गुरुवार, मई 25, 2006

एका लग्नाअगोदरची गोष्ट २

रवि, ३०/०४/२००६ - २३:२६.
मी सगळ्याला मान तुकवली. किती खर्च येईल ते विचारले. मनातल्या मनात पर्सच्या सगळ्या कप्प्यांत असणाऱ्या पैशांची बेरीज केली. आणि स्वतःला त्यांच्या तावडीत सोपवलं.
मुख्य ब्युटीशियन मला आत घेऊन गेली. आत खालच्या मजल्यावर काळ्या कपड्यातल्या काळ्या पऱ्या (बहुतांश दाक्षिणात्य) केसांची कलाकुसर करत होत्या. दुसऱ्या पांढऱ्या कपड्यांतील गोऱ्या पऱ्या (बहुतांश मराठी आणि गुज्जु) बायकांचे हात-पाय स्वच्छ करत होत्या. त्यातल्या एका परीला बोलावून आमची ओळख करून देण्यात आली. मुख्य परीने तिला माझ्यावर करायच्या उपचारांची माहिती दिली आणि ती पांढरी परी (हेतल)मला वरच्या मजल्यावर घेऊन गेली. इथे चार-पाच छोट्या-छोट्या वातानुकूलित खोल्या होत्या. त्यातील एका खोलीत मला सोडून आणि एक झबलंवजा गाऊन मला देऊन मला चेंज करायला सांगून परी बाहेर गेली. आम्ही झबलं घालून तय्यार होऊन बसलो.
हेतल आली. आल्या आल्या माझ्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर, हातापायांवर तिची नॉन्स्टॉप बडबड सुरू झाली.
"मॅम, तुम्ही वॅक्सिंग करून घेतलंच पाहिजे."
"नको" मी ठाम निर्धाराने म्हटलं. मागे आमच्या शपथविधी समारंभाच्यावेळी माझी मैत्रीण आणि मी एका कामचलाऊ पार्लरमध्ये गेलो होतो. तिथल्या बाईने वॅक्सिंग असं काही दणक्यात केलं की धनुचा आवाज चार कि.मी. पर्यंत नक्की ऐकू गेला असेल. नंतर तिचे हात सोललेल्या कोंबडीसारखे दिसत होते.
"बरं, मग निदान ब्लीच तरी तुम्ही पूर्ण करून घ्या. "
"पूर्ण म्हणजे?"
"पूर्ण म्हणजे, चेहरा, मान , पाठ, खांदे इ. काही विशेष खर्च नाही चेहऱ्याच्या ब्लीचला ३०० रु. उरलेल्या प्रत्येक भागासाठी १५० रु. वेगळे."
थोड्या वेळाने ही बाई एका मोठ्या टबात ब्लीच बनवून त्यात मला भिजत घालणार असं काहीसं वाटू लागलं.
'' नको,नको"
"अहोपण मॅम, तुम्ही लग्नात साडी नेसणार ना, मग हे सगळं केलंच पाहिजे."
तिने हे सगळं करायची सतराशे साठ कारणे सांगितली आणि शेवटी मी चेहरा आणि मान या भागांसाठी तयार झाले.
मग तिचे माझ्या चेहऱ्यावर नाना उपद्व्याप सुरू झाले. सोबत मी माझ्या चेहऱ्याबद्दल किती निष्काळजी आहे वैगेरे शेरेबाजी सुरू झाली. पूर्वीच्या माणसांकडून न्हाव्यांच्या अखंड बडबडीबद्दल ऐकले होते, पण या आधुनिक न्हाविणी याबाबतीत कुठेही कमी नाहीत याची खात्री पटली.
ब्लीच करताना इतकं चुरचुरतं म्हणून सांगू! संपलं एकदाचं.
