बुधवार, जुलाई 26, 2006

dagadanchi khichadi

आटपाट नगर होते, नगर कसले मोठासा देशच होता तो. प्रत्येक आटपाट नगरवाल्या गोष्टीत एकतरी गरीब ब्राह्मण असतो, इथे जातीपातीचे काही माहीत नाही ; पण बरेच गरीब स्वभावाचे पांढरपेशे मध्यमवर्गीय राहत होते. शक्यतो शासन या बड्या मालकाकडे ते नोकरी करायचे म्हणून इतर त्यांना 'बाबू' असे म्हणायचे. या लोकांना ओळखायची खूण म्हणजे त्यांनी काहीही खाल्लं तरी सर्व पदार्थांची चव 'वरणभात, भेंडीची भाजी' या काँबिनेशनपेक्षा वेगळी लागत नसे.
दर दहा वर्षांनी शासन साहेबांकडे या पांढरपेशांचे प्रतिनिधी जाऊन वेतनवाढ मागायचे, तसे ते या वेळीही गेले. शासन साहेबांचे डोके(दरवेळेप्रमाणे याही वेळेस) चालेनासे झाले. परिस्थितीची पाहणी करून तोडगा काढायला साहेबांनी श्री. सहावे आयोग यांना आटपाट नगरात पाठवले. आयोग यांचे पूर्ण कुटुंबच शासन साहेबांच्या खास मर्जीतले होते, किंवा साहेबांना पडलेले प्रश्न मुळातून न सोडवता अधिक घोळ घालून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे कुटंब शासन दरबारी प्रसिद्ध होतं.
मोठा गाजावाजा करून आयोगजी नगरात आले. आल्या आल्या गांवभर फलक झळकवले,

"आयोग साहेबांचे जादूचे प्रयोग--खडखडाटी तिजोरीतील दगडांपासून वेतनवाढीची खिचडी.
-- उद्या दिनांक **-**-** रोजी अमूकतमूक मैदानात सर्वांदेखत आयोग साहेब वरील प्रयोग सादर करणार आहेत तरी सर्व नागरिकांनी आपापली जेवणाची ताटे घेऊन ठीक सहा वाजता मैदानात उपस्थित राहावे."


या नगरात रोज हातावर पोट घेऊन जगणारे काही अतिगरीब लोक निरक्षर असल्याने त्यांनी हा फलक वाचलाच नाही. कॉर्पोरेट सेक्टर, बडे छोटे व्यापारी यांनी याकडे करमणुकीचा कार्यक्रम समजून दुर्लक्ष केले, त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये असल्या फालतू टाईमपासला वेळ नव्हता.
पण झाडून सारे पांढरपेशे बाबू या कार्यक्रमाला आपापली ताटे घेऊन उपस्थित राहिले. बरोबर सहा वाजता मोठाल्या लॉरीवर "खडखडाटी" नांवाची शासन साहेबांची ती सुप्रसिद्ध तिजोरी घेऊन आयोग साहेबांचे आगमन झाले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
प्रसिद्ध जादूगाराच्या आविर्भावात आयोग साहेबांनी तिजोरीचे दार उघडून आतमध्ये फक्त पाच सहा दगडच कसे आहेत हे जनतेला दाखवले. परत एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला.
मैदानाच्या मधोमध एक मोठे चुलाणे रसरसत होते आणि त्याच्याखाली इंधन म्हणून पाचव्या वेतनआयोगाच्या चोपड्या , परदेशी कर्जाच्या खतावणी इ. जाळले जात होते. या चुलाण्यावर 'गंगाजळी' नामक मोठे पातेले ठेवण्यात आले. हो, आटपाट नगरात तिजोरीप्रमाणे पातेल्यांनाही गंगाजळी, अमुक निधी , तमुक पॅकेज अशी नांवे असत. तिजोरीतले दगड या पातेल्यात टाकून वर जनतेच्या अपेक्षांवरून फिरवलेले मंतरलेले पाणी ओतून आयोग साहेबांनी मोठा जाळ करून दिला. आत्तापर्यंत प्रयोगाची कीर्ती ऐकून आटपाट नगराचे झाडून सारे मंत्रीगण व्ही. आय. पी. कक्षात ही अद्भुत खिचडी पाहायला जमले होते.
आयोगरावांनी खिचडीची महती गायला सुरुवात केली. मग म्हणाले "लोकहो, थोडे तेल असेल तर काय मजा येईल, दगड चांगले परतता येतील."
लगेच अर्थमंत्र्यांनी 'तेल' नांवाचा कर लोकांना लावून तिथल्या तिथे पुरेसे तेल जमा करून आयोगरावांना दिले.
मग आयोगराव म्हणाले,"वा! आता दगड चांगले परततो. अरेच्च्या! पण मोहरी आणि जिरे असेल तर काय मजा!"
लगेच गृहमंत्री पुढे झाले आणि पोलीस दलाकडे आधीच कमी असलेली जिरेमोहरी काढून त्यातली काही आयोगरावांच्या खिचडीला दिली. कोणीतरी वित्तआयोगवाला ''अरे , तुम्ही अंतर्गत सुरक्षेच्या वाट्याची मोहरी यांना दिलीत " असं म्हणत होता, पण कुणाचेच तिकडे लक्ष गेले नाही.आयोगराव मात्र म्हणाले,"अहो, फोडणी वाचून का खिचडी बनलीये कधी?"
"तेही बरोबरच," असे म्हणून मोहरी जिरे, आलं वगैरे सामान गृहमंत्र्यांकडून मिळाले.
मग आयोगराव म्हणाले"छे हे सगळं ठीक. पण मुगाची डाळच नसेल तर कसली आलीये खिचडी!" मग आरोग्यमंत्र्यांनी ''सर्वांसाठी आरोग्य'' योजनेतून चांगली भरपूरशी डाळ दिली आणि ती कमी पडली म्हणून संरक्षणमंत्र्यांनी आपल्याकडची (म्हणजे स्वतःच्या घरातली नव्हे हो,) डाळ सुद्धा दिली. आता डाळ परतल्याचा खमंग वास सुटला आणि समस्त पांढरपेशांच्या तोंडाला पाणी सुटले. मग त्यांनीच खिशात हात घालून 'इनकमटॅक्स' नावाचा थोडा मसाला दिला..
चतुर आयोगराव म्हणाले,"वा वा! आता तर दगड छान परतून झाले. थोडे पाणी घालून शिजवले की मस्त खिचडी तयार. पण.. भरीला मूठभर तांदूळ घातले तर काय बहार येईल!"
प्रधानमंत्र्यांना ते पटले. लागलीच जागतिक बँकेला फोन करून या अभिनव खिचडी योजनेला साहाय्य म्हणून मोठ्या प्रमाणात कर्जाऊ तांदूळ घेऊन पुरवण्यात आला. सुंदरशी चमचमीत खिचडी काही तासांत तयार झाली.
आता ताटे घेऊन आलेल्या पांढरपेशांची चुळबूळ वाढू लागली. सगळेच खिचडी चापायला धावू लागले. पण मग श्रेणीवार खिचडीचे वाटप होणार असे सांगून निम्म्यापेक्षा जास्त लोकांना घरी पाठवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी यायला सांगण्यात आले.
ज्यांना आज खिचडी मिळाली ते खूश, ज्यांना उद्या मिळणार ते ही खूश कारण उशीरा खिचडी दिल्याबद्दल त्यांना खिचडीचे अरीअर्स मिळणार होते.
रात्री गुपचूप पातेल्यातले दगड काढून धुऊन खडखडाटी तिजोरीत बंद करून तिजोरी जागेवर ठेवताना शासन साहेब आणि आयोग साहेब दोघेही गालातल्या गालात हसत होते. पांढरपेशे घरी जाऊन परत एकदा भेंडीची भाजी खाऊन सुखस्वप्ने बघत झोपी गेले होते.
काही असंतुष्ट सो कॉल्ड बुद्धीवादी मात्र उगाच मैदानाबाहेर फसवणुकीच्या बोंबा ठोकत बसले होते.

