आंब्याफणसाचा पातेरा(पडलेली पाने) आणून कालवीवर टाकून त्याचा ढीग करायचा. हा ढीग करायला जरा कौशल्य लागते कारण कसा आणि किती ढीग रचलाय त्यावर कालवी कशी भाजणार हे अवलंबून असते. ढीग पेटवून दिला की अगदी शेकोटीसमोर चालतात तशा गमतीजमती चालायच्या. पूर्ण ढीग पेटून गेला की काडीने सगळी कालवी उलटी करायची, परत पातेऱ्याचा ढीग, परत पेटवून द्यायचा. मग कशानेतरी झटकून सगळी राख उडवायची गरम-गरम कालवी परत हाऱ्यात भरून अंगणात घेऊन यायची.
यानंतर कालवी फोडण्यासाठी एखादी मोठी पाथर, हातोडा, लोखंडी फुंकणी असं मिळेल ते गोळा करून बसायचं एकेक कालवं उचलून एकेका डोळ्याच्या दोन कपच्या जिथे मिळतात तिथे घाव घालायचा. कालवीची वरची कपची निघते आणि आत असतं खरपूस भाजलेलं मांस(माष्टं/माष्टू)! आमच्या आंब्याच्या मते याची चव ना कोळंबीला(चिंगळे), ना शिंपल्यांना(मुळे)! हे माष्टु नुसतंच गट्टं करायचं नाहीतर तांदळाच्या भाकरीच्या तुकड्यावर ठेवून. या पाककृतीत ना मीठ घालायची गरज( कालवीत ते असतंच) ना मसाला. मध्ये मध्ये जरा कमी भाजलेलं माष्टू मिळालं की ते वेगाळ्या भांड्यात काढून ठेवायचं, काकू त्याचं 'कालव्याचं सुकं' करायच्या. बरोबर आणलेल्या मुळ्यांचं(शिंपल्यांचं) एकशिपी साळणं(आमटी)घरात रटरटत असायचं.
मग काय ठक ठक आवाज येत राहायचे. हाराभर कालवी संपत यायची. मी आणि सोनू(बहीण) आंब्याला म्हणायचो ' चल आता पुरे झालं" पण तो कसला ऐकायला. आम्ही दोघीच घरी परतायचो. संध्याकाळी उशीरा आई आणि आजीच्या लक्षात यायचं की आपला आंब्या घरी आलेला नाही. त्या बरोबर शोधत सनगरेंच्या घरी जायच्या , आई मारत मारत आणि आजी शिव्या घालत अशी बंधुराजांची पालखी घरात यायची.
रात्री बाबा आल्यावर त्यांच्यासमोर सगळी उजळणी परत. बाबाही अमूला रागावायचे. आणि मग आईला म्हणायचे,"अगं ए, माझ्या जरा पोटात कसंसंच होतंय, जास्त जेवायला नकोय." नऊला तर जास्तच पोट जड झालंय असं म्हणून बाबा पोट हलकं करायला जरा शतपावली करायला बाहेर जायचे.
दुसऱ्या दिवशी आम्ही खेळायला गेलो की सनगरे काकू घवाळी काकूंना सांगत असायच्या "काल सांजच्याला बिचाऱ्या आंब्याची आयस ना आजी पोराला मारीत घेवन गेली जे कालवावरनी. नी राती त्याचा बापूस येवन मुल्याचं एकशिपी ना कालव्याचं सुकं वरापून गेला ता समाजला तर आजयेला!"
बाबांच्या पोटदुखीचं कारण, आणि शतपावलीची जागा कळून आम्ही हसत सुटायचो.

