मंगलवार, जनवरी 16, 2007

साम्राज्य!

सदर कथेतील सर्व जागा, व्यक्ती आणि घटना पूर्णपणे काल्पनिक असून वास्तवातील कुठल्याही जागा, व्यक्ती आणि घटनेशी त्यांचे साम्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


साम्राज्य!
त्या रुग्णालयात फिरताना त्याला अगदी वेगळं वाटत होतं. चकाचक प्रवेशद्वार, दाराजवळ स्वागतिका, प्रत्येक वार्डच्या बाहेर दिसेल असा लिहिलेला वार्ड क्रमांक आणि दाराबाहेर हसतमुख चपरासी. वार्डातसुद्धा अंतर राखून बसवलेल्या खाटा, प्रत्येक खाटेवर जणू कालच नवीन घेतलीय अशी वाटणारी शुभ्र चादर, तितक्याच नव्या शुभ्र इस्पितळी गणवेशातला रुग्ण, तोही एका खाटेवर एकच. हसतमुख परिचारिका आणि तिचाही नवानवासा वाटणारा गणवेश!
त्याला आपलं इस्पितळ , आपलं म्हणजे मुंबई म. न. पा. चं इस्पितळ आठवलं. तो गोंधळ, ती रुग्णांची गर्दी, ते एका खाटेवर आणि खाटेखालीही दोन रुग्ण. घांणेरड्या चादरी, तोंडाला दारुचा वास येणारा वॉर्डबॉय आणि (रुग्ण आणि शिकाऊ डॉक्टरवर सारख्याच प्रेमाने) वसावसा ओरडणारी परिचारिका.
इथे मात्र प्रत्येक खाटेशेजारी रुग्णाचे नाव लिहिलेला फलक, बाजूच्या टेबलावर औषधाच्या बाटल्या, एका स्टँडवर वेगवेगळ्या रंगात आणि आकारात अडकवलेल्या शिरेतून द्यायच्या औषधाच्या बाटल्या, त्याही पूर्ण भरलेल्या. किती तत्पर असतील इथल्या परिचारिका ! त्याच्या मनपी इस्पितळात रुग्णाचे नातेवाईक दहावेळा जाऊन 'बाटली संपली' असं सांगणार तेंव्हा कुठे नर्सबाई जागच्या उठतात. तोपर्यंत लटकताहेत बाटल्या आपल्या रिकाम्याच्या रिकाम्या. इथल्या काही वार्डात कुठे बँडेज केलेले, कुठे प्लास्टर केलेले रूग्णही दिसत होते. पण सगळं कसं छान स्वच्छ. रुग्णही अगदी हसतमुख , वेदनेचा लवलेशही चेहऱ्यावर नसलेले.
''बरोबर आहे, शेवटी आजूबाजूच्या वातावरणाचाही परिणाम होतोच ना रुग्णावर! इतकं छान इस्पितळ असेल तर कुठलाही रोगी आनंदीच दिसणार.''
आता तुम्ही म्हणाल हा मनपात गेल्यावर्षापर्यंत शिकणारा आपला हिरो इकडे या चकाचक इस्पितळात काय करतोय?तर त्याच असं झालं होतं की नुकतीच इंटर्नशिप संपवून आणि पुढच्या अभ्यासाची प्रवेशपरीक्षा देऊन तो घरी जायच्या तयारीत होत तेंव्हा हॉस्टेलमध्ये बांधाबांध करत असताना त्याचा **** या गावात राहणारा मित्र आला. त्याने एक सही ऑफर आणली होती. त्याच्या गावातल्या वैद्यकीय महाविद्यालयात फक्त एक दिवस मुलांचे दोन तासांचे लेक्चर घेण्यासाठी काही नुकतेच पास झालेले डॉक्टर पाहिजे होते. यायचा जायचा खर्च, जेवण आणि २००० रु. मिळणार होते. काही मुलांना घेऊन हा गावी जाणार होता. ऑफर काही वाईट नव्हती आणि पुढच्या एक महिन्यापुरते हातखर्चासाठी पैसे मिळणार असल्याने तो ही जायला तयार झाला.
ते गांव मोठं झोकदार होतं. *** नांवाच्या राजकारण्यामुळे चांगलंच प्रकाशात आलेलं. *** साहेबांच्या फॅक्टऱ्या ,अनेक उद्योग ,राजकारणात मोठं नाव, सध्याचं मंत्रिपद, पुढेमागे मुख्यमंत्री होण्याच्या शक्यता! त्यांच्याच प्रसिद्ध शिक्षणसंस्थेचं हे मेडिकल कॉलेज. तीन चार वर्षांपूर्वीच सुरू झालं होतं. इथेच व्याख्यान देण्यासाठी तो आणि त्याचे काही मित्र निघाले होते. त्याचा ऍनॉटॉमी (शरीररचनाशास्त्र) हा विषय पक्का असल्याने ह्युमेरस म्हणजे हाताचं हाड या विषयावर तो व्याख्यान देणार होता.
व्याख्यानाच्या दिवशी सकाळी त्याला स्टाफरूममध्ये बोलवण्यात आलं. 'डॉक्टर अमुक तमुक, व्याख्याता शरीररचनाशास्त्र ' असं लिहिलेला शुभ्र पांढरा ऍप्रन त्याला देण्यात आला. स्वतःच नाव असं लिहिलेलं पाहून तो सुखावलाच मनात! पहिल्या वर्षाच्या मुलांना शिकवायचं होतं. तो धडधडणारी छाती घेऊनच वर्गात शिरला.