Birthday!

"राजा, परसों क्या दिन है याद है ना?""हो साती, परवा तुझा वाढदिवस आहे, मी कसा विसरेन?""तो , क्या गिफ्ट दे रहा है मुझे?""वही, हिरों की अंगुठी""शीः, हे कसलं गिफ्ट, मिनुला माहित्येय का तिच्या नवऱ्याने वाढदिवसाला सिंगापूरला नेलं होतं, मला पण तू सिंगापूरला घेऊन चल.""बाये, सिंगापूरला जायचं म्हणजे काही खायचं काम आहे का? दोन एक लाख रुपये लागतील दोघांनी जायचं म्हणजे! कुठून आणणार मी?""हे काय रे राजा , काहीतरी युक्ती कर ना!"
जगातल्या सगळ्या बायकांपेक्षा वेगळं असं माझं माझ्या नवऱ्याबद्दलचं मत आहे. जगात त्याच्यापेक्षा हुशार कुणीच नाही आणी माझ्यापेक्षा तर त्याला खूप जास्त कळतं हे माझं स्पष्ट मत आहे. कुठल्याही गोष्टीतून तो मार्ग काढू शकतो हे माहिती असल्यानेच हे दोन लाख उभे करायचं काम मी बिनधास्तपणे त्याच्यावर सोपवलं.
"एक तरकीब है, " पेपर बाजूला ठेवत राजा म्हणाला. " पण इट विल रिक्वायर युवर को-ऑपरेशन""सिंगापूर आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी" राजाने त्याचा प्लॅन मला ऐकवला. मी तो कोणतीही शंका न घेता (नेहमीप्रमाणे ) मान्यही केला."ओ. के. , सगळ्यात पहिलं आपल्याला तुझं नाव बदलायला लागेल""का, रे?""अगं, अशा धमाक्यासाठी नावही कसं हवं एकदम सूट होणारं, जसं की प्रिन्स, आता तुझं नाव प्रिन्सेस नको, पण 'राणी ' ठेवूया""वा,वा राजा, किती हुशार रे तू, हेडलाईनपण छान होईल 'राणीकी याद में राजा परेशान,' वा!"
झालं, दुसऱ्याच दिवशी मला घेऊन राजा हॉस्पिटलच्या मागे एका बागेत महापालिका एक बोअरवेल खणत होती तिकडे घेऊन आला. चांगला ५६ फुटी खड्डा होता तो. तळाची जमीन बऱ्यापैकी भुसभुशीत दिसत होती. "चलो हो जाओ तय्यार" असं म्हणत राजाने एक हलकासा धक्का देऊन खड्ड्यात ढकलून दिलं आणि मी बसले पडत 'ऍलिस इन वंडरलँड' मधल्या ऍलिससारखी, सिंगापूरची स्वप्नं बघत. धप्पकन खाली आपटले. थोडंसं खरचटलं, एक दातही हलू लागला पण जास्त काही लागलं नाही. "राजाचं प्लॅनिंग असंच व्यवस्थित हो नेहमी" मी मनात म्हणाले.
इकडे राजाने जीवघेणा आकांत करायला सुरुवात केली. मग कुणीतरी फायर ब्रिगेडला बोलावणं पाठवलं, कुणीतरी सबसे तेज वाहिन्यांना कळवलं. एका तासातच त्या ठिकाणी पिकनिक स्पॉटवर जमते तही गर्दी जमली. गर्दी बघून राजा अगदी मोठ्याने आक्रोश करू लागला.
झालं, वाहिन्यांचं लाइव्ह टेलिकास्ट सुरू झालं. राजाला वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात झाली. त्यातून जे बाईट्स मिळाले त्यावर पंधरा- पंधरा मिनिटांचे कार्यक्रम सुरू झाले.
वाहिनीकन्येने विचारले--" मि. राजा, रानीको आप कबसे जानते है?"''बरसों से, जब हम जे. जे. में यु. जी. कर रहे थे तबसे"
की लगेच जे. जे. हॉस्पिटलाबद्दल माहिती देणारी पंधरा मिनिटे.

"तो 'रानीको बचाओ' के इस भाग का सवाल है ' राजाको रानीसे प्यार हो गया गाना कौनसे फ़िल्म का है?' सही जवाब देनेवालेको राजारानी ट्रॅव्हल की ओरसे काश्मीर ट्रीप"