एका लग्नाअगोदरची गोष्ट १

एका लग्नाअगोदरची गोष्ट १ शुक्र, २८/०४/२००६

मी मागेच म्हटल्याप्रमाणे जसजशी हरकामेगिरी संपत येते तसतशी आमच्यामागील आईवडीलांची लग्नाची घाई वाढत जाते. आमचंही असंच झालं. किती वेळा सांगूनसुद्धा दोन्हीकडच्या आईबाबांनी लग्नाचा एवढा तगादा लावला, की शेवटी त्यांच्या म्हणण्याला आम्हाला मान तुकवावी लागली. पण आमच्या दुर्दैवाने आमच्या ज्युनियर बॅचची ऍडमिशन काही दिवस लांबली आणि लग्नासाठी आम्हाला फक्त सहा दिवस रजा मिळाली.एक लग्नाचा स्पेशल ड्रेस/साडी वगळता आमची लग्नखरेदीसुद्धा आईबाबांनीच केली.
आणि हो आणखी एक गोष्ट मी एकटीने केली--"सौंदर्यसाधना!" त्याचीच ही गोष्ट.
लहानपणी म्हणजे बारावीपर्यंत माझे आणि माझ्या बहिणीचे केसही बाबा घरातच कापत असत. त्यामुळे 'ब्युटीपार्लर' म्हणजे काय हे कधी बघितलं नव्हतं . नंतर शिकायला जे. जे. ला आल्यावर 'ब्युटीपार्लर म्हणजे केस कापायची जागा' असंच माझं समीकरण होतं. त्यावेळी जे. जे. तल्या मराठी मुली एकदम साध्या राहायच्या. तुम्ही जर आदितीला (गोवेत्रीकर)आमच्या कॉलेजात असताना बघितलं असतत तर आताची आदिती बघून "हीच ती" यावर तुमचा विश्वास बसला नसता. माझ्या घरच्यांनापण 'पोरगी मुंबैत राहूनही साधी राहते' याचं फार कौतुक होतं. त्यामुळेच लग्नाच्या आठ दिवस आधी आईचा फोन आला तेंव्हा मी चक्रावलेच.
"साते, जरा ब्युटीपार्लरमध्ये जाऊन तोंडाचं कायतरी करून ये हो."
"आई, कायतरी काय सांगतेस? मी कधी तिथे गेलेय का? मला वेळतरी कुठाय जायला?" मी.
"ते काही नाही, लग्नाच्या मांडवात मुलगी कशी ऊठून दिसली पाहिजे! माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग--"
"बास,बास तुझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नात काय झालं ते ऐकण्यापेक्षा मी ब्युटीपार्लरमध्ये जाणं पसंत करेन" या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नानेच माझ्या आईच्या डोक्यात माझ्या लग्नाचा भुंगा सोडला होता.म्हणूनच त्या बिचाऱ्या मैत्रिणीचा आणि तिच्या मुलीचा मला खूप राग यायचा.
चला, आता ब्युटिपार्लर शोधमोहिम.बुद्धिमान मुली (या शब्दरचनेला कृपया मराठीतला "तो" अलंकार समजू नये.) ब्युटीपार्लरची पायरी चढत नाहीत असा माझा समज होता.त्यात माझ्या मेडिसिनच्या बॅचमध्ये मी एकटीच मुलगी असल्याने विचारायचं कुणाला हा प्रश्न होता. माझ्या एका हुशार-मित्राच्या खूप मैत्रीणी गायनॅकमध्ये होत्या. त्याने माहिती काढली-- आपल्या हॉस्पिटलच्या मागेच एक प्रसिद्ध पार्लर आहे. भारतीय प्रसाधनसाहित्याच्या बाजारपेठेत मोठं नाव असणाऱ्या कंपनीच्या मालकीचं . सोयीसाठी आपण त्याला " लखुमाई पार्लर" असं म्हणू. माझा हुशार मित्र तर त्या पार्लरचा नंबरही घेऊन आला.
मी फोन लावला. स्वागतिकेने मोठ्या प्रेमाने इंग्रजीत स्वागत केले.
"येस मॅडम, हाऊ कॅन आय हेल्प यू?"
बाई, मला आजची अपॉइंटमेंट दे फक्त.
"मॅडम , व्हॉट वुड यू लाईक टु चेक"
काय काय बरं ते? त्या मैत्रिणीच्या मुलीने दिलेली लिस्ट मी वाचून दाखवली.
"मॅडम वुड यू लाईक टु हॅव एनी स्पेसिफ़िक ऑपरेटर?"
म्हणजे काय? ऑपरेटर म्हणजे काही प्रणाली असते की ब्युटिशियनला ऑपरेटर म्हणतात?
"नो,नो रेग्युलर वन विल डू" मी आपलं दिलं दडपून.
मग त्या बाईने माझं नांव , पत्ता वैगेरे लिहून घेतला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी अपॉइंट्मेंट दिली.
दुसऱ्या दिवशी माझ्या म्होरक्याला मस्का लावून आणि माझ्या सहहरकाम्याला माझ्या वॉर्डची जबाबदारी देऊन मी पोचले लखुमाईत.
दरवाजा ढकलताच एक थंड सुगंधी झुळुक माझ्या अंगावरून गेली. काउंटरवरच्या परीला मी म्हटलं,
" माझी अपॉइंटमेंट आहे दोन वाजताची"
"युवर नेम प्लीज." सगळा इंग्रजीतून कारभार दिसतोय.
" साती, डॉ. साती काळे."
"व्हेन इज शी कमिंग ? इट्स ऑलमोस्ट टु."
बये , तुझ्यासमोर काय भूत उभं आहे काय? मग माझ्या लक्षात आलं , डॉ. म्हटल्यावर काही भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या अपेक्षा असणार बिचारीच्या. हा 'किरकोळ प्रकार' काही डॉक्टर म्हणून तिच्या पचनी पडला नसणार.
"आय ऍम डॉ. साती"
"ओ. आय ऍम वेरी वेरी सॉरी मॅम, यू लुक सो यंग" तिची टिपीकल व्यावसायिक मखलाशी चालू झाली.
आता पुढचा सगळा भाग मी मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करते.
तर मग परीने बेल दाबून एका मुख्य ब्युटिशियनला बोलावले.
" मॅम , तुम्ही पहिल्यांदाच येताय का इकडे?"
"मॅम, काही खास प्रसंगासाठी तयारी करताय का?"
"हो. म्हणजे लग्न आहे ना माझं म्हणून." मी.
"ओहो, एकदम योग्य जागी आलात. आम्ही ब्राईडल थेरपीमध्ये स्पेशालीस्ट समजले जातो. आमच्याकडे तीन पॅकेजेस आहेत. एक तीन महिन्यांचं, एक दोन महिन्याचं आणि एक एका महिन्याचं . तुम्हाला कुठलं हवंय?"
"या बावीस तारखेला माझं लग्न आहे?" मी आवंढा गिळत म्हणाले.
"क्का--य?" तिथे असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर "काय यडी बाई आहे" असे भाव उमटले. "मॅम , इटस टू लेट टु डू एनिथिंग"
"मग मी जाऊ?" हुश्श! सुटले, नको ती कटकट मिटली.
"नो, नो मॅम इटस बेटर लेट दॅन नेव्हर! लेटस थिंक समथिंग."
"मॅम , तुमच्या लग्नाची थीम काय आहे?" परीने विचारले.
माझे आई! थीम-मॅरेज करायला काय तू मला रतनपूरीची राजकन्या समजलीस? मी आपली रत्नागिरीच्या गांवातील साधीसुधी मुलगी.
"नाही नाही . काही विशेष थीम नाही. आपलं नेहमीचंच."
"म्हणजे टिपीकल महाराष्ट्रीयन लग्नं?"
"नाही , कानडी! माझे इन लॉज कानडी आहेत ना!"
"देन देअर इज नो क्वेश्चन ऑफ़ हेअर-स्टायलिंग. कन्नडिगा कीप देअर हेअर इन लाँग प्लेट"
हो का? अरे वा. (मला माहितीच नव्हतं)
ब्युटिशियनने मला एकवार आसेतूहिमाचल न्याहाळून घेतलं मग माझ्या चेहऱ्यावरून एक स्कोप फिरवला. तो एका मॉनिटरला जोडलेला होता. माझ्या चेहऱ्यावरचे खाचखळगे चंद्रावरच्या दऱ्यांप्रमाणे दिसू लागले आणि बारीकशी लव जाड्या काळ्या दोरखंडांप्रमाणे!