मुलं अगदी शांत, दंगा न करता बसलेली पाहून त्याला आश्चर्यच वाटलं, पणमग त्या शांततेमुळेच हायसं वाटून त्याने बॅगेतून ह्युमेरस काढून शिकवायला सुरुवात केली. मध्येच चार पाच सुटाबुटातील माणसे ,एक दोन उंची साड्यांतल्या बायका येऊन मागच्या बाकावर पाचसहा मिनिटे बसून गेले. आपले शिक्षणमहर्षी मंत्रीही त्याना काहीतरी सांगत होते. ती पाचसहा मिनिटे तो थोडा विचलित झाला, पण नंतर मात्र आपला आवडता विषय शिकविण्यात रंगून गेला. त्या मोठ्या माणसांच्या येऊन जाण्यापर्यंत शांत बसलेली मुलं आता मात्र बोलू लागली ,काही शंका विचारू लागली. व्याख्यान संपल्यावर तो म्हणाला ,
''मित्रांनो, आता रूमवर परत गेल्यावर सर्वांनी आपल्या सेटमधील ह्युमेरस घेऊन शिकवलेल्या भागाची उजळणी करा." "सर, आपल्या सेटमधील म्हणजे--" आचरट वाटणारा प्रश्न निरागस स्वरात आला. "आपल्या म्हणजे -तुम्ही विकत घेतला असेलच ना बोनसेट अभ्यासाला!""नाही, आमच्या कॉलेजात फक्त दोन सेट आहेत तेच आम्ही वापरतो"
तो चकीतच झाला. हे म्हणजे स्वतःकडे पेन्सिल नसताना चित्रकला शिकण्यासारखं होतं. त्याला आठवलं त्याच्या कॉलेजात प्रत्येकाकडे एक किंवा किमान दोघात एकतरी बोनसेट असतो.खऱ्याखुऱ्या माणसाची खरीखुरी हाडे हाताळल्याखेरीज माणसाची पूर्ण रचना शिकणार तरी कशी? तो आणि त्याचे मित्र तर पहिल्या वर्षी वाचता वाचताच पुस्तकांप्रमाणे एकदोन हाडं , कवटी इ. डोक्याजवळ घेऊन झोपत असत, आणि इथे या पूर्ण कॉलेजात चक्क दोन सेट फक्त!
तास संपल्यावर तो स्टाफरूमकडे परतू लागला. परत तेच चकाचक वॉर्ड आणि चकाचक पेशंट. काहीतरी चुकतंय असं त्याच्या आत्ता लक्षात येऊ लागलं होतं. स्टाफरूममध्ये ओळख करून देण्याच्या कार्यक्रमात तर सुटातल्या त्या माणसांशी त्याची ओळख जेव्हा ' हे आमचे विद्यार्थीप्रिय व्याख्याते' अशी करून देण्यात आली तेंव्हा त्याची खात्रीच पटली की काहीतरी गोच आहे. शेवटी सगळे सूटबूट निघून गेले आणि बरोबर सहा वाजता दोन हजाराचं पाकीट त्याच्या हातात पडलं.
मित्राचं घर जवळच असल्याने तो त्याच्याकडेच उतरला होता. मित्राकडे आपल्याला जाणवलेल्या गोष्टी तो जेव्हा बोलला तेंव्हा मित्र काहीच म्हणाला नाही फक्त उद्या तुला मजा दाखवतो म्हणाला. रात्री लांबवर दिसणाऱ्या *** साहेबांच्या रेस्टहाऊसवर बराचवेळ रोषणाई नी लगबग दिसत होती.
दुसऱ्या दिवशी त्याच हॉस्पिटलात मित्र घेऊन गेला. बाहेर निवडणुकांच्या वेळेला पक्षाच्या कार्यालयात लागतात तशा गाड्या लागल्या होत्या. ठेकेदार मोजून माणसे गाडीत भरत होता. कालचे रुग्ण आज आरामात बॅंडेज वैगेरे सोडून तंबाखू चोळत गाडीत बसत होते. सगळ्या वॉर्डातून चादरी , परिचारिका आणि पेशंट गायब झाले होते. दूर कुठे एका कोपऱ्यातल्या वॉर्डात सातआठ खरेखुरे रुग्ण विव्हळत पडले होते तेवढेच!
"हा काय प्रकार?'' तो म्हणाला.
"काही नाही , मेडिकल कौन्सिलचं इंस्पेक्शन होतं, काल संपलं."
"काय?"
त्याच्या लक्षात सगळा प्रकार आला."त्या नव्या चादरी ते स्वच्छ रुग्ण, सगळंच खोटं होतं म्हणजे!"
"अरे तू पण तर खोटांखोटांचं परमनंट लेक्चरर होतास ना? आता 'रुग्ण आणि शिक्षकांची संख्या आवश्यकतेप्रमाणे आहे' या अटीच्या पूर्ततेमुळे या कॉलेजला मेडिकल कौन्सिलचे रेकग्निशन मिळेल आणि पैसे भरून या नव्या कॉलेजात डॉक्टर व्हायला आलेल्या पोरांचे पैसे सार्थकी लागतील"
'शीः! इतक्या हलक्या कृत्यात, अशा फसवणुकीत सहभागी झालो आपण! आता उद्या या कॉलेजला रेकग्निशन मिळेल, संपूर्ण साडेचार वर्षांच्या शिक्षणात हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण बघितलेल्या पोरांना डिग्र्या मिळतील. आईबापाने सीट मिळवण्यासाठी ओतलेला पैसा ते चुकीचे उपचार करून आपल्या रुग्णांकडून वसूल करतील . आणि या सगळ्या पापात आपण पण सहभागी असू.'
शिक्षणसम्राटांचे साम्राज्य सोडून येताना मिळालेले २०००रु. आता त्याच्या खिशात टोचू लागले होते.

कोई टिप्पणी नहीं: