मंगलवार, जनवरी 16, 2007

माझ्या कविता!

या माझ्या कविता यापूर्वी "मनोगत" या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या आहेत.
तिथल्याच इथे उचलून छापत आहे. यातल्या काही कवितांत "साती/ साती काळे" असं नाव आलंय ना ते माझं मनोगतावरचं नाव!" राजा" अर्थातच "योगेश!"

१.पहिले ब्लुकर

साती (राग-वैताग)--

आम्ही मरावे उगा नेहमी; या ब्लॉगावर त्या ब्लॉगावर
कोण ती कुठली ज्युली पॉवेल;घेउन गेली पहिले ब्लुकर!

राजा(स्थितप्रज्ञ)-

पाककलेशी लढली ती गे ; पहा एकटी पूर्ण वर्षभर
लिहीले अनुभव मग 'नेटाने' ; मार्ग प्रिये तो नाही सुकर !!

साती (राग-आवेश)-

मी ही मग रे लिहीन रेसिप्या ; पेज पेज खरडुनिया भरभर
काम एकचि करिन वर्षभर ; बाकी कामा ठेऊ नोकर !!

राजा (अजूनही स्थितप्रज्ञच)-

लाखो कॉप्या तिने खपविल्या ; तुला तिथे गे बसेल ठोकर
कुणी पढावे तुझे रकाने ; आणि द्यायचे पैसेही वर !!

साती (राग-धुसफुस)-

पूरे तुझी ही कुजट बोलणी ; आणि त्यावरी तिखटी फुंकर
कसे मिळावे सांग मला मग ; ब्लुकर किंवा किमान म्लुकर!!

राजा ( सारवासारवी)-

सोड प्रिये गं हट्ट असा तो ; काय खायचे आहे म्लुकर
वेळ होई बघ ही डिनराची ; भाजी टाकतो लाव तू कुकर !!

*************************************

रेसिप्या- माझे मनोगतावरिल सुलेखन
म्लुकर-ब्लुकर सारखे मराठी जालावरिल पारितोषिक



२.फॅशन शो

कोण म्हणते बासने ढळलीच नाही
कोण म्हणते वासना चळलीच नाही !!

रँपवर बेभान त्या हो चालताना
पाउले का वाकडी वळलीच नाही? !१!

"पाप नाही चूक शिंप्याची असे" जर
लाज का वेडी तिथे गळलीच नाही? !२!

ऊर बडवोनि म्हणे "अपघात" तो रे
आमुची 'काळी' मने मळलीच नाही" !३!

"दूर" होती योजने लाखो जरी
रातिची ती "दर्शने" खळलीच नाही !४!

जाउदे दे सोडुनी 'साती' तुला
वाहिन्यांची नाटके कळलीच नाही !५!



३.मराठीने केला कानडी भ्रतार

आज नाही राहिली रंगत मराठी
साथीला कोणी नसे संगत मराठी !!

भोवती खडखाडती कित्येक डब्बे
आठवे मऊशार ती ढंगत मराठी !!

ताट भरुनी खावया इडल्या नि डोसे
आवडे चवदार ती पंगत मराठी !!

गाव जरी रे साजरा अन गोड घरटे
जीव हा नाही इथे दंगत मराठी !!

आणले तू कानडया देशात 'राजा'
चालली 'साती' तुझी खंगत "मराठी" !!



४.जादू

आता कोठे अडले घोडे ! त्यांना पडले मोठे कोडे !!
भली थोरली ही रथयात्रा ! ब्याण्णवापरि जादू ना घडे !!

तेव्हा केला देश पालथा ! रामाला घालून साकडे !
काय फायदा कोणा झाला ! करुनि एवढे वाद-बखेडे !!

नाही मिळाले रामाला घर ! जळले हरेक शहर नि खेडे !
तुम्हा मिळाले मोठे पद अन ! त्याचे वाढले सुरक्षाकडे !!

जाणुनिया तुमचे हे वर्तन ! आम्ही आमचे घेतले धडे !
जादू आज हो सरली तुमची ! आम्ही ना ऊरलो पहिले वेडे !!


५.झुकझुक!

सध्या सरदार सरोवरानिमित्त जोरदार हाणामारी चालु आहे. भूमिपुत्रांना अमिषे दाखवून, धाकटधपशा दाखवून प्रकल्पामुळे विस्थापित करायचे आणि नंतर प्रकल्पाचा फायदा दुसऱ्यांनीच घेऊन भूमिपुत्राच्या तोंडाला पाने पुसायची हे नेहमिचेच.असाच एक प्रकल्प कोंकणरेल्वे!

(चाल - रेलगाडी रेलग़ाडी !)

कोंकणरेल्वे कोंकणरेल्वे
झुकझुक झुकझुक
येता जाता करी कोंकणा
टुकटुक टुकटुक !!

रेल्वेला जागा , कवडीचा भाव
फुकुन टाकला, गावच्या गाव
तरी कोंकणी मिटली नाही
भूकभूक भूकभूक !!

गाडीला स्टेशन, स्टेशनात स्टॉल
विकायला भैया, चायनाचा माल
युपी बिहारी भैयाना हो
सुखसुख सुखसुख !!

गोव्याची ट्रीप, साऊथची ग्रीप
उगा कोंकणी करतो क्रीप
थोडेसे तरी माझ्या गावा
रुकरुक रुकरुक !!
---- पक्की कोंकणी साती

६. केळकर!

सध्या एक नवं मराठी गाणं आवडतं- "थेंबभर"
थेंबभर तुझे मन ओघळले माझ्यापुढे
माझ्यापाशी मागतसे एक पावसाची सर-- थेंबभर.
त्या कवितेचं हे विडंबन.


केळकर आळीतला थांबुनिया माझ्यापाशी
माझ्यापुढे बसतसे, जोडुनिया दोन्ही कर -- केळकर !!

म्हणे साती वेड लावी तुझे नाक ,तुझे केस
सखे तुझे डोळे कसे ,छान पाणीदार अन -- खेळकर !!

कशी येशी ,कशी जाशी , जीवाला पिसे लावशी
आणि कशी हसशी तू, दिसताच माझं घर -- खोडकर !!

आता किती दिस गडे, काळ्यांच्या घरी रहाशी
होऊनिया जा तू कशी, एकदाची भरकन -- केळकर !!

दिसताच माझे बाबा धूम ठोकून पळाला
पुन्हा कधी दिसला ना नाक्यावर, रस्त्यावर -- केळकर!!

( स्वानुभवाचे बोल असल्याने एका विशिष्ट ऊपनामाला दुखवायचा हेतू नाही हे कृपया लक्षात घ्या.)
--साती काळे



७.एखादी आळशी संध्याकाळ !

एखादी आळशी संध्याकाळ मिळू दे
मग अगदी महिनाभर कामाखाली जळू दे!!

क्लिनिकला अर्धा वेळ मारूया बुट्टी
ऍडमिट पेशंटाना देऊया सुट्टी
एकतरी सांजवेळ घरामध्ये ढळू दे !!१!!

सासूबाई-सासऱ्यांनी गावाला जावं
जाताना सोबत बाळाला न्यावं
लाल-लाल मातीत पाय त्याचे मळू दे !!२!!

रात्रीच्या स्वयंपाका देऊया चाट
तुझ्या हातच्या खिचडीचा मस्तपैकी घाट
ओट्याच्या पुढे-मागे तुला मग पळू दे !!३!!

बंद ठेवू टीव्ही आणि बंद ठेवू फोन
घराबाहेर पाटी लावू "रेस्ट्रिक्टेड झोन"
बोलायचं मला जे तुला सारं कळू दे !!३!!


बोलाची कढी आणि बोलाचा भात
मनातले मांडे खाते मनात
कामाची वेळ झाली मला आता पळू दे!!
(पण एकदातरी) एखादी आळशी संध्याकाळ मिळू दे


८.वाट

काव्यकण येथे तिथे जे ढापले
आणुनी नेटावरी ते थापले !१!

काढली खोडी कुणाची मी जरा
जाणत्यांनी का मला हो झापले !२!

मागची केली जरा उचलेगिरी
चालकांनी का बरे ते कापले !३!

फासले कोणी म्हणे 'काळे' मुखा
सांग त्याना ते श्रमाने रापले ! ४!

जाउदे 'साती' तुझी ही वाट नाही
जा लिही जा गद्य तू ते आपले !५!


९.सारे तुझेच होते
संदर्भ--
सारे तुझेच होते

एका मॉलमधून बाहेर पडताना ऐकलेले --

माझे म्हणू कशाला सारे तुझेच होते
आभूषणे तुझी अन कपडे तुझेच होते !!१!!

जे वाहतो तयाला ओझे कसे म्हणू मी
ट्रॉलीवरी नकोसे भारे तुझेच होते !!२!!

तू सांगतेस आता होतो असे उकाडा
जाऊ खरेदीला हे म्हणणे तुझेच होते !!३!!

भूक लागता तुला ती ,मी घाबरून जाई
खाण्यास मॉलमध्ये कट्टे बरेच होते !!४!!

का धापतो मी आता का श्वासही फुले हा
पैसे बिलाचे देण्या खोरे हवेच होते !!५!!


१०. फरक

माझे ते बोलगाणे , तयाची ती कविता
मी ओळी रचते , तो काव्य प्रसविता !!

वाटते मला जे , तया गमते भासते
भेटते मला जे , तया ते गवसते
हरवून टाकते मी , तयाने गमविता
मी ओळी रचते , तो काव्य प्रसविता !!१!!

पाहते हळूच मी , त्याचा तिरपा कटाक्ष
लाख दिवे लावते , तो दीप लक्ष लक्ष
मी आनंदून जाते , तो हर्षाने हरखता
मी ओळी रचते , तो काव्य प्रसविता !!२!!

काळोख इथे पडला , तेथे तम दाटले
पाऊस इथे पडला , तेथे नभ उतरले
मी होऊन गेले वेडी , तयाचे भान हरपता
मी ओळी रचते , तो काव्य प्रसविता !!३!!



११. आला पाऊस मुंबापुरी

आला पाऊस पाऊस जीव होई वरखाली
आठवते सारे काहीझाले जे जे गतसाली !!१!!

आला पाऊस पाऊस खड्डे अजूनी उघडे
पालिका नी खोदकामे असे कसे हे त्रांगडे !!२!!

आला पाऊस पाऊस भरे उरात धडकी
जरी हासला 'विलास''मिठी' तशीच रडकी !!३!!

आला पाऊस पाऊस आठवल्या बंद गाड्या
घेऊ का मी एकदोन छान लाकडाच्या होड्या !!४!!

आला पाऊस पाऊस आले ढग ते आभाळी
केला देवाला नवस मुंबापूरी रे सांभाळी !!५!!


१२.गाफील

येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने एका लातूरकरांचे चिंतन!!

राहू नयेच गाफील तो रिंगणात आहे
गोऱ्या महासूनेच्या तो वर्तुळात आहे !!१!!

का ज्ञात ना कुणाला याची तऱ्हा निराळी
दांडा कुऱ्हाडिचा हा गोतास काळ आहे !!२!!

मी खूश हो तिनाला हा चार सांगतो रे
नारायणामुळे या जीवास घोर आहे !!३!!

जिंकून चार सीटा खुर्चीस बळकवावे
हा अश्वमेध याच्या पुन्हा मनात आहे !!४!!

हासू नयेच कोणी या ठेंगण्या ठगाला
उंची अलीकडे त्या दिल्लीत फार आहे !!५!!

ठेवून प्रश्न मागे जावे 'विलास' कोठे
एका नव्या लढ्याची काळी प्रभात आहे !!६!!

लातूरकर खूपच चिंतेत असल्याने त्यांनी ऱ्हस्वदीर्घाचा आणि वृत्ताचा फारसा विचार केला नाही. मी पण त्यांच्या भावना मनोगतींपुढे पोहोचवणे महत्त्वाचे मानल्याने त्यांनी दिलेल्या खर्ड्यात बदल केला नाही. :) :)


१३.डाव

आज हा न्याराच यांचा डाव आहे
चोरताना दान देतो भाव आहे !!

तू कशा यांच्यापुढे लाचार होशी
जाण रे यांचे लुटारू नाव आहे !!

धावताना का तुला ठावे नसे हे
रे तुला स्पर्धेत कोठे वाव आहे !!

पाय घाला पाडण्या जाई पुढे जो
ज्यास त्याला जिंकण्याची हाव आहे !!

भांडलाशी जोडण्याला नाळ जेथे
ती मुळाशी तोडणारा घाव आहे !!


१४.भारनियमन

प्रेरणा--
मेघ नसता आणि टग्या.

रात्र असता वीज नसता दीप उजळू लागले
जाहले इतुकेच होते भारनियमन जाहले!!

वायरींवर टाकलेले चोरटे ते आकडे
वीजचोरांना तुम्ही रे आधी का नच पाहिले !!

एवढा भलताच आहे नियमनाचा काळही
रोजचा स्वयंपाक करणे भार वाटू लागले!!

लाख उपकरणे घराशी मन तरीही हळहळे
काल जे जे घेतले ते आज पडूनी राहिले!!

गोजिऱ्या सासूसुनांच्या साजिऱ्या त्या मालिका
पाहणे मी थांबले अन "हे" हसाया लागले!!

भर पहाटे फॅनची मी दृष्ट काढून टाकली
थांबला जागीच तो मी गरगराया लागले!!


१५. माझी देवप्रिया

"चांदणे शिंपीत जाशी" या चर्चेवरून आठवण झाली देवप्रियेची!
अशीच एक प्रिया!