मग त्या बायकांची बरीच चर्चा झाली. मध्ये मध्ये मला काही अगम्य प्रश्न विचारणं आणि 'गरीब बिचारी' असे कटाक्ष टाकणं सुरूच होतं.
त्यांचं असं ठरलं की -- मला खालील उपचारांची तातडीची गरज आहे-
१.ब्लीच २. फ़ेशियल ३. आयब्रो ४. पेडिक्युअर ५. मॅनिक्युअर ६. हेअर कंडिशनिंग.
यातले ४ आणि ५ क्रमांकाचे प्रकार मी प्रथमच ऐकत होते. "त्या मुलीच्या " यादीतही ते नव्हते.
मी सगळ्याला मान तुकवली. किती खर्च येईल ते विचारले. मनातल्या मनात पर्सच्या सगळ्या कप्प्यांत असणाऱ्या पैशांची बेरीज केली. आणि स्वतःला त्यांच्या तावडीत सोपवलं.
क्रमशः

एका लग्नाअगोदरची गोष्ट २

रवि, ३०/०४/२००६ - २३:२६.
मी सगळ्याला मान तुकवली. किती खर्च येईल ते विचारले. मनातल्या मनात पर्सच्या सगळ्या कप्प्यांत असणाऱ्या पैशांची बेरीज केली. आणि स्वतःला त्यांच्या तावडीत सोपवलं.
मुख्य ब्युटीशियन मला आत घेऊन गेली. आत खालच्या मजल्यावर काळ्या कपड्यातल्या काळ्या पऱ्या (बहुतांश दाक्षिणात्य) केसांची कलाकुसर करत होत्या. दुसऱ्या पांढऱ्या कपड्यांतील गोऱ्या पऱ्या (बहुतांश मराठी आणि गुज्जु) बायकांचे हात-पाय स्वच्छ करत होत्या. त्यातल्या एका परीला बोलावून आमची ओळख करून देण्यात आली. मुख्य परीने तिला माझ्यावर करायच्या उपचारांची माहिती दिली आणि ती पांढरी परी (हेतल)मला वरच्या मजल्यावर घेऊन गेली. इथे चार-पाच छोट्या-छोट्या वातानुकूलित खोल्या होत्या. त्यातील एका खोलीत मला सोडून आणि एक झबलंवजा गाऊन मला देऊन मला चेंज करायला सांगून परी बाहेर गेली. आम्ही झबलं घालून तय्यार होऊन बसलो.
हेतल आली. आल्या आल्या माझ्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर, हातापायांवर तिची नॉन्स्टॉप बडबड सुरू झाली.
"मॅम, तुम्ही वॅक्सिंग करून घेतलंच पाहिजे."
"नको" मी ठाम निर्धाराने म्हटलं. मागे आमच्या शपथविधी समारंभाच्यावेळी माझी मैत्रीण आणि मी एका कामचलाऊ पार्लरमध्ये गेलो होतो. तिथल्या बाईने वॅक्सिंग असं काही दणक्यात केलं की धनुचा आवाज चार कि.मी. पर्यंत नक्की ऐकू गेला असेल. नंतर तिचे हात सोललेल्या कोंबडीसारखे दिसत होते.
"बरं, मग निदान ब्लीच तरी तुम्ही पूर्ण करून घ्या. "
"पूर्ण म्हणजे?"
"पूर्ण म्हणजे, चेहरा, मान , पाठ, खांदे इ. काही विशेष खर्च नाही चेहऱ्याच्या ब्लीचला ३०० रु. उरलेल्या प्रत्येक भागासाठी १५० रु. वेगळे."
थोड्या वेळाने ही बाई एका मोठ्या टबात ब्लीच बनवून त्यात मला भिजत घालणार असं काहीसं वाटू लागलं.
'' नको,नको"
"अहोपण मॅम, तुम्ही लग्नात साडी नेसणार ना, मग हे सगळं केलंच पाहिजे."
तिने हे सगळं करायची सतराशे साठ कारणे सांगितली आणि शेवटी मी चेहरा आणि मान या भागांसाठी तयार झाले.
मग तिचे माझ्या चेहऱ्यावर नाना उपद्व्याप सुरू झाले. सोबत मी माझ्या चेहऱ्याबद्दल किती निष्काळजी आहे वैगेरे शेरेबाजी सुरू झाली. पूर्वीच्या माणसांकडून न्हाव्यांच्या अखंड बडबडीबद्दल ऐकले होते, पण या आधुनिक न्हाविणी याबाबतीत कुठेही कमी नाहीत याची खात्री पटली.
ब्लीच करताना इतकं चुरचुरतं म्हणून सांगू! संपलं एकदाचं.
आता फेशीयल. यात तुमच्या चेहऱ्यावर हजारो क्रिमा थापल्या जातात. मध्येच एक खरबरीत मलम (स्क्रब) असते. स्क्रब करताना पॉलिश पेपरने चेहरा घासल्यासारखं वाटतं.एका पाइपातून चेहऱ्यावर पाच मिनिटे गरम वाफेचा झोत सोडतात. त्यानंतर एक ब्लॅकहेडस काढणे नावाचा प्रचंड यातनामयी प्रकार. यात धातूची काडी घेऊन चेहऱ्यावरचे काळे डाग टोचून-टोचून काढतात. हे मी ओठावर ओठ दाबून, पायावर पाय दाबून कसं बसं सहन केलं. मग तिने माझ्या डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवल्या, दिवे मंद केले, सुंदरशी संतूरची कॅसेट लावली आणि कुठल्याश्या सुगंधी मलमाने चेहऱ्याला मालीश करू लागली. आता तिची बडबडपण थांबली होती. मी केंव्हा गाढ झोपले मला कळलं सुद्धा नाही. तिने मला उठवलं तेंव्हा फेशीयल संपलं होतं.
भुवया कोरणे या पुढच्या प्रकारासाठी त्याच बेडची कळ फिरवून खुर्ची बनवण्यात आली. इतका मॉडर्न बेड आमच्या हॉस्पिटलामध्ये ऑपरेशनसाठी वापरतात. मग तिने सुरु केलेला प्रकार ऑपरेशनपेक्षा भयानक होता. दातात दोरा धरून ती भुवयांचे केस उपटत चालली होती. मध्ये मध्ये मला इथे पकडा तिथे पकडा अशा सूचना चालूच होत्या .पूर्वी हा प्रकार केला नसल्याने नेमकं काय करायचं याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे माझाच हात मध्ये मध्ये येऊन सगळा प्रकार आणखीनच गुंतागुंतीचा होत होता.
शेवटी संपला तो ही प्रकार. मग आमची रवानगी पुन्हा आमचे कपडे घालून खालच्या मजल्यावर झाली. एका छोटेखानी टेबलासमोर मला बसविण्यात आलं.त्या टेबलाच्या दोन कोपऱ्यात दोन खड्डे करून स्टीलच्या पसरट वाट्या बसवलेल्या होत्या. पायाशी एक मोठा पसरट टब होता. मला टबात दोन्ही पाय आणि त्या वाट्यांत हात बुडवून बसायला सांगण्यात आले. पाय बुडवताच हेतलने कुठलंसं बटण दाबलं आणि पाण्यात चक्क लाटा तयार झाल्या. मग थोड्यावेळाने त्या बंद झाल्यावर दोन पांढऱ्या पऱ्यांनी माझे दोन हात आणि दोघींनी दोन पाय ताब्यात घेतले. आणि मगाशी जे चेहऱ्यावर सोपस्कार झाले तसे सगळे हातापायांवर सुरू झाले. त्यानंतर नखांना छान आकार देऊन रंग लावण्यात आला.
या सगळ्यात माझी परत जायची वेळ होत आली म्हणून केसांच्या सर्व सोपस्कारांना चाट दिली. काउंटरला बिल द्यायला आले तेंव्हा परत प्रश्नांचा भडिमार करून कंपनीची काही अत्यावश्यक सौंदर्यप्रसाधने घेण्यास मला भाग पाडण्यात आले. (जी लग्नानंतर आजतागायत पडून आहेत.) एकंदर ५००० रु. उडवून मी गोरी, कोमल वैगेरे झाले. पूर्वीच्या मुलींचं बरं होतं, बिचाऱ्या एकदाच हळद प्यायच्या आणि गोऱ्या व्हायच्या.