आता फेशीयल. यात तुमच्या चेहऱ्यावर हजारो क्रिमा थापल्या जातात. मध्येच एक खरबरीत मलम (स्क्रब) असते. स्क्रब करताना पॉलिश पेपरने चेहरा घासल्यासारखं वाटतं.एका पाइपातून चेहऱ्यावर पाच मिनिटे गरम वाफेचा झोत सोडतात. त्यानंतर एक ब्लॅकहेडस काढणे नावाचा प्रचंड यातनामयी प्रकार. यात धातूची काडी घेऊन चेहऱ्यावरचे काळे डाग टोचून-टोचून काढतात. हे मी ओठावर ओठ दाबून, पायावर पाय दाबून कसं बसं सहन केलं. मग तिने माझ्या डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवल्या, दिवे मंद केले, सुंदरशी संतूरची कॅसेट लावली आणि कुठल्याश्या सुगंधी मलमाने चेहऱ्याला मालीश करू लागली. आता तिची बडबडपण थांबली होती. मी केंव्हा गाढ झोपले मला कळलं सुद्धा नाही. तिने मला उठवलं तेंव्हा फेशीयल संपलं होतं.
भुवया कोरणे या पुढच्या प्रकारासाठी त्याच बेडची कळ फिरवून खुर्ची बनवण्यात आली. इतका मॉडर्न बेड आमच्या हॉस्पिटलामध्ये ऑपरेशनसाठी वापरतात. मग तिने सुरु केलेला प्रकार ऑपरेशनपेक्षा भयानक होता. दातात दोरा धरून ती भुवयांचे केस उपटत चालली होती. मध्ये मध्ये मला इथे पकडा तिथे पकडा अशा सूचना चालूच होत्या .पूर्वी हा प्रकार केला नसल्याने नेमकं काय करायचं याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे माझाच हात मध्ये मध्ये येऊन सगळा प्रकार आणखीनच गुंतागुंतीचा होत होता.
शेवटी संपला तो ही प्रकार. मग आमची रवानगी पुन्हा आमचे कपडे घालून खालच्या मजल्यावर झाली. एका छोटेखानी टेबलासमोर मला बसविण्यात आलं.त्या टेबलाच्या दोन कोपऱ्यात दोन खड्डे करून स्टीलच्या पसरट वाट्या बसवलेल्या होत्या. पायाशी एक मोठा पसरट टब होता. मला टबात दोन्ही पाय आणि त्या वाट्यांत हात बुडवून बसायला सांगण्यात आले. पाय बुडवताच हेतलने कुठलंसं बटण दाबलं आणि पाण्यात चक्क लाटा तयार झाल्या. मग थोड्यावेळाने त्या बंद झाल्यावर दोन पांढऱ्या पऱ्यांनी माझे दोन हात आणि दोघींनी दोन पाय ताब्यात घेतले. आणि मगाशी जे चेहऱ्यावर सोपस्कार झाले तसे सगळे हातापायांवर सुरू झाले. त्यानंतर नखांना छान आकार देऊन रंग लावण्यात आला.
या सगळ्यात माझी परत जायची वेळ होत आली म्हणून केसांच्या सर्व सोपस्कारांना चाट दिली. काउंटरला बिल द्यायला आले तेंव्हा परत प्रश्नांचा भडिमार करून कंपनीची काही अत्यावश्यक सौंदर्यप्रसाधने घेण्यास मला भाग पाडण्यात आले. (जी लग्नानंतर आजतागायत पडून आहेत.) एकंदर ५००० रु. उडवून मी गोरी, कोमल वैगेरे झाले. पूर्वीच्या मुलींचं बरं होतं, बिचाऱ्या एकदाच हळद प्यायच्या आणि गोऱ्या व्हायच्या.
परत आल्यानंतर वर्गातली मुलं माझ्या सुजलेल्या भुवया आणि तेलकट चेहरा बघून हसतच सुटली. नशीब त्या दिवशी राजा खूप बिझी असल्याने मला भेटला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र सगळ्या गोष्टींचा छान परिणाम दिसू लागला.
राजा भेटल्यावर जेव्हा म्हणाला, '' साती आज तो तू एकदम लडकी जैसी दिख रही है रे" तेंव्हा मात्र सगळ्याचं सार्थक झालं असं वाटलं.
(समाप्त)

कोई टिप्पणी नहीं: