गुरुवार, मई 25, 2006

फ़ेफ़रं

१२/०५/२००६ - १६:०२.
"साती, तुला बहुधा एखाद्या चांगल्या न्यूरॉलॉजिस्टला (चेतासंस्थातज्ज्ञ) दाखवावं लागणार आहे." इति राजा.
"काय?" मी चित्कारले.
एकतर याला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही, आणि कधी मिळालाच तर हे असलं बोलतोय. आतासुद्धा चुकून मिळालेल्या वेळात आमचा (नेहमीप्रमाणे)धेडगुजरी भाषेत प्रेमालाप चालू होता. राजा हिंग्रजीत तर मी हिंगराठीत (हि+इं+म). तसं मीसुद्धा सुरुवात हिंग्रजीत करते त्याला समजावं म्हणून, पण थोड्याच वेळात माझी गाडी मराठीचा रस्ता पकडते. आमचं बोलणं इथे बरंचसं मराठीत भाषांतरित करून लिहितेय.
"अगं, मी म्हणालो , तुला एखाद्या न्यूरॉलॉजिस्टला दाखवावं लागणार आहे. आजकाल तुला ऍब्सेंट सिजर्स येतात की काय अशी शंका येतेय मला."
"ऍब्सेंट सिजर्स?" मी विचारात पडले.
सिजर्स म्हणजे सामान्य लोकांच्या(आम्ही डॉक्टर लोक यांना 'ले पब्लिक' असं म्हणतो) भाषेत आकडी- एपिलेप्सी. अगदी ग्राम्य भाषेत फेफरं. फेफरं म्हटलं की डोळ्यांसमोर ती हातपाय झाडणारी, तोंडाला फेस आलेली, डोळे आकाशात गेलेली टिपीकल माणसे दिसू लागतात. पण एपिलेप्सीचे खूप प्रकार आहेत. मेंदूच्या संदेशवहनासाठी जो विद्युतप्रवाह वापरला जातो त्यात काही बिघाड झाल्यास ही व्याधी उद्भवते.आत्ता मी उल्लेखलेला टिपीकल प्रकार म्हणजे जी. टी. सी. , जनरलाईज्ड टोनिक- क्लोनिक किंवा ग्रँडमल एपिलेप्सी. दुसरा एक प्रकार म्हणजे ऍब्सेंट सिजर्स, पेटिटमल एपिलेप्सी. यात काही क्षण रूग्णाची अजिबात हालचाल होत नाही, रूग्ण जगापासून दूर आपल्यातच हरवतो. पुन्हा भानावर येतो तेंव्हा त्याला मधलं काहीच आठवत नसतं.
आणि असे हे सिजर्स चक्क मला येतायत? आम्ही दोघं न्यूरॉलॉजिस्टकडे गेलोयत, माझ्या मेंदूचा चुंबकीय फोटो (एम. आर. आय.) काढला जातोय, मेंदूच्या विद्युतप्रवाहाचा आलेख (इ. इ. जी.) काढला जातोय असं काहीसं डोळ्यासमोर येऊ लागलं.
"चल, काहीतरीच काय, मला कसं आठवत नाही? मला जाणवलंही नाही कधीच."
"वेडाबाई, उगाच ले पब्लिकसारखं बोलू नकोस. पेटिटमलच्या व्याख्येतच नाही का हे?"
"खरंच रे!" माझ्या मेंदूतला प्रवाह पूर्ववत सुरू झाला बहुदा! " पण तुला कधी जाणवलं हे?"
"कित्येकदा! त्या दिवशी माझी बहीण तुला ब्युटीपार्लरचा पत्ता विचारत होती तेंव्हा, गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून फोन आला आणि तू कालवी ठोकल्याचा आवाज ऐकत होतीस तेंव्हा, त्या दिवशी आईबाबा लातूरमधल्या लोडशेडिंगबद्दल बोलत होते तेंव्हा , अगदी काल माझा तो सतत पैसे मागणारा मित्र आला तेंव्हासुद्धा."
आत्ता मात्र माझी ट्यूब लख्ख पेटली.
"ते होय. ते ऍबसेंट सिजर्स नाही काही. अरे, ते माझ्या मनोगती प्रतिभेला फुटणारे गद्य साहित्याचे धुमारे, काव्याच्या कळ्या. अरेरे, काय हा दैवदुर्विलास! माझ्या थोर साहित्य समाधीचं तू एका शेऱ्यात फेफरं करून टाकलंस?" माझा मराठीच्या रुळावरून भरधाव सुटलेला अग्निरथ गंगा-यमुनेला पूर आल्यामुळे थबकला. मी राजाकडे पाहिलं.
त्याच्या हताश डोळ्यात 'हिला आता सायकिऍट्रिस्टकडेही न्यावं लागणार' हा विचार मला कोणत्याही भाषेत स्पष्ट वाचता येत होता.

1 टिप्पणी:

  1. स्वाती,

    सुंदर, निखळ विनोद! लेख आवडला.

    "माझा मराठीच्या रुळावरून भरधाव सुटलेला अग्निरथ गंगा-यमुनेला पूर आल्यामुळे थबकला." लाजवाब वाक्य आहे.

    मराठी अनुदिनी विश्वात स्वागत आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

    जवाब देंहटाएं