अजून फायर ब्रिगेडचा पत्ता नव्हता. राजाच्या खोट्या काळजीचं रुपांतर खऱ्या काळजीत होऊ लागलं. इतक्यात खूपशा सायरनचे आवाज ऐकू आले आणि आलं एकदाचं फायर ब्रिगेड म्हणणाऱ्या राजाला दिसल्या K. A. ने नंबर सुरू होणाऱ्या कर्नाटकी गाड्या. चक्क कर्नाटकचे मुख्यमंत्री आले होते. मागचे दोन तास टी.व्ही. वर आमचेच गुणगान चालल्याने राजा कर्नाटकचा आहे , मी कोंकणातली आहे, उद्या माझा वाढदिवस आहे हे तमाम भारतीयांना ठाऊक झाले होते. पण म्हणून इतक्या लवकर कर्नाटकचे मुख्यमंत्री इथे येतील असं वाटलं नव्हतं. सिलिकॉन सिटीच्या कृपेने कर्नाटक खूपच फास्ट झालंय याची प्रचिती आली. खड्ड्याजवळ एका खुर्चीत बस्तान ठोकत" कर्नाटकके एक घर की बहू पुरे कर्नाटककी बहू है(टाळ्यांसाठी पॉज) आज इसे बचाने के लिये बँगलोरसे एक खास हायटेक टीम आ रही है" असं म्हणून महाराष्ट्र सरकारच्या अकार्यक्षमतेविषयी चार वाक्य बोलून झाली.
तेवढ्यात परत सायरनचा आवाज झाला. आतातरी नक्कीच फायर ब्रिगेड असं राजाला वाटतंय तोवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मूर्ती गाडीतून उतरली. "कर्नाटकच्या भूलथापांना फसू नका, आमची टीम आमच्या मुलीची काळजी घेण्यास समर्थ आहे, ते ही जमलं नाही तर केंद्राची मदत घेण्यात येईल.मॅडमची या घटनेवर बारीक नजर आहे''
"अस्सं, मग मागचे चार तास झाले अजून तुमची फायर ब्रिगेडचीच गाडी कशी नाही आली?'' क. मु. नी टोला हाणला."ती गोष्ट महापालिकेच्या अखत्यारीतील आहे आणि तिथे अपोजिशनवाले आहेत, या निमित्ताने तरी सेनेची महापालिका किती अकार्यक्षम आहे आणि मुंबैवर येणाऱ्या संकटांचा सामना करण्यास असमर्थ आहे हे साऱ्या देशाला कळले असेल."
एवढ्यात परत सायरन वाजला. आता कोणता राजकारणी आला असा राजा विचार करतोय तोवर चक्क फायर ब्रिगेडची गाडी दिसायला लागली. पण राजकारण्यांच्या गाड्या, वाहिन्यांच्या व्हॅन्स यांच्यामुळे घटनास्थळी येण्यास त्यांच्या गाडीला प्रचंड अडथळा येत होता, त्यात बघ्यांची गर्दी. किमान दोन तास रस्ता क्लिअर करण्यातच जाणार होते. त्यात पहिल्यांदा कुणाच्या गाड्या मागे घ्यायच्या, क. मु. च्या की म. मु. च्या यावरही तिथे तू तू मै मै सुरू झालेली.
एवढ्यात एका वाहिनीला या कार्यक्रमाच्या मुख्य नायिकेची आठवण झाली , एक पातळसा दोर सोडून एक कॅमेरा आत सोडण्यात आला. "रानीजी खडड्डेमें गिरनेके बाद आप कैसा महसूस कर रहे हो" वरून प्रश्न विचारण्यात आला. " मी आधीच आत राहून राहून वैतागले होते , मी रडायलाच सुरुवात केली आणि "मला खूप भिती वाटतेय" एवढेच बोलू शकले.
झालं , मी रडतेय याचा अर्थ राजाने मला त्रास दिला असणार इथपासून राजानेच मला खड्ड्यात ढकलले असणार असा लावून आमच्या ओळखीच्या लोकांचे बाईत घ्यायला सुरुवात झाली. "नाही तसंतर त्यांच्यात काही भांडण नव्हतं, पण नवराबायकोत काय हो छोट्यामोठ्या कुरबुरी होतंच राहतात" आमचे टीव्हीवर दिसायला धडपडणारे एक शेजारी.
"हो, काल काहीतरी हिरे, अंगठी इ. वरून वाद चालला होता खरा" दुसरे सतत भिंतीला कान लावून असणारे शेजारी. झालं हे ऐकताच माझी नोंद सगळ्या वाहिन्यांनी 'हुंडाबळी ' या सदराखाली करून टाकली आणि राजावर प्रश्नांचा भडिमार होऊ लागला. करायला गेलो काय आणि होतंय काय हे बघून राजा बिचारा गांगरूनच गेला.
लगेच एका वाहिनीची प्रादेशिक व्हॅन माझ्या कोंकणातल्या घरी पोचली. आईबाबा अगोदरच मिळेल त्या वाहनाने मुंबईला यायला निघालेले. घरात गावातले खूप लोक आणि आज्जी एकटीच.
" आजीबाई, आपल्याला काय वाटतं , राजाने राणीला खड्ड्यात ढकलले असेल?"
"शिरा पडली तुज्या तोंडावर नी काठी आली तुज्या कॅमेरावर! माज्या नातजावयाबद्दल म्होरं काय बोललंस तर रां*वा तुझ्या झिंज्याच उपटंन"
काही सनसनाटी बाईट न मिळता गाडी निघून गेली.

कार्यक्रमके इस भाग के प्रायोजक थे, महाकेश हेअर ऑइल. बाल बने अंदरसे स्ट्राँग!

इकडे एक गाडी कर्नाटकातल्या घरी. सासूबाई अख्ख्या गावासोबत टीव्हीवर माझ्या सुटकेचं नाट्य बघत होत्या. त्यांचे देव केव्हाचे पाण्यात बुडवलेले होते." राणीला राजानेच खड्ड्यात ढकलले याबद्दल तुमचं काय मत आहे?"
"निमदं हेणा होग ग्वाडीमॅक कुडली (गावठी कानडीत -मुडदा बश्शिवला तुझा भित्ताडाला टेकून) लाज नाही वाटत असं विचारायला. सासूबाईंनी कॅमेराच्या रोखाने उगारलेला दगड बघून वाहिनी -बाला मागच्या मागे कॅमेरासकट पळाली.

कार्यक्रम के इस भाग के प्रायोजक थे गुडबाय अंडरटेकर्स-- अवर केअर स्टार्टस व्हेन युवर लाईफ एन्डस!

इकडे खड्ड्याजवळ रणांगण झालं होतं. क. मु. आणि म. मु. याच्यात एकमत होत नसल्याने क. किंवा म. यांपैकी एकही टीम पुढे येत नव्हती. राजाचा धीर सुटत चालला होता. इकडे खड्ड्यात प्राणवायू आणि पाण्याअभावी मला गुंगी येत होती. तितक्यात लष्कराचं विमान उतरलं. जवान बाहेर पडले. प्रसंगावधान राखून प्रथम मला ऑक्सिजन आणि पाणी मिळण्याची व्यवस्था केली गेली. आणि सुरू झाला "राणी को बचाओ" चा सगळ्यात रोमांचक भाग.
तोपर्यंत सगळ्या मंदिर, मस्जिद, गुरुद्वारात माझ्या सुटकेसाठी प्रार्थना सुरू झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस असल्याने "हॅपी बर्थ डे राणी"चे बोर्ड लागले होते, केक बनत होते. राजा आणि राणी असे शब्द असलेल्या गाण्यांचा गजर होत होता.
शेवटी दहा तासांनी मला बाहेर काढण्यात जवानांना यश आलं. मी बाहेर आल्या आल्या स्वतःच धावत राजाकडे गेल्याने राजाने मला खड्ड्यात ढकलले नसावे यावर पोलिसांसकट सगळ्यांचेच एकमत झाले आणि राजाचा जीव भांड्यात पडला.
लगेच माझ्या सुटकेचं क्रेडिट घेण्याची अहमहिका सगळ्या राजकारण्यांत सुरू झाली. क.मु. नी मदत म्हणून एक लाख रु. दिले. म. मु. नी त्यावर मात म्हणून दोन लाख रु. आणि वर आम्हा दोघांनाही एक महिना भरपगारी रजा देऊन टाकली. "राजा राणी अमर रहे'' या जयघोषात आमची मिरवणूक काढण्यात आली. बिचाऱ्या जवानांची एकावन्न हजार रुपये बक्षीस देऊन बोळवण करण्यात आली.

टकटकटक, दारावर आवाज झाला. "सॉरी साती, आजभी मुझे लेट हो गया! एक बॅड पेशंट आला होता गं, तुला बारा वाजता फोन करायला सुद्धा मिळाला नाही गडबडीत. आणि ती डायमंड रिंग आणायला विसरूनच गेलो, उद्या दोघं जाऊन घेऊ." तोफांचा भडिमार, अश्रूंचा वर्षाव व्हायच्या आत राजाने बोलायला सुरुवात केली.
"अरे पण सिंगापूरचं बुकींग केलंस का?" मी विचारलं. आणि मी काय बोलतेय हे न कळल्याने राजा माझ्याकडे पाहतंच राहिला.

गुरुवार, मई 25, 2006

आंब्या आणि कालवी

सोम, ०१/०५/२००६ - ११:५४.
आंब्या आणि कालवी.
माझा लहान भाऊ आंब्या(अमेय-अमू, अम्या इ.) म्हणजे पक्का कोंकणी. दोन दिवस माशांविना गेले की त्याच्या गळ्याखाली घास उतरत नाही. मागे एकदा तो मुंबईत आम्हांला भेटायला आला होता तेंव्हा त्याला घेऊन दादरच्या एका सुप्रसिद्ध मत्स्याहारी हाटिलात आम्ही जेवायला गेलो. मेन्यूकार्ड बघून मी म्हणाले,"बघ आंब्या , तुझी आवडती कालवी चक्क हॉटेलमध्येही मिळायला लागली." "
"बघू, बघू. अरे बापरे, चक्क कालवी मसाला आणि कालवी फ्राय! पण तायडे, आपण जशी कालवी पूर्वी खायचो आणि मी अजूनही गावी खातो, त्याची सर कशालाच येणार नाही."
त्यानंतर जेवण संपेपर्यंत आम्ही लहानपणीच्या आठवणीत रंगून गेलो.
आमचं कोंकणातलं गाव म्हणजे एकदम चित्रासारखं ! तीन बाजूंनी डोंगर आणि पश्चिमेला खाडी. आमचं घर खाडीपासून थोडं लांब आणि डोंगराच्या कुशीत. आजूबाजूला गर्द आमराई,तिला डाग(बाग) असं म्हणतात. आम्हा तिघा भावंडांना रत्नागिरीच्या शाळेत घातलं असल्याने येण्याजाण्यातच इतका वेळ जायचा की आजूबाजूच्या मुलांशी खेळायला कधी वेळच मिळायचा नाही. पण एकदा का उन्हाळी सुट्टी पडली की सर्व पांढरपेशी आवरणे गळून पडून आम्ही त्या मुलांतीलच एक होऊन खेळत असू. त्यातलीच एक आवडती गोष्ट कालवी खाणे.
तसा कालवीचा मोसम खूप आधीच सुरू व्हायचा. पण त्याला रंगत चढायची मुलांच्या शाळांना सुट्टी पडल्यावर. एका सुमुहुर्तावर( समुद्राची ओहोटीची वेळ बघून)
" काकींनू, कालवीस येताव काय", "रं बावा, कालवीस चल" अशा हाका देत वाडीतल्या पाच सहा बायका, त्यांचे नवरे, त्यांची पोरं छोटे-मोठे हारे (बांबूच्या विणलेल्या टोपल्या) घेऊन खाडीच्या दिशेने निघायचे. मग आम्ही तिघंही घरच्यांची नजर चुकवून त्यांच्याबरोबर. ओहोटीमुळे खाडी सुकून नुसता गाळ दिसत असायचा. आता सुरू व्हायची शोधमोहिम. तशी शोधायची काही गरज नसे म्हणा, पूर्ण किनाऱ्यावर शिंपले, कालवीचे मोठे-मोठे दगड पडलेले असायचे. कुर्ल्या(खेकडे) बिनधास्त इकडेतिकडे पळत असायच्या. बायका शिंपले गोळा करायच्या. कुर्ल्या पडायला मात्र सराईत पुरुषमंडळीच लागायची, नाहीतर कुर्ली पकडणाऱ्याचाच हात डेंग्यात पकडून फोडणार. आम्हा मुलांना मात्र इंटरेस्ट असायचा कालवीत.
कालवी म्हणजे शिंपल्या, शंख यांतीलच एक उपप्रकार(phyllum-mollusca, class-bivalvia) एका दगडाला सगळ्या बाजूंनी अगणित डोळे फुटले तर कसं दिसेल ते साधारण डोळ्यांसमोर आणा. तर असा हा काळपट दगड, साधारण पाव किलोंचा(मोठेच्या मोठे चार-पाच किलोंचे पण असतात.) याचा प्रत्येक डोळा म्हणजे एक शिंपला. प्रत्येक शिंपल्याची खालची कपची दगडाला घट्ट पकडून तर वरची कपची उघड्बंद होऊ शकते. या दोन कपच्यांमध्ये एक नाजूकसा प्राणी.तर असे हे दगड गोळा करून हाऱ्यात ठेवायचे . हे करताना खूप काळजी घ्यावी लागे. जरा जरी बेसावध राहिलं तर आपला पाय त्या खाडीच्या गाळात रुतायचा, नाहीतर कालव्याच्या कपचीवर पडून फाटायचा. तर हा कालवी गोळा करण्याचा कार्यक्रम चालायचा चार वाजेपर्यंत. मग भरलेले हारे डोक्यावर घेऊन यायचं अन्याकाकांच्या मळ्यात. या नारळी पोफळीच्या बागेत गावातला एकमेव पंप होता ज्याला उन्हाळ्यातही पाणी असायचे. पंपाच्या पाण्याच्या झोतात कालवी ठेवली की एकदम 'सोच्छ' होऊन जायची. ही कालवी घेऊन पुढची खरी गंमत-कालवी पार्टी सुरू व्हायची.
आमच्या शेजारच्या सनगरे काकूंची मुलं आमच्याएवढी असल्याने आमची पार्टी त्यांच्याबरोबरच. अंगणाजवळ एखादी सपाट जागा साफसूफ करून आणलेली कालवी एका थरात तिथे गोलगोल पसरायची. डागेतला आंब्याफणसाचा पातेरा(पडलेली पाने) आणून कालवीवर टाकून त्याचा ढीग करायचा. हा ढीग करायला जरा कौशल्य लागते कारण कसा आणि किती ढीग रचलाय त्यावर कालवी कशी भाजणार हे अवलंबून असते. ढीग पेटवून दिला की अगदी शेकोटीसमोर चालतात तशा गमतीजमती चालायच्या. पूर्ण ढीग पेटून गेला की काडीने सगळी कालवी उलटी करायची, परत पातेऱ्याचा ढीग, परत पेटवून द्यायचा. मग कशानेतरी झटकून सगळी राख उडवायची गरम-गरम कालवी परत हाऱ्यात भरून अंगणात घेऊन यायची.
यानंतर कालवी फोडण्यासाठी एखादी मोठी पाथर, हातोडा, लोखंडी फुंकणी असं मिळेल ते गोळा करून बसायचं एकेक कालवं उचलून एकेका डोळ्याच्या दोन कपच्या जिथे मिळतात तिथे घाव घालायचा. कालवीची वरची कपची निघते आणि आत असतं खरपूस भाजलेलं मांस(माष्टं/माष्टू)! आमच्या आंब्याच्या मते याची चव ना कोळंबीला(चिंगळे), ना शिंपल्यांना(मुळे)! हे माष्टु नुसतंच गट्टं करायचं नाहीतर तांदळाच्या भाकरीच्या तुकड्यावर ठेवून. या पाककृतीत ना मीठ घालायची गरज( कालवीत ते असतंच) ना मसाला. मध्ये मध्ये जरा कमी भाजलेलं माष्टू मिळालं की ते वेगाळ्या भांड्यात काढून ठेवायचं, काकू त्याचं 'कालव्याचं सुकं' करायच्या. बरोबर आणलेल्या मुळ्यांचं(शिंपल्यांचं) एकशिपी साळणं(आमटी)घरात रटरटत असायचं.
मग काय ठक ठक आवाज येत राहायचे. हाराभर कालवी संपत यायची. मी आणि सोनू(बहीण) आंब्याला म्हणायचो ' चल आता पुरे झालं" पण तो कसला ऐकायला. आम्ही दोघीच घरी परतायचो. संध्याकाळी उशीरा आई आणि आजीच्या लक्षात यायचं की आपला आंब्या घरी आलेला नाही. त्या बरोबर शोधत सनगरेंच्या घरी जायच्या , आई मारत मारत आणि आजी शिव्या घालत अशी बंधुराजांची पालखी घरात यायची.
रात्री बाबा आल्यावर त्यांच्यासमोर सगळी उजळणी परत. बाबाही अमूला रागावायचे. आणि मग आईला म्हणायचे,"अगं ए, माझ्या जरा पोटात कसंसंच होतंय, जास्त जेवायला नकोय." नऊला तर जास्तच पोट जड झालंय असं म्हणून बाबा पोट हलकं करायला जरा शतपावली करायला बाहेर जायचे.
दुसऱ्या दिवशी आम्ही खेळायला गेलो की सनगरे काकू घवाळी काकूंना सांगत असायच्या "काल सांजच्याला बिचाऱ्या आंब्याची आयस ना आजी पोराला मारीत घेवन गेली जे कालवावरनी. नी राती त्याचा बापूस येवन मुल्याचं एकशिपी ना कालव्याचं सुकं वरापून गेला ता समाजला तर आजयेला!"
बाबांच्या पोटदुखीचं कारण, आणि शतपावलीची जागा कळून आम्ही हसत सुटायचो.

एका लग्नाअगोदरची गोष्ट १

एका लग्नाअगोदरची गोष्ट १ शुक्र, २८/०४/२००६

मी मागेच म्हटल्याप्रमाणे जसजशी हरकामेगिरी संपत येते तसतशी आमच्यामागील आईवडीलांची लग्नाची घाई वाढत जाते. आमचंही असंच झालं. किती वेळा सांगूनसुद्धा दोन्हीकडच्या आईबाबांनी लग्नाचा एवढा तगादा लावला, की शेवटी त्यांच्या म्हणण्याला आम्हाला मान तुकवावी लागली. पण आमच्या दुर्दैवाने आमच्या ज्युनियर बॅचची ऍडमिशन काही दिवस लांबली आणि लग्नासाठी आम्हाला फक्त सहा दिवस रजा मिळाली.एक लग्नाचा स्पेशल ड्रेस/साडी वगळता आमची लग्नखरेदीसुद्धा आईबाबांनीच केली.
आणि हो आणखी एक गोष्ट मी एकटीने केली--"सौंदर्यसाधना!" त्याचीच ही गोष्ट.
लहानपणी म्हणजे बारावीपर्यंत माझे आणि माझ्या बहिणीचे केसही बाबा घरातच कापत असत. त्यामुळे 'ब्युटीपार्लर' म्हणजे काय हे कधी बघितलं नव्हतं . नंतर शिकायला जे. जे. ला आल्यावर 'ब्युटीपार्लर म्हणजे केस कापायची जागा' असंच माझं समीकरण होतं. त्यावेळी जे. जे. तल्या मराठी मुली एकदम साध्या राहायच्या. तुम्ही जर आदितीला (गोवेत्रीकर)आमच्या कॉलेजात असताना बघितलं असतत तर आताची आदिती बघून "हीच ती" यावर तुमचा विश्वास बसला नसता. माझ्या घरच्यांनापण 'पोरगी मुंबैत राहूनही साधी राहते' याचं फार कौतुक होतं. त्यामुळेच लग्नाच्या आठ दिवस आधी आईचा फोन आला तेंव्हा मी चक्रावलेच.
"साते, जरा ब्युटीपार्लरमध्ये जाऊन तोंडाचं कायतरी करून ये हो."
"आई, कायतरी काय सांगतेस? मी कधी तिथे गेलेय का? मला वेळतरी कुठाय जायला?" मी.
"ते काही नाही, लग्नाच्या मांडवात मुलगी कशी ऊठून दिसली पाहिजे! माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग--"
"बास,बास तुझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नात काय झालं ते ऐकण्यापेक्षा मी ब्युटीपार्लरमध्ये जाणं पसंत करेन" या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नानेच माझ्या आईच्या डोक्यात माझ्या लग्नाचा भुंगा सोडला होता.म्हणूनच त्या बिचाऱ्या मैत्रिणीचा आणि तिच्या मुलीचा मला खूप राग यायचा.
चला, आता ब्युटिपार्लर शोधमोहिम.बुद्धिमान मुली (या शब्दरचनेला कृपया मराठीतला "तो" अलंकार समजू नये.) ब्युटीपार्लरची पायरी चढत नाहीत असा माझा समज होता.त्यात माझ्या मेडिसिनच्या बॅचमध्ये मी एकटीच मुलगी असल्याने विचारायचं कुणाला हा प्रश्न होता. माझ्या एका हुशार-मित्राच्या खूप मैत्रीणी गायनॅकमध्ये होत्या. त्याने माहिती काढली-- आपल्या हॉस्पिटलच्या मागेच एक प्रसिद्ध पार्लर आहे. भारतीय प्रसाधनसाहित्याच्या बाजारपेठेत मोठं नाव असणाऱ्या कंपनीच्या मालकीचं . सोयीसाठी आपण त्याला " लखुमाई पार्लर" असं म्हणू. माझा हुशार मित्र तर त्या पार्लरचा नंबरही घेऊन आला.
मी फोन लावला. स्वागतिकेने मोठ्या प्रेमाने इंग्रजीत स्वागत केले.
"येस मॅडम, हाऊ कॅन आय हेल्प यू?"
बाई, मला आजची अपॉइंटमेंट दे फक्त.
"मॅडम , व्हॉट वुड यू लाईक टु चेक"
काय काय बरं ते? त्या मैत्रिणीच्या मुलीने दिलेली लिस्ट मी वाचून दाखवली.
"मॅडम वुड यू लाईक टु हॅव एनी स्पेसिफ़िक ऑपरेटर?"
म्हणजे काय? ऑपरेटर म्हणजे काही प्रणाली असते की ब्युटिशियनला ऑपरेटर म्हणतात?
"नो,नो रेग्युलर वन विल डू" मी आपलं दिलं दडपून.
मग त्या बाईने माझं नांव , पत्ता वैगेरे लिहून घेतला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी अपॉइंट्मेंट दिली.
दुसऱ्या दिवशी माझ्या म्होरक्याला मस्का लावून आणि माझ्या सहहरकाम्याला माझ्या वॉर्डची जबाबदारी देऊन मी पोचले लखुमाईत.
दरवाजा ढकलताच एक थंड सुगंधी झुळुक माझ्या अंगावरून गेली. काउंटरवरच्या परीला मी म्हटलं,
" माझी अपॉइंटमेंट आहे दोन वाजताची"
"युवर नेम प्लीज." सगळा इंग्रजीतून कारभार दिसतोय.
" साती, डॉ. साती काळे."
"व्हेन इज शी कमिंग ? इट्स ऑलमोस्ट टु."
बये , तुझ्यासमोर काय भूत उभं आहे काय? मग माझ्या लक्षात आलं , डॉ. म्हटल्यावर काही भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या अपेक्षा असणार बिचारीच्या. हा 'किरकोळ प्रकार' काही डॉक्टर म्हणून तिच्या पचनी पडला नसणार.
"आय ऍम डॉ. साती"
"ओ. आय ऍम वेरी वेरी सॉरी मॅम, यू लुक सो यंग" तिची टिपीकल व्यावसायिक मखलाशी चालू झाली.
आता पुढचा सगळा भाग मी मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करते.
तर मग परीने बेल दाबून एका मुख्य ब्युटिशियनला बोलावले.
" मॅम , तुम्ही पहिल्यांदाच येताय का इकडे?"
"मॅम, काही खास प्रसंगासाठी तयारी करताय का?"
"हो. म्हणजे लग्न आहे ना माझं म्हणून." मी.
"ओहो, एकदम योग्य जागी आलात. आम्ही ब्राईडल थेरपीमध्ये स्पेशालीस्ट समजले जातो. आमच्याकडे तीन पॅकेजेस आहेत. एक तीन महिन्यांचं, एक दोन महिन्याचं आणि एक एका महिन्याचं . तुम्हाला कुठलं हवंय?"
"या बावीस तारखेला माझं लग्न आहे?" मी आवंढा गिळत म्हणाले.
"क्का--य?" तिथे असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर "काय यडी बाई आहे" असे भाव उमटले. "मॅम , इटस टू लेट टु डू एनिथिंग"
"मग मी जाऊ?" हुश्श! सुटले, नको ती कटकट मिटली.
"नो, नो मॅम इटस बेटर लेट दॅन नेव्हर! लेटस थिंक समथिंग."
"मॅम , तुमच्या लग्नाची थीम काय आहे?" परीने विचारले.
माझे आई! थीम-मॅरेज करायला काय तू मला रतनपूरीची राजकन्या समजलीस? मी आपली रत्नागिरीच्या गांवातील साधीसुधी मुलगी.
"नाही नाही . काही विशेष थीम नाही. आपलं नेहमीचंच."
"म्हणजे टिपीकल महाराष्ट्रीयन लग्नं?"
"नाही , कानडी! माझे इन लॉज कानडी आहेत ना!"
"देन देअर इज नो क्वेश्चन ऑफ़ हेअर-स्टायलिंग. कन्नडिगा कीप देअर हेअर इन लाँग प्लेट"
हो का? अरे वा. (मला माहितीच नव्हतं)
ब्युटिशियनने मला एकवार आसेतूहिमाचल न्याहाळून घेतलं मग माझ्या चेहऱ्यावरून एक स्कोप फिरवला. तो एका मॉनिटरला जोडलेला होता. माझ्या चेहऱ्यावरचे खाचखळगे चंद्रावरच्या दऱ्यांप्रमाणे दिसू लागले आणि बारीकशी लव जाड्या काळ्या दोरखंडांप्रमाणे!
मग त्या बायकांची बरीच चर्चा झाली. मध्ये मध्ये मला काही अगम्य प्रश्न विचारणं आणि 'गरीब बिचारी' असे कटाक्ष टाकणं सुरूच होतं.
त्यांचं असं ठरलं की -- मला खालील उपचारांची तातडीची गरज आहे-
१.ब्लीच २. फ़ेशियल ३. आयब्रो ४. पेडिक्युअर ५. मॅनिक्युअर ६. हेअर कंडिशनिंग.
यातले ४ आणि ५ क्रमांकाचे प्रकार मी प्रथमच ऐकत होते. "त्या मुलीच्या " यादीतही ते नव्हते.
मी सगळ्याला मान तुकवली. किती खर्च येईल ते विचारले. मनातल्या मनात पर्सच्या सगळ्या कप्प्यांत असणाऱ्या पैशांची बेरीज केली. आणि स्वतःला त्यांच्या तावडीत सोपवलं.
क्रमशः

एका लग्नाअगोदरची गोष्ट २

रवि, ३०/०४/२००६ - २३:२६.
मी सगळ्याला मान तुकवली. किती खर्च येईल ते विचारले. मनातल्या मनात पर्सच्या सगळ्या कप्प्यांत असणाऱ्या पैशांची बेरीज केली. आणि स्वतःला त्यांच्या तावडीत सोपवलं.
मुख्य ब्युटीशियन मला आत घेऊन गेली. आत खालच्या मजल्यावर काळ्या कपड्यातल्या काळ्या पऱ्या (बहुतांश दाक्षिणात्य) केसांची कलाकुसर करत होत्या. दुसऱ्या पांढऱ्या कपड्यांतील गोऱ्या पऱ्या (बहुतांश मराठी आणि गुज्जु) बायकांचे हात-पाय स्वच्छ करत होत्या. त्यातल्या एका परीला बोलावून आमची ओळख करून देण्यात आली. मुख्य परीने तिला माझ्यावर करायच्या उपचारांची माहिती दिली आणि ती पांढरी परी (हेतल)मला वरच्या मजल्यावर घेऊन गेली. इथे चार-पाच छोट्या-छोट्या वातानुकूलित खोल्या होत्या. त्यातील एका खोलीत मला सोडून आणि एक झबलंवजा गाऊन मला देऊन मला चेंज करायला सांगून परी बाहेर गेली. आम्ही झबलं घालून तय्यार होऊन बसलो.
हेतल आली. आल्या आल्या माझ्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर, हातापायांवर तिची नॉन्स्टॉप बडबड सुरू झाली.
"मॅम, तुम्ही वॅक्सिंग करून घेतलंच पाहिजे."
"नको" मी ठाम निर्धाराने म्हटलं. मागे आमच्या शपथविधी समारंभाच्यावेळी माझी मैत्रीण आणि मी एका कामचलाऊ पार्लरमध्ये गेलो होतो. तिथल्या बाईने वॅक्सिंग असं काही दणक्यात केलं की धनुचा आवाज चार कि.मी. पर्यंत नक्की ऐकू गेला असेल. नंतर तिचे हात सोललेल्या कोंबडीसारखे दिसत होते.
"बरं, मग निदान ब्लीच तरी तुम्ही पूर्ण करून घ्या. "
"पूर्ण म्हणजे?"
"पूर्ण म्हणजे, चेहरा, मान , पाठ, खांदे इ. काही विशेष खर्च नाही चेहऱ्याच्या ब्लीचला ३०० रु. उरलेल्या प्रत्येक भागासाठी १५० रु. वेगळे."
थोड्या वेळाने ही बाई एका मोठ्या टबात ब्लीच बनवून त्यात मला भिजत घालणार असं काहीसं वाटू लागलं.
'' नको,नको"
"अहोपण मॅम, तुम्ही लग्नात साडी नेसणार ना, मग हे सगळं केलंच पाहिजे."
तिने हे सगळं करायची सतराशे साठ कारणे सांगितली आणि शेवटी मी चेहरा आणि मान या भागांसाठी तयार झाले.
मग तिचे माझ्या चेहऱ्यावर नाना उपद्व्याप सुरू झाले. सोबत मी माझ्या चेहऱ्याबद्दल किती निष्काळजी आहे वैगेरे शेरेबाजी सुरू झाली. पूर्वीच्या माणसांकडून न्हाव्यांच्या अखंड बडबडीबद्दल ऐकले होते, पण या आधुनिक न्हाविणी याबाबतीत कुठेही कमी नाहीत याची खात्री पटली.
ब्लीच करताना इतकं चुरचुरतं म्हणून सांगू! संपलं एकदाचं.
आता फेशीयल. यात तुमच्या चेहऱ्यावर हजारो क्रिमा थापल्या जातात. मध्येच एक खरबरीत मलम (स्क्रब) असते. स्क्रब करताना पॉलिश पेपरने चेहरा घासल्यासारखं वाटतं.एका पाइपातून चेहऱ्यावर पाच मिनिटे गरम वाफेचा झोत सोडतात. त्यानंतर एक ब्लॅकहेडस काढणे नावाचा प्रचंड यातनामयी प्रकार. यात धातूची काडी घेऊन चेहऱ्यावरचे काळे डाग टोचून-टोचून काढतात. हे मी ओठावर ओठ दाबून, पायावर पाय दाबून कसं बसं सहन केलं. मग तिने माझ्या डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवल्या, दिवे मंद केले, सुंदरशी संतूरची कॅसेट लावली आणि कुठल्याश्या सुगंधी मलमाने चेहऱ्याला मालीश करू लागली. आता तिची बडबडपण थांबली होती. मी केंव्हा गाढ झोपले मला कळलं सुद्धा नाही. तिने मला उठवलं तेंव्हा फेशीयल संपलं होतं.
भुवया कोरणे या पुढच्या प्रकारासाठी त्याच बेडची कळ फिरवून खुर्ची बनवण्यात आली. इतका मॉडर्न बेड आमच्या हॉस्पिटलामध्ये ऑपरेशनसाठी वापरतात. मग तिने सुरु केलेला प्रकार ऑपरेशनपेक्षा भयानक होता. दातात दोरा धरून ती भुवयांचे केस उपटत चालली होती. मध्ये मध्ये मला इथे पकडा तिथे पकडा अशा सूचना चालूच होत्या .पूर्वी हा प्रकार केला नसल्याने नेमकं काय करायचं याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे माझाच हात मध्ये मध्ये येऊन सगळा प्रकार आणखीनच गुंतागुंतीचा होत होता.
शेवटी संपला तो ही प्रकार. मग आमची रवानगी पुन्हा आमचे कपडे घालून खालच्या मजल्यावर झाली. एका छोटेखानी टेबलासमोर मला बसविण्यात आलं.त्या टेबलाच्या दोन कोपऱ्यात दोन खड्डे करून स्टीलच्या पसरट वाट्या बसवलेल्या होत्या. पायाशी एक मोठा पसरट टब होता. मला टबात दोन्ही पाय आणि त्या वाट्यांत हात बुडवून बसायला सांगण्यात आले. पाय बुडवताच हेतलने कुठलंसं बटण दाबलं आणि पाण्यात चक्क लाटा तयार झाल्या. मग थोड्यावेळाने त्या बंद झाल्यावर दोन पांढऱ्या पऱ्यांनी माझे दोन हात आणि दोघींनी दोन पाय ताब्यात घेतले. आणि मगाशी जे चेहऱ्यावर सोपस्कार झाले तसे सगळे हातापायांवर सुरू झाले. त्यानंतर नखांना छान आकार देऊन रंग लावण्यात आला.
या सगळ्यात माझी परत जायची वेळ होत आली म्हणून केसांच्या सर्व सोपस्कारांना चाट दिली. काउंटरला बिल द्यायला आले तेंव्हा परत प्रश्नांचा भडिमार करून कंपनीची काही अत्यावश्यक सौंदर्यप्रसाधने घेण्यास मला भाग पाडण्यात आले. (जी लग्नानंतर आजतागायत पडून आहेत.) एकंदर ५००० रु. उडवून मी गोरी, कोमल वैगेरे झाले. पूर्वीच्या मुलींचं बरं होतं, बिचाऱ्या एकदाच हळद प्यायच्या आणि गोऱ्या व्हायच्या.
परत आल्यानंतर वर्गातली मुलं माझ्या सुजलेल्या भुवया आणि तेलकट चेहरा बघून हसतच सुटली. नशीब त्या दिवशी राजा खूप बिझी असल्याने मला भेटला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र सगळ्या गोष्टींचा छान परिणाम दिसू लागला.
राजा भेटल्यावर जेव्हा म्हणाला, '' साती आज तो तू एकदम लडकी जैसी दिख रही है रे" तेंव्हा मात्र सगळ्याचं सार्थक झालं असं वाटलं.
(समाप्त)

फ़ेफ़रं

१२/०५/२००६ - १६:०२.
"साती, तुला बहुधा एखाद्या चांगल्या न्यूरॉलॉजिस्टला (चेतासंस्थातज्ज्ञ) दाखवावं लागणार आहे." इति राजा.
"काय?" मी चित्कारले.
एकतर याला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही, आणि कधी मिळालाच तर हे असलं बोलतोय. आतासुद्धा चुकून मिळालेल्या वेळात आमचा (नेहमीप्रमाणे)धेडगुजरी भाषेत प्रेमालाप चालू होता. राजा हिंग्रजीत तर मी हिंगराठीत (हि+इं+म). तसं मीसुद्धा सुरुवात हिंग्रजीत करते त्याला समजावं म्हणून, पण थोड्याच वेळात माझी गाडी मराठीचा रस्ता पकडते. आमचं बोलणं इथे बरंचसं मराठीत भाषांतरित करून लिहितेय.
"अगं, मी म्हणालो , तुला एखाद्या न्यूरॉलॉजिस्टला दाखवावं लागणार आहे. आजकाल तुला ऍब्सेंट सिजर्स येतात की काय अशी शंका येतेय मला."
"ऍब्सेंट सिजर्स?" मी विचारात पडले.
सिजर्स म्हणजे सामान्य लोकांच्या(आम्ही डॉक्टर लोक यांना 'ले पब्लिक' असं म्हणतो) भाषेत आकडी- एपिलेप्सी. अगदी ग्राम्य भाषेत फेफरं. फेफरं म्हटलं की डोळ्यांसमोर ती हातपाय झाडणारी, तोंडाला फेस आलेली, डोळे आकाशात गेलेली टिपीकल माणसे दिसू लागतात. पण एपिलेप्सीचे खूप प्रकार आहेत. मेंदूच्या संदेशवहनासाठी जो विद्युतप्रवाह वापरला जातो त्यात काही बिघाड झाल्यास ही व्याधी उद्भवते.आत्ता मी उल्लेखलेला टिपीकल प्रकार म्हणजे जी. टी. सी. , जनरलाईज्ड टोनिक- क्लोनिक किंवा ग्रँडमल एपिलेप्सी. दुसरा एक प्रकार म्हणजे ऍब्सेंट सिजर्स, पेटिटमल एपिलेप्सी. यात काही क्षण रूग्णाची अजिबात हालचाल होत नाही, रूग्ण जगापासून दूर आपल्यातच हरवतो. पुन्हा भानावर येतो तेंव्हा त्याला मधलं काहीच आठवत नसतं.
आणि असे हे सिजर्स चक्क मला येतायत? आम्ही दोघं न्यूरॉलॉजिस्टकडे गेलोयत, माझ्या मेंदूचा चुंबकीय फोटो (एम. आर. आय.) काढला जातोय, मेंदूच्या विद्युतप्रवाहाचा आलेख (इ. इ. जी.) काढला जातोय असं काहीसं डोळ्यासमोर येऊ लागलं.
"चल, काहीतरीच काय, मला कसं आठवत नाही? मला जाणवलंही नाही कधीच."
"वेडाबाई, उगाच ले पब्लिकसारखं बोलू नकोस. पेटिटमलच्या व्याख्येतच नाही का हे?"
"खरंच रे!" माझ्या मेंदूतला प्रवाह पूर्ववत सुरू झाला बहुदा! " पण तुला कधी जाणवलं हे?"
"कित्येकदा! त्या दिवशी माझी बहीण तुला ब्युटीपार्लरचा पत्ता विचारत होती तेंव्हा, गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून फोन आला आणि तू कालवी ठोकल्याचा आवाज ऐकत होतीस तेंव्हा, त्या दिवशी आईबाबा लातूरमधल्या लोडशेडिंगबद्दल बोलत होते तेंव्हा , अगदी काल माझा तो सतत पैसे मागणारा मित्र आला तेंव्हासुद्धा."
आत्ता मात्र माझी ट्यूब लख्ख पेटली.
"ते होय. ते ऍबसेंट सिजर्स नाही काही. अरे, ते माझ्या मनोगती प्रतिभेला फुटणारे गद्य साहित्याचे धुमारे, काव्याच्या कळ्या. अरेरे, काय हा दैवदुर्विलास! माझ्या थोर साहित्य समाधीचं तू एका शेऱ्यात फेफरं करून टाकलंस?" माझा मराठीच्या रुळावरून भरधाव सुटलेला अग्निरथ गंगा-यमुनेला पूर आल्यामुळे थबकला. मी राजाकडे पाहिलं.
त्याच्या हताश डोळ्यात 'हिला आता सायकिऍट्रिस्टकडेही न्यावं लागणार' हा विचार मला कोणत्याही भाषेत स्पष्ट वाचता येत होता.

सोमवार, मई 22, 2006

यादी

"साते, लग्गेच कँटिनमध्ये ये मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे." अतिदक्षता विभागातील ड्यूटी संपता-संपता मँडीचा फोन आला.
'आत्ता याला काय बोलायचंय बरं?' असा विचार करत मी कँटिनमध्ये आले. मँडी म्हणजे डॉ. मंदार.माझ्या मेडिसीनच्या बॅचमधील सगळ्यात साधा भोळा मुलगा. माणसानं किती भोळं असावं आणि त्याच बरोबर किती व्यवस्थित आणि नीटनेटकं असावं याचं उदाहरण म्हणून मँडीकडे बघावं.लातूरच्या एका आडगावातून आलेला हा मुलगा अभ्यासात अतिशय हुशार.परळच्या प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर झाला. आता आमच्याबरोबर पुढील शिक्षण घेत होता. परळच्या कॉलेजात पूर्ण पाच वर्षात एका मुलीशी कधी बोलला असेल तर शपथ. त्यात कुणी इंग्रजीत बोलू लागलं की साहेब गप्प व्हायचे. त्याच्या नोटस, त्याची जर्नलस इतकी सुंदर असायची की मुलींच्या नुसत्या रांगा लागायच्या म्हणे! (ऐकीव माहिती कारण माझं कॉलेज वेगळं,) पण साहेब मुली बघताच गप्प.
बरं हा दिसायला अगदी छोटासा. जेमतेम सव्वापाच फूट उंची , बारीक चण , गोरापान रंग आणि बालिश चेहरा. डॉक्टर म्हटल्यावर जे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहतं त्याच्या अगदी उलट.
इकडे पी. जी. ला मात्र आम्हा उरलेल्या अकरा जणांच्यात हा मस्त मिसळला. त्यात आम्ही सारेच मराठी त्यामुळे कसे बोलायचे हा प्रश्न नाही. आम्ही मात्र या बाळूला बदलायचा निर्णय घेतला. आणि सगळ्यात पहिलं बदललं त्याचं नाव, जे मंदारचं झालं मँडी. पण नांव बदललं तरी अंतरीचा भाव सहज थोडाच बदलणार? आमचा बाळ्या भोळा तो भोळाच!
आता दुसऱ्या वर्षाला आल्यावर प्रथेप्रमाणे आमच्या वर्गातल्या मुलांचे आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बघणे, दाणे टाकणे, इ उपक्रम सुरू झालेले. अपवाद फक्त दोन.एक मी कारण माझा बालविवाह ठरलेला(हा माझ्या मित्रांचा शब्द ,कारण माझं लग्न इंटर्नशिपमध्ये ठरलं होतं)आणि दुसरा मंदारचा,कारण त्याची कुठल्या मुलीकडे बघायची सुद्धा हिंमत होत नसे. इकडे सगळ्यांच्या आईबाबांनी पण त्यांच्या फ़्रंटवर मुली शोधायचा कार्यक्रम जोरात चालू केल्याने मित्रांपैकी एकजण तरी नव्या पद्धतीप्रमाणे दर आठवड्यात मुलगी बघायला जात असे.तर मँडीने का बोलवले असा विचार करत मी कॅन्टिनमध्ये आले. तो एकटाच एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसला होता.
'हं बोल' मी म्हणाले.'साते, मला उद्या जायचंय मुलगी बघायला.''"वा! अभिनंदन""अभिनंदन कसलं करतेस? मला भिती वाटतेय. मला सवय नाही गं मुली बघण्याची.""अरे, पहिल्याचं वेळी कशी असेल तुला सवय मुली बघायची?"''तसं नव्हे गं.पण, मुलींशी बोलायला जमत नाही मला.""शहाण्या, आता तू काय करतोयस मग?" "ते वेगळं. तू काय मुल.. आय मीन तू काय परकी थोडीच न आहेस ? तू मैत्रीण!""मग तिच्याशीही मैत्रीण समजून बोल न.""पण काय बोलायचं असतं मुलींशी ? तुझ्याशी काय बोलला होता राजा?""अरे आमची गोष्ट वेगळी, आमचा प्रेमविवाह होता.""पण जनरल काही गाइडलाइन्स दे न. काय काय विचारायचं पहिल्या भेटीत?""तिला विचार ती कुठली, कुठे शिकली, हॉस्टेलला राहतं होती का? तिला कायकाय आवडतं,कायकाय नाही, कुठला हिरो आवडतो, गाणं आवडतं ? " "आणखी?""आणखी काय ? नॉन्व्हेज चालतं का नाही ,आणि हो ,लग्नानंतर गावात राहायला आवडेल की नाही ते पण विचारून घे. तुझी आवडनिवड तिला सांग." मी आपलं काहीतरी उत्तर दिलं अंदाजानं."थँक यू साती. मी आता यावर विचार करून काय ते ठरवतो बघ व्यवस्थित" मँडी विचार करत निघून गेला.
दुसऱ्या दिवशी मँडी मुलगी बघायला गेला, परत आला तो काय बोलायला तयारच होईना. याचं काहीतरी बिनसलंय हे लक्षात घेऊन सारेजण एकएक करून निघून गेले. मी आणि तो, दोघंच उरलो.
"हं आता बोल काय झालं?''"काय होणार,कप्पाळ? तू म्हणाल्याप्रमाणे मी तिला घेऊन हॉटेलात गेलो, समोरासमोर बसलो, त्या दिवशीची यादी बाहेर काढली आणि एकएक प्रश्नांची उत्तरे विचारुन ती टीक केली.""यादी! कसली यादी ?"
त्याने मला खिशातून यादी काढून दाखवली.मँडीच्या सुरेख अक्षरात छान कोष्टक करून मुद्दा, माझं मत ,तिचं मत ,शेरा असलं लिहिलेली ती मजेशीर यादी होती.
"ही तू तिच्यासमोर बाहेर काढलीस?""हो . अग एकएक प्रश्न विचारून,त्यावर टीक करूनच मी पुढचा प्रश्न विचारंत होतो."
कित्ती आमचं बाळ भोळं आणि व्यवस्थित ! मी कपाळावर हात मारून घेतला.
"ती काय म्हणाली मग?"
एवढंसं तोंड करून मँडी म्हणाला --"काय नाही, दहा प्रश्न झाल्यावर 'I think you need time to grow up, kid' असं म्हणून ती चक्क निघून गेली गं."