परत आल्यानंतर वर्गातली मुलं माझ्या सुजलेल्या भुवया आणि तेलकट चेहरा बघून हसतच सुटली. नशीब त्या दिवशी राजा खूप बिझी असल्याने मला भेटला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र सगळ्या गोष्टींचा छान परिणाम दिसू लागला.
राजा भेटल्यावर जेव्हा म्हणाला, '' साती आज तो तू एकदम लडकी जैसी दिख रही है रे" तेंव्हा मात्र सगळ्याचं सार्थक झालं असं वाटलं.
(समाप्त)

फ़ेफ़रं

१२/०५/२००६ - १६:०२.
"साती, तुला बहुधा एखाद्या चांगल्या न्यूरॉलॉजिस्टला (चेतासंस्थातज्ज्ञ) दाखवावं लागणार आहे." इति राजा.
"काय?" मी चित्कारले.
एकतर याला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही, आणि कधी मिळालाच तर हे असलं बोलतोय. आतासुद्धा चुकून मिळालेल्या वेळात आमचा (नेहमीप्रमाणे)धेडगुजरी भाषेत प्रेमालाप चालू होता. राजा हिंग्रजीत तर मी हिंगराठीत (हि+इं+म). तसं मीसुद्धा सुरुवात हिंग्रजीत करते त्याला समजावं म्हणून, पण थोड्याच वेळात माझी गाडी मराठीचा रस्ता पकडते. आमचं बोलणं इथे बरंचसं मराठीत भाषांतरित करून लिहितेय.
"अगं, मी म्हणालो , तुला एखाद्या न्यूरॉलॉजिस्टला दाखवावं लागणार आहे. आजकाल तुला ऍब्सेंट सिजर्स येतात की काय अशी शंका येतेय मला."
"ऍब्सेंट सिजर्स?" मी विचारात पडले.
सिजर्स म्हणजे सामान्य लोकांच्या(आम्ही डॉक्टर लोक यांना 'ले पब्लिक' असं म्हणतो) भाषेत आकडी- एपिलेप्सी. अगदी ग्राम्य भाषेत फेफरं. फेफरं म्हटलं की डोळ्यांसमोर ती हातपाय झाडणारी, तोंडाला फेस आलेली, डोळे आकाशात गेलेली टिपीकल माणसे दिसू लागतात. पण एपिलेप्सीचे खूप प्रकार आहेत. मेंदूच्या संदेशवहनासाठी जो विद्युतप्रवाह वापरला जातो त्यात काही बिघाड झाल्यास ही व्याधी उद्भवते.आत्ता मी उल्लेखलेला टिपीकल प्रकार म्हणजे जी. टी. सी. , जनरलाईज्ड टोनिक- क्लोनिक किंवा ग्रँडमल एपिलेप्सी. दुसरा एक प्रकार म्हणजे ऍब्सेंट सिजर्स, पेटिटमल एपिलेप्सी. यात काही क्षण रूग्णाची अजिबात हालचाल होत नाही, रूग्ण जगापासून दूर आपल्यातच हरवतो. पुन्हा भानावर येतो तेंव्हा त्याला मधलं काहीच आठवत नसतं.
आणि असे हे सिजर्स चक्क मला येतायत? आम्ही दोघं न्यूरॉलॉजिस्टकडे गेलोयत, माझ्या मेंदूचा चुंबकीय फोटो (एम. आर. आय.) काढला जातोय, मेंदूच्या विद्युतप्रवाहाचा आलेख (इ. इ. जी.) काढला जातोय असं काहीसं डोळ्यासमोर येऊ लागलं.
"चल, काहीतरीच काय, मला कसं आठवत नाही? मला जाणवलंही नाही कधीच."
"वेडाबाई, उगाच ले पब्लिकसारखं बोलू नकोस. पेटिटमलच्या व्याख्येतच नाही का हे?"
"खरंच रे!" माझ्या मेंदूतला प्रवाह पूर्ववत सुरू झाला बहुदा! " पण तुला कधी जाणवलं हे?"
"कित्येकदा! त्या दिवशी माझी बहीण तुला ब्युटीपार्लरचा पत्ता विचारत होती तेंव्हा, गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून फोन आला आणि तू कालवी ठोकल्याचा आवाज ऐकत होतीस तेंव्हा, त्या दिवशी आईबाबा लातूरमधल्या लोडशेडिंगबद्दल बोलत होते तेंव्हा , अगदी काल माझा तो सतत पैसे मागणारा मित्र आला तेंव्हासुद्धा."
आत्ता मात्र माझी ट्यूब लख्ख पेटली.
"ते होय. ते ऍबसेंट सिजर्स नाही काही. अरे, ते माझ्या मनोगती प्रतिभेला फुटणारे गद्य साहित्याचे धुमारे, काव्याच्या कळ्या. अरेरे, काय हा दैवदुर्विलास! माझ्या थोर साहित्य समाधीचं तू एका शेऱ्यात फेफरं करून टाकलंस?" माझा मराठीच्या रुळावरून भरधाव सुटलेला अग्निरथ गंगा-यमुनेला पूर आल्यामुळे थबकला. मी राजाकडे पाहिलं.
त्याच्या हताश डोळ्यात 'हिला आता सायकिऍट्रिस्टकडेही न्यावं लागणार' हा विचार मला कोणत्याही भाषेत स्पष्ट वाचता येत होता.

सोमवार, मई 22, 2006

यादी

"साते, लग्गेच कँटिनमध्ये ये मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे." अतिदक्षता विभागातील ड्यूटी संपता-संपता मँडीचा फोन आला.
'आत्ता याला काय बोलायचंय बरं?' असा विचार करत मी कँटिनमध्ये आले. मँडी म्हणजे डॉ. मंदार.माझ्या मेडिसीनच्या बॅचमधील सगळ्यात साधा भोळा मुलगा. माणसानं किती भोळं असावं आणि त्याच बरोबर किती व्यवस्थित आणि नीटनेटकं असावं याचं उदाहरण म्हणून मँडीकडे बघावं.लातूरच्या एका आडगावातून आलेला हा मुलगा अभ्यासात अतिशय हुशार.परळच्या प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर झाला. आता आमच्याबरोबर पुढील शिक्षण घेत होता. परळच्या कॉलेजात पूर्ण पाच वर्षात एका मुलीशी कधी बोलला असेल तर शपथ. त्यात कुणी इंग्रजीत बोलू लागलं की साहेब गप्प व्हायचे. त्याच्या नोटस, त्याची जर्नलस इतकी सुंदर असायची की मुलींच्या नुसत्या रांगा लागायच्या म्हणे! (ऐकीव माहिती कारण माझं कॉलेज वेगळं,) पण साहेब मुली बघताच गप्प.
बरं हा दिसायला अगदी छोटासा. जेमतेम सव्वापाच फूट उंची , बारीक चण , गोरापान रंग आणि बालिश चेहरा. डॉक्टर म्हटल्यावर जे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहतं त्याच्या अगदी उलट.
इकडे पी. जी. ला मात्र आम्हा उरलेल्या अकरा जणांच्यात हा मस्त मिसळला. त्यात आम्ही सारेच मराठी त्यामुळे कसे बोलायचे हा प्रश्न नाही. आम्ही मात्र या बाळूला बदलायचा निर्णय घेतला. आणि सगळ्यात पहिलं बदललं त्याचं नाव, जे मंदारचं झालं मँडी. पण नांव बदललं तरी अंतरीचा भाव सहज थोडाच बदलणार? आमचा बाळ्या भोळा तो भोळाच!
आता दुसऱ्या वर्षाला आल्यावर प्रथेप्रमाणे आमच्या वर्गातल्या मुलांचे आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बघणे, दाणे टाकणे, इ उपक्रम सुरू झालेले. अपवाद फक्त दोन.एक मी कारण माझा बालविवाह ठरलेला(हा माझ्या मित्रांचा शब्द ,कारण माझं लग्न इंटर्नशिपमध्ये ठरलं होतं)आणि दुसरा मंदारचा,कारण त्याची कुठल्या मुलीकडे बघायची सुद्धा हिंमत होत नसे. इकडे सगळ्यांच्या आईबाबांनी पण त्यांच्या फ़्रंटवर मुली शोधायचा कार्यक्रम जोरात चालू केल्याने मित्रांपैकी एकजण तरी नव्या पद्धतीप्रमाणे दर आठवड्यात मुलगी बघायला जात असे.तर मँडीने का बोलवले असा विचार करत मी कॅन्टिनमध्ये आले. तो एकटाच एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसला होता.
'हं बोल' मी म्हणाले.'साते, मला उद्या जायचंय मुलगी बघायला.''"वा! अभिनंदन""अभिनंदन कसलं करतेस? मला भिती वाटतेय. मला सवय नाही गं मुली बघण्याची.""अरे, पहिल्याचं वेळी कशी असेल तुला सवय मुली बघायची?"''तसं नव्हे गं.पण, मुलींशी बोलायला जमत नाही मला.""शहाण्या, आता तू काय करतोयस मग?" "ते वेगळं. तू काय मुल.. आय मीन तू काय परकी थोडीच न आहेस ? तू मैत्रीण!""मग तिच्याशीही मैत्रीण समजून बोल न.""पण काय बोलायचं असतं मुलींशी ? तुझ्याशी काय बोलला होता राजा?""अरे आमची गोष्ट वेगळी, आमचा प्रेमविवाह होता.""पण जनरल काही गाइडलाइन्स दे न. काय काय विचारायचं पहिल्या भेटीत?""तिला विचार ती कुठली, कुठे शिकली, हॉस्टेलला राहतं होती का? तिला कायकाय आवडतं,कायकाय नाही, कुठला हिरो आवडतो, गाणं आवडतं ? " "आणखी?""आणखी काय ? नॉन्व्हेज चालतं का नाही ,आणि हो ,लग्नानंतर गावात राहायला आवडेल की नाही ते पण विचारून घे. तुझी आवडनिवड तिला सांग." मी आपलं काहीतरी उत्तर दिलं अंदाजानं."थँक यू साती. मी आता यावर विचार करून काय ते ठरवतो बघ व्यवस्थित" मँडी विचार करत निघून गेला.
दुसऱ्या दिवशी मँडी मुलगी बघायला गेला, परत आला तो काय बोलायला तयारच होईना. याचं काहीतरी बिनसलंय हे लक्षात घेऊन सारेजण एकएक करून निघून गेले. मी आणि तो, दोघंच उरलो.
"हं आता बोल काय झालं?''"काय होणार,कप्पाळ? तू म्हणाल्याप्रमाणे मी तिला घेऊन हॉटेलात गेलो, समोरासमोर बसलो, त्या दिवशीची यादी बाहेर काढली आणि एकएक प्रश्नांची उत्तरे विचारुन ती टीक केली.""यादी! कसली यादी ?"
त्याने मला खिशातून यादी काढून दाखवली.मँडीच्या सुरेख अक्षरात छान कोष्टक करून मुद्दा, माझं मत ,तिचं मत ,शेरा असलं लिहिलेली ती मजेशीर यादी होती.
"ही तू तिच्यासमोर बाहेर काढलीस?""हो . अग एकएक प्रश्न विचारून,त्यावर टीक करूनच मी पुढचा प्रश्न विचारंत होतो."
कित्ती आमचं बाळ भोळं आणि व्यवस्थित ! मी कपाळावर हात मारून घेतला.
"ती काय म्हणाली मग?"
एवढंसं तोंड करून मँडी म्हणाला --"काय नाही, दहा प्रश्न झाल्यावर 'I think you need time to grow up, kid' असं म्हणून ती चक्क निघून गेली गं."