बुधवार, जुलाई 26, 2006

dagadanchi khichadi

आटपाट नगर होते, नगर कसले मोठासा देशच होता तो. प्रत्येक आटपाट नगरवाल्या गोष्टीत एकतरी गरीब ब्राह्मण असतो, इथे जातीपातीचे काही माहीत नाही ; पण बरेच गरीब स्वभावाचे पांढरपेशे मध्यमवर्गीय राहत होते. शक्यतो शासन या बड्या मालकाकडे ते नोकरी करायचे म्हणून इतर त्यांना 'बाबू' असे म्हणायचे. या लोकांना ओळखायची खूण म्हणजे त्यांनी काहीही खाल्लं तरी सर्व पदार्थांची चव 'वरणभात, भेंडीची भाजी' या काँबिनेशनपेक्षा वेगळी लागत नसे.
दर दहा वर्षांनी शासन साहेबांकडे या पांढरपेशांचे प्रतिनिधी जाऊन वेतनवाढ मागायचे, तसे ते या वेळीही गेले. शासन साहेबांचे डोके(दरवेळेप्रमाणे याही वेळेस) चालेनासे झाले. परिस्थितीची पाहणी करून तोडगा काढायला साहेबांनी श्री. सहावे आयोग यांना आटपाट नगरात पाठवले. आयोग यांचे पूर्ण कुटुंबच शासन साहेबांच्या खास मर्जीतले होते, किंवा साहेबांना पडलेले प्रश्न मुळातून न सोडवता अधिक घोळ घालून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे कुटंब शासन दरबारी प्रसिद्ध होतं.
मोठा गाजावाजा करून आयोगजी नगरात आले. आल्या आल्या गांवभर फलक झळकवले,

"आयोग साहेबांचे जादूचे प्रयोग--खडखडाटी तिजोरीतील दगडांपासून वेतनवाढीची खिचडी.
-- उद्या दिनांक **-**-** रोजी अमूकतमूक मैदानात सर्वांदेखत आयोग साहेब वरील प्रयोग सादर करणार आहेत तरी सर्व नागरिकांनी आपापली जेवणाची ताटे घेऊन ठीक सहा वाजता मैदानात उपस्थित राहावे."


या नगरात रोज हातावर पोट घेऊन जगणारे काही अतिगरीब लोक निरक्षर असल्याने त्यांनी हा फलक वाचलाच नाही. कॉर्पोरेट सेक्टर, बडे छोटे व्यापारी यांनी याकडे करमणुकीचा कार्यक्रम समजून दुर्लक्ष केले, त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये असल्या फालतू टाईमपासला वेळ नव्हता.
पण झाडून सारे पांढरपेशे बाबू या कार्यक्रमाला आपापली ताटे घेऊन उपस्थित राहिले. बरोबर सहा वाजता मोठाल्या लॉरीवर "खडखडाटी" नांवाची शासन साहेबांची ती सुप्रसिद्ध तिजोरी घेऊन आयोग साहेबांचे आगमन झाले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
प्रसिद्ध जादूगाराच्या आविर्भावात आयोग साहेबांनी तिजोरीचे दार उघडून आतमध्ये फक्त पाच सहा दगडच कसे आहेत हे जनतेला दाखवले. परत एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला.
मैदानाच्या मधोमध एक मोठे चुलाणे रसरसत होते आणि त्याच्याखाली इंधन म्हणून पाचव्या वेतनआयोगाच्या चोपड्या , परदेशी कर्जाच्या खतावणी इ. जाळले जात होते. या चुलाण्यावर 'गंगाजळी' नामक मोठे पातेले ठेवण्यात आले. हो, आटपाट नगरात तिजोरीप्रमाणे पातेल्यांनाही गंगाजळी, अमुक निधी , तमुक पॅकेज अशी नांवे असत. तिजोरीतले दगड या पातेल्यात टाकून वर जनतेच्या अपेक्षांवरून फिरवलेले मंतरलेले पाणी ओतून आयोग साहेबांनी मोठा जाळ करून दिला. आत्तापर्यंत प्रयोगाची कीर्ती ऐकून आटपाट नगराचे झाडून सारे मंत्रीगण व्ही. आय. पी. कक्षात ही अद्भुत खिचडी पाहायला जमले होते.
आयोगरावांनी खिचडीची महती गायला सुरुवात केली. मग म्हणाले "लोकहो, थोडे तेल असेल तर काय मजा येईल, दगड चांगले परतता येतील."
लगेच अर्थमंत्र्यांनी 'तेल' नांवाचा कर लोकांना लावून तिथल्या तिथे पुरेसे तेल जमा करून आयोगरावांना दिले.
मग आयोगराव म्हणाले,"वा! आता दगड चांगले परततो. अरेच्च्या! पण मोहरी आणि जिरे असेल तर काय मजा!"
लगेच गृहमंत्री पुढे झाले आणि पोलीस दलाकडे आधीच कमी असलेली जिरेमोहरी काढून त्यातली काही आयोगरावांच्या खिचडीला दिली. कोणीतरी वित्तआयोगवाला ''अरे , तुम्ही अंतर्गत सुरक्षेच्या वाट्याची मोहरी यांना दिलीत " असं म्हणत होता, पण कुणाचेच तिकडे लक्ष गेले नाही.आयोगराव मात्र म्हणाले,"अहो, फोडणी वाचून का खिचडी बनलीये कधी?"
"तेही बरोबरच," असे म्हणून मोहरी जिरे, आलं वगैरे सामान गृहमंत्र्यांकडून मिळाले.
मग आयोगराव म्हणाले"छे हे सगळं ठीक. पण मुगाची डाळच नसेल तर कसली आलीये खिचडी!" मग आरोग्यमंत्र्यांनी ''सर्वांसाठी आरोग्य'' योजनेतून चांगली भरपूरशी डाळ दिली आणि ती कमी पडली म्हणून संरक्षणमंत्र्यांनी आपल्याकडची (म्हणजे स्वतःच्या घरातली नव्हे हो,) डाळ सुद्धा दिली. आता डाळ परतल्याचा खमंग वास सुटला आणि समस्त पांढरपेशांच्या तोंडाला पाणी सुटले. मग त्यांनीच खिशात हात घालून 'इनकमटॅक्स' नावाचा थोडा मसाला दिला..
चतुर आयोगराव म्हणाले,"वा वा! आता तर दगड छान परतून झाले. थोडे पाणी घालून शिजवले की मस्त खिचडी तयार. पण.. भरीला मूठभर तांदूळ घातले तर काय बहार येईल!"
प्रधानमंत्र्यांना ते पटले. लागलीच जागतिक बँकेला फोन करून या अभिनव खिचडी योजनेला साहाय्य म्हणून मोठ्या प्रमाणात कर्जाऊ तांदूळ घेऊन पुरवण्यात आला. सुंदरशी चमचमीत खिचडी काही तासांत तयार झाली.
आता ताटे घेऊन आलेल्या पांढरपेशांची चुळबूळ वाढू लागली. सगळेच खिचडी चापायला धावू लागले. पण मग श्रेणीवार खिचडीचे वाटप होणार असे सांगून निम्म्यापेक्षा जास्त लोकांना घरी पाठवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी यायला सांगण्यात आले.
ज्यांना आज खिचडी मिळाली ते खूश, ज्यांना उद्या मिळणार ते ही खूश कारण उशीरा खिचडी दिल्याबद्दल त्यांना खिचडीचे अरीअर्स मिळणार होते.
रात्री गुपचूप पातेल्यातले दगड काढून धुऊन खडखडाटी तिजोरीत बंद करून तिजोरी जागेवर ठेवताना शासन साहेब आणि आयोग साहेब दोघेही गालातल्या गालात हसत होते. पांढरपेशे घरी जाऊन परत एकदा भेंडीची भाजी खाऊन सुखस्वप्ने बघत झोपी गेले होते.
काही असंतुष्ट सो कॉल्ड बुद्धीवादी मात्र उगाच मैदानाबाहेर फसवणुकीच्या बोंबा ठोकत बसले होते.

1 टिप्पणी:

Gayatri ने कहा…

:) jhakaas!