गुरुवार, मई 25, 2006

आंब्या आणि कालवी

सोम, ०१/०५/२००६ - ११:५४.
आंब्या आणि कालवी.
माझा लहान भाऊ आंब्या(अमेय-अमू, अम्या इ.) म्हणजे पक्का कोंकणी. दोन दिवस माशांविना गेले की त्याच्या गळ्याखाली घास उतरत नाही. मागे एकदा तो मुंबईत आम्हांला भेटायला आला होता तेंव्हा त्याला घेऊन दादरच्या एका सुप्रसिद्ध मत्स्याहारी हाटिलात आम्ही जेवायला गेलो. मेन्यूकार्ड बघून मी म्हणाले,"बघ आंब्या , तुझी आवडती कालवी चक्क हॉटेलमध्येही मिळायला लागली." "
"बघू, बघू. अरे बापरे, चक्क कालवी मसाला आणि कालवी फ्राय! पण तायडे, आपण जशी कालवी पूर्वी खायचो आणि मी अजूनही गावी खातो, त्याची सर कशालाच येणार नाही."
त्यानंतर जेवण संपेपर्यंत आम्ही लहानपणीच्या आठवणीत रंगून गेलो.
आमचं कोंकणातलं गाव म्हणजे एकदम चित्रासारखं ! तीन बाजूंनी डोंगर आणि पश्चिमेला खाडी. आमचं घर खाडीपासून थोडं लांब आणि डोंगराच्या कुशीत. आजूबाजूला गर्द आमराई,तिला डाग(बाग) असं म्हणतात. आम्हा तिघा भावंडांना रत्नागिरीच्या शाळेत घातलं असल्याने येण्याजाण्यातच इतका वेळ जायचा की आजूबाजूच्या मुलांशी खेळायला कधी वेळच मिळायचा नाही. पण एकदा का उन्हाळी सुट्टी पडली की सर्व पांढरपेशी आवरणे गळून पडून आम्ही त्या मुलांतीलच एक होऊन खेळत असू. त्यातलीच एक आवडती गोष्ट कालवी खाणे.
तसा कालवीचा मोसम खूप आधीच सुरू व्हायचा. पण त्याला रंगत चढायची मुलांच्या शाळांना सुट्टी पडल्यावर. एका सुमुहुर्तावर( समुद्राची ओहोटीची वेळ बघून)
" काकींनू, कालवीस येताव काय", "रं बावा, कालवीस चल" अशा हाका देत वाडीतल्या पाच सहा बायका, त्यांचे नवरे, त्यांची पोरं छोटे-मोठे हारे (बांबूच्या विणलेल्या टोपल्या) घेऊन खाडीच्या दिशेने निघायचे. मग आम्ही तिघंही घरच्यांची नजर चुकवून त्यांच्याबरोबर. ओहोटीमुळे खाडी सुकून नुसता गाळ दिसत असायचा. आता सुरू व्हायची शोधमोहिम. तशी शोधायची काही गरज नसे म्हणा, पूर्ण किनाऱ्यावर शिंपले, कालवीचे मोठे-मोठे दगड पडलेले असायचे. कुर्ल्या(खेकडे) बिनधास्त इकडेतिकडे पळत असायच्या. बायका शिंपले गोळा करायच्या. कुर्ल्या पडायला मात्र सराईत पुरुषमंडळीच लागायची, नाहीतर कुर्ली पकडणाऱ्याचाच हात डेंग्यात पकडून फोडणार. आम्हा मुलांना मात्र इंटरेस्ट असायचा कालवीत.
कालवी म्हणजे शिंपल्या, शंख यांतीलच एक उपप्रकार(phyllum-mollusca, class-bivalvia) एका दगडाला सगळ्या बाजूंनी अगणित डोळे फुटले तर कसं दिसेल ते साधारण डोळ्यांसमोर आणा. तर असा हा काळपट दगड, साधारण पाव किलोंचा(मोठेच्या मोठे चार-पाच किलोंचे पण असतात.) याचा प्रत्येक डोळा म्हणजे एक शिंपला. प्रत्येक शिंपल्याची खालची कपची दगडाला घट्ट पकडून तर वरची कपची उघड्बंद होऊ शकते. या दोन कपच्यांमध्ये एक नाजूकसा प्राणी.तर असे हे दगड गोळा करून हाऱ्यात ठेवायचे . हे करताना खूप काळजी घ्यावी लागे. जरा जरी बेसावध राहिलं तर आपला पाय त्या खाडीच्या गाळात रुतायचा, नाहीतर कालव्याच्या कपचीवर पडून फाटायचा. तर हा कालवी गोळा करण्याचा कार्यक्रम चालायचा चार वाजेपर्यंत. मग भरलेले हारे डोक्यावर घेऊन यायचं अन्याकाकांच्या मळ्यात. या नारळी पोफळीच्या बागेत गावातला एकमेव पंप होता ज्याला उन्हाळ्यातही पाणी असायचे. पंपाच्या पाण्याच्या झोतात कालवी ठेवली की एकदम 'सोच्छ' होऊन जायची. ही कालवी घेऊन पुढची खरी गंमत-कालवी पार्टी सुरू व्हायची.