वाकडे बोलीत जाशी भांडताना सुंदरी
का तुला माहीत नाही प्रेम माझे नंबरी !!१!!

कापतो हा जीव माझा ऐकुनि मुक्ताफळे
भासली वाणी कडाडे दामिनी या अंबरी !!२!!

एकदा केल्या चुकीला का छळावे लाखदा
गोड तू बोलून दावी पुष्प जैसे उंबरी !!३!!

गे प्रिये आता अशी का पाहशी माझ्याकडे
भासती डोळे तुझे ते तप्त रस्ते डांबरी !!४!!

नाचतो तालावरी बोलावरी मी डोलतो
सांग तू ही का करावी आज शिक्षा झोंबरी !!५!!



१६. बाई माझी लिपस्टीक बिघडली

आजकाल सगळे प्रसिद्ध(!) लोक त्यांचे गाऱ्हाणे मनोगतावर घालण्यासाठी माझ्याच का मागे लागतात कोण जाणे? आता लातूरकरांना मी ओळखते तरी पण ही कोण कुठली राखी सावंत,हिचा एकही नाच मी पाहिलेला नाही. मागे राखी सावंतवर कोल्हापूरात खटला वाचलं होतं , तेवढीच ओळख! तर ही बाई तिच्या तथाकथित विनयभंगाबद्दल मराठी जनांकडून दाद मागायला चक्क माझ्याकडे आली. म्हणते कशी--

बाई माझी लिपस्टीक बिघडली
(चाल- बाई माझी करंगळी मोडली)

ऐन रातीला पार्टीमध्ये खोडी कशी काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!धृ!!
वाढदिवशी मी विश करताना
काय चावले कुठे मिकीला
गुपचूप येऊन पाठीमागून
माझी कळ का काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!१!!

पाठमोकळा ड्रेस घातला
मुका मिकीचा गाली घेतला (लिपलॉक करायचं काही कारण होतं का?)
मी ही चिडले , ठाण्यात पोचले
तक्रार ठोकली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!२!!

जरी स्वतःचा ड्रेस फेडला
मी ही शेवटी भारती बाला
ओठ द्यायचे का कोणाला
जरी लाज सोडली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!३!!

--- राखी सावंत
(भारवाही - साती काळे)



१७.उलटसुलट
उलटसुलट केले काळजाला जरासे
परत उचकले मी ड्रॉवराला ज़रासे

हसत बचत पेटी काढते आज खोडी
सतत गमवते ती साठलेले ज़रासे

चलबिचल कशाला होतसे मागण्याची
पसरि करहि मित्रांसमोरी मी ज़रासे

"सहज़ बघ विसरलो, पाकिटाला कसा मी"
(हळुच फ़सवती ते मित्र माझे जरासे)

विसर पडत नाही संपणाऱ्या खिशाचा
फ़िरुन छळत जातो सासऱ्याला ज़रासे

(चक्रपाणिच्या ओळखीने मालिनीशी पहिल्यांदाच हात मिळवलाय.त्यामुळे शब्दांच्या मोडतोडीबद्दल "जाणते" क्षमा करतील ही अपेक्षा!)



१८. फकीर

नुकतीच वैभव जोशी यांची गझल वाचून वांद्र्यात फिरत होते. ठिकठिकाणच्या नगरपालिकांचे 'निकाल' लागत असतानाच हे कुठूनसे कानी आले.

मतांत होता निकाल लागावयास थोडा उशीर झाला
जसा जसा लागला तसा प्रांत प्रांत माझा फकीर झाला

जरी नेसली कषाय वस्त्रे उणा कुठे मोहपाश आहे
मुलास गादी हवी म्हणोनी कधीच राजा अधीर झाला

असे कसे जाणले न शक्ती सुखासुखीही गळून जाते
कशा तुझे नाव घेतले वाघ वाघ हा बेफिकीर झाला

पदोपदी भास होत आहे , अजून माझाच राज
असे तया त्यागले म्हणोनिच कार्यकारी बधीर झाला

मला न पर्याय राहिला ! सैनिकास केले मुला हवाली
तया न पर्याय राहिला ! राष्ट्रवादी वा मानसेन झाला

मानसेन- म. न. से. वाला



१९. प्रयत्नपूर्वक शिकले होते !

प्रयत्नपूर्वक शिवले होते वर आधारित
(जित्याची विडंबनाची खोड.... जाता जात नाही)


कठिण पेपर सोडवताना--

प्रयत्नपूर्वक शिकले होते
पुन्हा विसरले.
डोके फुटले तरी उत्तरा
नाही स्मरले.

जाणिवपूर्वक जपली होती
कॉपी आतली.
परीक्षकाने मागुन पण ती
हाक मारली.

मी ना तसली किती सांगण्या
प्रयत्न केला.
ओली हळवी नजर पाहुनि
तोही फसला.



२०. नवीन साडी!

तसे म्हणाया नवीन , अगदी नवीन होत्या बऱ्याच साड्या
परंतू काही न बोलतो मी तू आणिली जर नवीन साडी

उगाच शोधायला तिला तू किती दुकाने फिरून आली
महाग होत्या जुन्या जश्या त्या, महाग होती नवीन साडी

हजारदा त्या बिलोरी मॉलापुढे बसूनी रडून घेतो
तुझ्या कशाला मनात भरली ती टांगलेली नवीन साडी

अजूनही हे कपाट बघूनी पुन्हा पुन्हा बुचकळ्यांत पडतो
पहा कधीही, तुडुंब गर्दी तरी कशाला नवीन साडी

टिव्हीवरी तुलसी नी पार्वती नटूनी अश्रू कशा ढाळती
हरेक भागासवे दिसावी तुला तयांची नवीन साडी

अता न हातांमधील पैशांवरी राहिला मुळी भरोसा
जुनाच सदरा मी घालतो मग तू घेतली जर नवीन साडी



२१.कवळी कवेत

एका आजोबांचं मनोगत ऐकताना मला मनोगतावरील एका कवितेतील कवळी कवेत या ओळी आठवल्या. सत्तरीतही जीवन समरसून जगणारे हे आजोबा आपल्या काही प्रॉब्लेम्सविषयी, नव्या दूरदर्शनविषयी , नव्या गायकांविषयी काय म्हणतात बघा--

हा गोड लाडवांचा सुटला सुवास सारा
कवळी कवेत आहे मी शोधतो बिचारा ॥

दाही दिशा प्रसन्न घर गोड गोड झाले
तोंडास सोडूनिया पण दात हाय गेले ॥

नाकात आपुल्याच घेतो हिमेश तान
माझे नशीब माझे बहिरे आधीच कान ॥

स्वर्गीय दृश्य सारे दूरदर्शनी नजारे
मी मात्र हळहळावे मज मोतीबिंदू का रे ॥

गात्रे शिणून गेली मन हिरवंगार आहे
मी एक सत्तरीचा तगडा जवान आहे ॥



२२. जरासे

ढगांआडल्या लाघवी चंद्रमाने
लपावे जरासे जरासे दिसावे ॥

मनीमानसी या तुझे रूप राणी
रुतावे जरासे जरासे ठसावे ॥

थरारून जावे असा स्पर्श होता
रुसावे जरासे जरासे हसावे ॥

चढे रात जैशी तसे भान दोघां
असावे जरासे जरासे नसावे ॥

सखे लाजुनी आठवावे पहाटे
उसासे जरासे जरासे विसावे॥

5 टिप्‍पणियां:

  1. साती,

    माझ्या अनुदिनीवर तुझा संदेश मिळाला. मी exmanogati नावाचा याहू गट निर्माण केलाय. त्यात सामील हो. मनोगताला लोकशाही पर्याय म्हणून नवीन संकेतस्थळ तयार करणे हे आपले सर्वांचे काम आहे. त्यात सर्वांचाच सहभाग अपेक्षित आहे. उगाच वाट पाहू नकोस.

    - मिलिंद

    जवाब देंहटाएं
  2. साती !!

    राज जैन यांनी चालू केलेले संकेतस्थळ आजकाल वाचनाकरिता पैसे मागते. ही साईट चालवण्यामागे मलातरी शुद्ध व्यापारी हेतू दिसतो. अगोदर येथे शुल्क लागेल असे जाहिर न करता साईट चालू करायची आणि सभासदांना वाचनाची सवय झाल्यावर पैसे मागायचे ही शुद्ध लबाडी आहे.

    हे कोणी तुम्हाला सांगितले ?

    मी तर स्वत:च बेशुध्द पडलो आहे )

    जवाब देंहटाएं
  3. रुद्रा !
    हे नाव देखील माझेच आहे,

    तुम्ही फक्त मला सांगा की तुम्हाला हे कोणी सांगितले अथवा तुम्ही कोठे वाचले की माझे शब्द वर तुम्हाला पैसे द्यावे लागतील ?

    राज जैन
    rajkiranjain@gmail.com

    जवाब देंहटाएं
  4. छान कविता आहेत.
    लंच टाईम मध्ये चांगला वेळ गेला.
    धन्यवाद.

    जवाब देंहटाएं