मंगलवार, जनवरी 16, 2007

मेकिंग ऑफ़ स्पेशालीस्ट 1

मेकिंग ऑफ़ स्पेशालीस्ट
माझं थोडंफार लेखन आवडीने वाचल्याबद्दल धन्यवाद.यापुढेही असेच लिहीत राहाण्याचा मानस आहे. आपल्या मनोगतावर अनेक नेटकर हे संगणक क्षेत्राशी संबंधीत आहेत.माझ्या "वैदु" जमातीतील फारच कमी लोक दिसतात.त्यामुळे माझ्या यापुढील लिखाणाचा संदर्भ लागावा याकरिता हा लेख.
आपापला बाळ्या किंवा बाळी शाळेत थोडी जरी हुशार असली तरी आईबाबांना त्याला/तिला डॉक्टर बनवायचे वेध लागतात. दहावीच्या अगोदर पासुनच कानी कपाळी ओरड व्हायला सुरुवात होते, "चांगले मार्कस मिळवायचे बरं, विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला पाहिजे." बाळी खूप अभ्यास करते,विज्ञान शाखेत प्रवेश मिळवते, बारावी पास होते,जेवढ्या असतील नसतील तेवढ्या सी.ई.ट्या. (प्रवेश परीक्षा) देते. शक्यतो‌ सरकारी नाहीतर महानगरपालिकेच्या कॉलेजात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करते.तिला माहित असतं कितीही उद्या मारल्या तरी खाजगी कॉलेजांतील फ़ी आपल्या पालकांना परवडणार नाही.
तर, बारावीचा रिझल्ट लागल्यावर आम्हांला मेडिकलला प्रवेश मिळतो. (आमच्यावेळी ही सतरा प्रवेश-परीक्षा द्यायची भानगड नव्हती.) आता बाळ्या/ बाळी मोठे स्पेशालिस्ट होऊनच बाहेर पडणार,खूप मान आणि खोऱ्याने पैसे मिळवणार अशा भ्रमात आई-बाबा अस्तात.
पण एका-एका यत्तेत दीड वर्षं अशी साडेचार वर्षे आम्हांला डॉक्टर व्हायची तात्पुरती पदवी मिळवायलाच लागतात.(नियमित पास झालो तरच हो!)
मग आम्ही होतो, "आंतर्वासित!" इंग्रजीत यालाच ईंटर्न असे म्हणतातं. नाव जरी आंतर्वासीत असले तरी वैद्यकीय क्षेत्रात आम्ही असतो ना आतले ना बाहेरचे.म्हणजे विद्यार्थी नाही म्हणून आम्हाला अभ्यास नाही,लेक्चर्स नाहीत , इस्पितळाच्या वार्डात काम करायला लागतं. तर पूर्णपणे डॉक्टर झालो नाही म्हणून अगदी लिंबू-टिंबू कामं सांगतात. यातच आजकाल उच्चशिक्षणासाठी प्रवेश-परीक्षेचा अभ्यास करायचा असतो.मग आई-बाबांकडे पैशासाठी हात पसरा, क्लासेस लावा,क्लासची वेळ आणि अभ्यास सांभाळण्यासाठी वॉर्डमधुन खोटं बोलुन पळा अशी यातायात करायला लागते. सरतेशेवटी परीक्षा देऊन आपण कुठेतरी जागा मिळवतो.
आता यातही गंमत अशी की पुढे ज्या विषयातील पदवीचा फायदा पैशांचं खोरं मिळवण्यासाठी होइल(क्लिनीकल साईड म्हणजे मेडिसीन,सर्जरी,गायनॅक इ.) अशा विषयासाठी मोठी स्पर्धा असते. अश्या फावड्याचा दांडा एकदा मिळाला की सुटलो असं मात्र होत नाही. मग सुरु होतो पी. जी. चा खडतर प्रवास.
पी. जी. ची तीन वर्षं असतात,प्रत्येकी एका वर्षाची. यात क्लिनीकल साइडला आपण डार्विनचा ऊत्क्रांतीवाद अक्षरशः अनुभवतो. आणि ऊत्क्रांतीच्या वेदनाही.या प्रवासाची ही एक झलक.
पायरी१ - गर्दभावस्था
पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेजात म्हणतात,जे.आर.(ज्युनि.रेसिडेंट) आणि मुंबै महानगरपालिकेच्या कॉलेजात हाऊसमन.काही ठिकाणी मुलींना वाईट वाटु नये म्हणून एच.ओ. म्हणजे हाउस ऑफिसर म्हणायची पद्ध्त आहे. काही म्हणा आम्ही याला म्हणतो,एच.के. म्हणजे "हरकाम्या/हरकामी."
हरकाम्याने वॉर्डातील हरप्रकारचे काम न कुरकुरता करणे अपेक्षित असते. एका रुममध्ये असे साताठ हरकामे राहात असतात.आता दहा बाय दहाच्या रुममध्ये हे सगळे कसे राहातात हे विचारु नका. कारण सगळे हरकामे अठरा ते वीस तास वॉर्डातच असतात.
चुकुन रात्री ऊशीरा कधी रुमवर येउन अगोदर आलेल्या दुसऱ्या हरकाम्याला पलिकडे सरकवून झोपायला वेळ मिळाला की लगेच वॉर्डमधुन मामा बोलवायला येतातच. याला कॉल येणे असं म्हणतात. "अमुक अमुक नंबरचा पेशंट कॉटवरुन पडलाय लवकर या." मग ऍप्रन घालुन हरकाम्या परत वॉर्डमध्ये. कोणी एक मोहमद सलिम झोपेत बाजुच्या रामभरोसेच्या कॉट्खाली झोपलेल्या बायकोवर पडलेला असतो. दोघांच्या बायकांचे कडाक्याचे भांडण चालु असते.आपण ते सोडवतो,पेशंट पडल्याचे अपघात विभागात कळवतो,पोलिसांना कळवतो, तात्पुरते उपचार करतो. हे होइपर्यंत दुसऱ्या दिवशी उठायची वेळ झालेली असते.
मग भल्या पहाटे सुरु होतं ब्लड कलेक्शन ! प्रत्येक पेशंटचं रक्त घेउन, योग्य त्या बाटल्यंत भरुन फ़ॉर्म भरुन त्यावर ठेवायचं. ब्लड घेताना पेशंट इतकी कट्कट करतात की जणू हे ब्लड आपण आपल्या वैयक्तिक वापऱासाठी घेतोय. मध्ये मध्ये पेशंटच्या बारिक-सारिक तक्रारी सुरुच असतात. सगळ संपल्यावर आपण पेशंट तपासतो. तेवढ्यात आपला म्होरक्या राउंडला येतो.
म्होरक्या म्हणजे तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी. हा बिचारा आपला अभ्यास,प्रबंध आणि शिक्षकांच्या अपेक्षा यांनी इतका रंजला-गांजलेला असतो की हरकाम्याची प्रत्येक चूक त्याला डोंगऱाएवढी वाटत असते. प्रत्येक पेशंटच्या कॉटपाशी जाउन त्याला तपासल्यानंतर हरकाम्याच्या चुका काढुन त्याला ओरडण्यासाठी बहुधा म्होरक्याला जादा वेतन मिळत असणार असं मला हरकामी असताना वाटायचं.(नंतर मी म्होरकी झाल्यावर मीसुद्धा हेच केलं म्हणा.) तर असे होतात म्होरक्याचे राउंड. मग व्याख्याते,कनिष्ठ प्राध्यापक,वरिष्ठ प्राध्यापक यांचे अनुक्रमे राउंड होतात.प्रत्येक राउंडगणिक हरकाम्याची कामाची यादी वाढत जाते. शेवटी सगळे गेल्यावर तो हे काम करत बसतो.
संध्याकाळी परत आपला ,मग म्होरक्याचा राउंड होतो.पुन्हा एकदा ओरडण्याचा कार्यक्रम होतो. पुन्हा कामे संपवून झोपायला जायला दोन-तीन वाजतात.
हा एक साधा दिवस साध्या मेडिसीन वैगेरे स्पेशालिटीतला. अजून नवीन रुग्ण भरतीचा दिवस, स्पेशल ओ.पि. डी. चा दिवस असे काळेकुट्ट दिवस दर आठवड्यात असतात.त्याविषयी पुन्हा केव्हातरी. पण गायनॅक. सर्जरी इत्यादी काटछाटीच्या प्रदेशात याहुन दारुण अवस्था असते. इथे वरील सर्व कामांसोबतच रुग्णाची शल्यक्रियेसाठी पूर्वतयारी करणे हे एक मोठेच काम असते. त्याकरिता भूलतज्ञ सांगतील त्या सर्व तपासण्या करणे,ते मागतील त्यांच्याकडुन ना हरकत (फ़िट्नेस फ़ॉर सर्जरी)मिळवणे ह्या गोष्टी सगळ्यांशी गोड बोलुन करुन घ्याव्या लागतात. या तपःश्चर्येनंतर वरिष्ठ एखादी बारीकशी शस्त्रक्रिया आपल्याला करु देतात किंवा एखाद्या मोठ्या क्रियेत लिंबु-टिंबु म्हणून मदत करु देतात. त्या दिवशी आपण स्वर्ग गवसल्याच्या आनंदात असतो.
अशीच कशीबशी एका वर्षाने ही गर्दभावस्था संपते.

1 टिप्पणी:

RISHIKESH CHINDARKAR ने कहा…

Uttam Lekhan. Atishay Oghavtya Shailt lihilele varnan. Manapasun aavadale.