आमच्या शेजारच्या सनगरे काकूंची मुलं आमच्याएवढी असल्याने आमची पार्टी त्यांच्याबरोबरच. अंगणाजवळ एखादी सपाट जागा साफसूफ करून आणलेली कालवी एका थरात तिथे गोलगोल पसरायची. डागेतला आंब्याफणसाचा पातेरा(पडलेली पाने) आणून कालवीवर टाकून त्याचा ढीग करायचा. हा ढीग करायला जरा कौशल्य लागते कारण कसा आणि किती ढीग रचलाय त्यावर कालवी कशी भाजणार हे अवलंबून असते. ढीग पेटवून दिला की अगदी शेकोटीसमोर चालतात तशा गमतीजमती चालायच्या. पूर्ण ढीग पेटून गेला की काडीने सगळी कालवी उलटी करायची, परत पातेऱ्याचा ढीग, परत पेटवून द्यायचा. मग कशानेतरी झटकून सगळी राख उडवायची गरम-गरम कालवी परत हाऱ्यात भरून अंगणात घेऊन यायची.
यानंतर कालवी फोडण्यासाठी एखादी मोठी पाथर, हातोडा, लोखंडी फुंकणी असं मिळेल ते गोळा करून बसायचं एकेक कालवं उचलून एकेका डोळ्याच्या दोन कपच्या जिथे मिळतात तिथे घाव घालायचा. कालवीची वरची कपची निघते आणि आत असतं खरपूस भाजलेलं मांस(माष्टं/माष्टू)! आमच्या आंब्याच्या मते याची चव ना कोळंबीला(चिंगळे), ना शिंपल्यांना(मुळे)! हे माष्टु नुसतंच गट्टं करायचं नाहीतर तांदळाच्या भाकरीच्या तुकड्यावर ठेवून. या पाककृतीत ना मीठ घालायची गरज( कालवीत ते असतंच) ना मसाला. मध्ये मध्ये जरा कमी भाजलेलं माष्टू मिळालं की ते वेगाळ्या भांड्यात काढून ठेवायचं, काकू त्याचं 'कालव्याचं सुकं' करायच्या. बरोबर आणलेल्या मुळ्यांचं(शिंपल्यांचं) एकशिपी साळणं(आमटी)घरात रटरटत असायचं.
मग काय ठक ठक आवाज येत राहायचे. हाराभर कालवी संपत यायची. मी आणि सोनू(बहीण) आंब्याला म्हणायचो ' चल आता पुरे झालं" पण तो कसला ऐकायला. आम्ही दोघीच घरी परतायचो. संध्याकाळी उशीरा आई आणि आजीच्या लक्षात यायचं की आपला आंब्या घरी आलेला नाही. त्या बरोबर शोधत सनगरेंच्या घरी जायच्या , आई मारत मारत आणि आजी शिव्या घालत अशी बंधुराजांची पालखी घरात यायची.
रात्री बाबा आल्यावर त्यांच्यासमोर सगळी उजळणी परत. बाबाही अमूला रागावायचे. आणि मग आईला म्हणायचे,"अगं ए, माझ्या जरा पोटात कसंसंच होतंय, जास्त जेवायला नकोय." नऊला तर जास्तच पोट जड झालंय असं म्हणून बाबा पोट हलकं करायला जरा शतपावली करायला बाहेर जायचे.
दुसऱ्या दिवशी आम्ही खेळायला गेलो की सनगरे काकू घवाळी काकूंना सांगत असायच्या "काल सांजच्याला बिचाऱ्या आंब्याची आयस ना आजी पोराला मारीत घेवन गेली जे कालवावरनी. नी राती त्याचा बापूस येवन मुल्याचं एकशिपी ना कालव्याचं सुकं वरापून गेला ता समाजला तर आजयेला!"
बाबांच्या पोटदुखीचं कारण, आणि शतपावलीची जागा कळून आम्ही हसत सुटायचो.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें